Sunday, December 22, 2013

एखादा झकास लेख....

रोज दिवसभर काहीतरी सुचत असतं, आज थोडं यावर लिहुया असंही मनाशी म्हणतोही तेव्हा...
एखाद्या क्षणी हे अगदी उजळपणे जाणवतं की.. अरे.. हा... हाच.. हाच तर क्षण खूप सकस आहे.. खोल आहे.. किती उत्कट आहे..
आपल्या मित्रांना सांगायलाच हवा.. उलगडायलाच हवा निवांतपणे.. मनात नोंदही होते तशी पण.. पण...

पण एक प्रॉब्लेम होतो.. हल्ली काही लिहायला घेतलं तर पुर्णच करता येत नाही... काहीतरी विचार घेउन कळफलक समोर घ्यावा... तर दोन चार वाक्यं लिहून होतात..
त्यापुढंच वाक्य लिहिता लिहिता विचारांची मालीका कुठेतरी भरकटत जाते.. धडाडती फास्ट ट्रेन.. सुसाट वेगाने रूळ बदलते..
मनाच्या अवकाशात असंख्य रंग उधळले जातात.. नवीन ताल घूमू लागतात.. नवीन खेळ सुरू होतो नव्या गड्यांचा... एका निसटत्या क्षणी जाणवतं बरंका, की काहीतरी चुकतंय.. आपण वेगळे होतो आत्ता .. आत्ता रंग बदलतोय... पण तरीही एखाद्या निसटत्या क्षणी आपणंच देतो भिरकावून स्वत:लाच.. स्वतःच्याच पोकळीत.. मग खरा आनंद असतो.. मुक्त असतो आपण काही क्षण.. निवांत सुंदर फ्रीफॉल.. अलगद उतरणार आपण स्वप्नांच्या मखमली प्रदेशात.. पण असं कोसळताना प्रत्येक वेळेला नाही लागत तो प्रदेश...
जाणवतं की हे कोसळणं थांबवलं पाहिजे.. असं अधांतरी कसं चालेल. घट्ट जाणीव नको का आधाराला, आणि तर्काची बळकट जमीन.. आधार तर शोधायलाच हवा.. धडपड करून
एखाद्या अणुकुचीदार विचारानं सळकन कापला जातो हात.. भळभळता... उगाचच वहावलो आपण.. क्षणांची जादू क्षणाची असते.. आपणच राहीलो असतो जरा खंबीर तर... असं नुसतं कीबोर्डकडं ब्लँक बघावं लागलं नसतं...
झाला असता ना एखादा झकास लेख....

1 comment:

  1. भन्नाट आहे हे. कला आणि व्यक्त होता येणं या विषयावर गोंधळ होतो, म्हणून 'जाउ दे कार्पण्य मी चे' आणि 'घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा' या दोन शोधत असताना हा ब्लॉग सापडला. व्हेहिकल पोस्ट पण आवडली. ब्लॉगवर शेवटची पोस्ट २०१३ ची दिसते आहे. त्यामुळे ही कमेंट पोहोचेलच असं नाही. तरी टाकते आहे. वाटल्यास उत्तर देणे. कनेक्ट व्हायला आवडेल.

    ReplyDelete