Sunday, August 22, 2010

फिट्टंफाट

मला तो खूप वेळा भेटलाय. आताशा संपर्क कमी झालाय हे खरं पण तरीही संबंध काही संपला नाहीये. अजून कधीतरी एखाद्या निवांत रात्री रपरपत असतो. मीच टाळतो बाहेर जायचं. सखीची झोपमोड करून त्याला भेटायला जायचं म्हणजे नको वाटतं. पण असं म्हणून, झोप येते का शांत, त्याच्या हाका चालूच असतात की. आपण तोंडावर पांघरूण ओढून झोपेचं सोंग घेऊन रहायचं.
लहानपणी नेहेमीच भेटायचा तो, आणि आतासारखं वरवरचं, तोंडदेखलं नाही, पक्का सामील असायचा मलाच. घरच्यांनी सांगितलं म्हणून छत्री घेऊन बाहेर पडायचं, पण जरा पुढे गेलं की लगेच छत्री मिटून भिजायचं. कधी आधीच संगनमत करून अचानक यायचा, मग घराकडे येताना दिसेल त्या डबक्यात पचाक्कन उडी मारून पाणी उडवायचो. नंतर कधीतरी नवीन रेनकोटाचा वास आवडायला लागला, पण तेवढ्यापुरताच, नंतर आमचीच खरी गट्टी, रेनकोट हरवायचा चारच दिवसात. पुन्हा एकदा मी त्याला भिजवायचो, तो मला.
त्याही नंतरचा तो आठवतो, मोठा झाल्यावर जरा हूडच झाला होता, कुठेतरी दरयाडोंगरात हाका मारमारून बोलवायचा. चिंब भेटायचा, भजी खायला घालायचा. ओल्या रानात गाणी म्हणत, कविता ऐकवत सोबत चालायचा. लाल चिखलात बरबटलेल्या हातानी पाठीवर थाप मारायचा. कधी तडमताशा वाजवायचा पत्र्यावर, तर कधी अलगद पागोळ्यांवरून ओघळणाऱ्या मोत्यांचे सर घेऊन यायचा भेट म्हणून.
जरासा खट्याळच होत गेला तसा नंतरनंतर, पण परकेपणा नाही जाणवला कधीच, अगदी सखीशी ओळख करून देतानाही, खूप समंजसपणे एकदाच आला होता थोडासा. मग धुक्यात हरवून गेला गुपचूप. नंतर मात्र कित्येक वेळा खऱ्या जीवलगासारखा नेमका मी तिच्याबरोबर असतानाच छापा घालायचा, पाठीवर रपकन धपाटा घालून जायचा.
आज मात्र वेगळाच भेटला, मी हा असा, इतका दूर.. एकाकी.. पोरका.. माझ्या सवंगड्यांपासून. माझ्या सखीपासून, माझ्या स्वतःपासून खुप लांब.. सतत आतून आसुसलेला..
ह्या हिरव्यागार भल्यामोठ्या कँपस मध्ये, तो रपरपत होता पूर्वीसारखाच. तोच आवाज.. त्याच हाका, तेच आर्त बोलावणे. मला आधी ओळखच पटेना. अरेच्चा हा इथे कसा. चेहरा तर ओळखीचा वाटतोय. आवाजपण नेहेमीचाच. नाही.. नाही.. पण जरा जपून रहायला पाहिजे, ह्या परक्या देशात, कुणाचा भरवसा धरावा. कुणी तोतया पण असेल...छे छे नकोच ते.. असं म्हणून मी मान वळवून कामात लक्ष घातलं.. अरे अरे.. असा आत काय येतोस.. मी नाही तुला ओळखत.. थांब थांब.. महत्वाचे कागद आहेत ते..
पुन्हा तीच रपरप.. तोच तडमताशा.. तेच चेहरयावर उडालेले दोन थेंब.. अरे खरच तो ‘तू’ आहेस... आयला.. तू.. इथे
साल्या.. मी दोन महाखंड पार करून पोटासाठी इथे आलोय.. सतत तळमळतोय कुणीतरी ओळखीचं भेटावं म्हणून.. आणि तू माझ्यासाठी इथे आलास..
काय बोलू.. काय सांगू.. कसं सांगू तू कोण आहेस आत्ता माझ्यासाठी.. आत्ता, या क्षणी मला भिजवच गड्या.. चिंब होऊ दे मला.. तू मला भिजव.. मी तुला भिजवतो.. माझ्या अश्रुंनी..

लख्ख

लेकराला मायेच्या ह्या मायेची तहान
मायेनेच दिला सूर, उजळाया रान
आजीच्या कवतिकाचा सोनियाचा तोडा,
आईच्या पदराचा आधारही थोडा
मायेच्या गावाला या नाहीच किनारा
मऊशार पंखाखाली साजिरा निवारा.
थोडी आभाळात आता नवी दिशा दिसे.
नव्या क्षितिजाचे मला लागलेले पिसे.
नव्या नव्या पंखाना या भरारीची आस
कधी स्वच्छ सूर्य, कधी ससाण्याचा भास
खोलखोल दरी आणि माणसे निश्चेत
प्रेमानेच सावरले पुन्हा घेऊन कवेत
मायेनेच दिले लख्ख, मायेनेच प्राण
मायेचाच ठेवा आता, नाही काळा क्षण

स्वप्नधुंद

मनाच्या खोल कोपरयात दडलेले काहीबाही...
नकळत वर येते, जाणवतही नाही...
खळखळून हसणं, जागवलेल्या रात्री, उबदार गप्पा..
आणि बोलून बोलून लागलेली भूक.
कधीतरी कशाचातरी धरलेला राग....
मनाच्या कोपऱ्यातला इवलासा वण...
मीच बरोबर होतो तेव्हा... हेका अजून ...
मलाच नाही पटत.., तरी खोटा प्रयत्न.
निसटून गेले क्षण, एका बेसावध क्षणी...
उरतो आता केवडा, आणि चुकार एखादा मणी...
आतून आतून येते हाक, मोहरता सुगंध...
गंधांच्या शय्येवर, रात्र स्वप्नधुंद..

बाजीप्रभूंचा पोवाडा – पावनखिंड बलिदानाचा आज ३५०वा स्मृतीदिन – तेजोनिधी सावरकर

१२ जुलै १६६० च्या रात्री महाराज, बाजीप्रभू आणी सहाशे मावळे जीवावर उदार होऊन, सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटून जाण्यासाठी बाहेर पडले. त्या अभूतपूर्व रणसंग्रामाला, बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्य रक्षणासाठी पावनखिंडीत देह ठेवला त्याला आज ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.
या प्रसंगावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेला पोवाडा १९१०च्या दशकात, स्वराज्याच्या चळवळीला खूप स्फुर्तीदायी ठरला होता. तो पोवाडा आज आपल्यासाठी देतो आहे. काही ठिकाणी तत्कालीन भाषा थोडी साधी करून घेतली आहे, हे काव्य समजायला सोपं आणि भाषा सहज असल्यामुळे रसग्रहण केलेल नाहीये. तरीही काही शंका आल्यास अवश्य विचारा..
जयोऽस्तु ते श्रीमहन्‌मंगले शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवति त्वामहम् यशोयुतां वंदे ॥
स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं ।
आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥
चितूरगडिंच्या बुरुजानो त्या जोहारासह या ।
प्रतापसिंहा प्रथितविक्रमा या हो या समया ॥
तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई ।
निगा रखो महाराज रायगड की दौलत आयी ॥
जरिपटका तोलीत धनाजी संताजी या या ।
दिल्लीच्या तक्ताचीं छकलें उधळित भाऊ या ॥
स्वतंत्रतेच्या रणांत मरुनी चिरंजीव झाले ।
या ते तुम्ही राष्ट्रवीरवर या हो या सारे ॥
लोट धुळीचा सुटला अवचित दीन शब्द उठला ।
लगट करुनि शिद्दिनें पन्हाळा गड वेढुनि धरिला ॥
लक्ष्मीचे मृदु कमल शारदासुंदरिचा वीणा ।
स्वतंत्रतेचा कलिजा अडके गडांत शिवराणा ॥
अफझल्याच्या वधा स्मरोनी फाजल सुत त्याचा ।
करितो पण कीं शिवभूपाला जिवंत धरण्याचा ॥
बापासि तुझ्या जो खडे । चारि रोकडे । जाशि त्याकडे ।
जीवंत धरुं तरि साचा ।
जीवंत पवन धरण्याचा ।
अभ्यास आधिं कर याचा ।
खुशाल हरिणा मग तूं धावें धरण्या वणव्याला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
बाजि लागला शिवभूपाच्या थोडा कानाला ।
हातीं भाला एक मावळा गडाखालिं आला ॥
शिद्दि पाहतां चुकुनि हात तरवारीला गेला ।
दाबुनि त्याला मुजरा केला धीट नीट वदला ॥
शिवाजि राजा जिवंत येतो तुमच्या गोटाला ।
उद्यां सकाळीं करुं गड खालीं कळवी तुम्हांला ॥
ऐकुनी शिद्दि बहु फुगला । रिपूजन भुलला । परस्पर वदला ।
अजि खान, खानखानाजी ।
हुए शिकस्त मराठे आजी ।
फिर लढना क्यौंकर आजी ।
चलो शराब उडायें ताजी ।
आप लेवजी, नहीं आप लेवजी ।
आप गाजि आप तो रणगाजी ।
झिंगविला अरि सर्प फुंकुनी पुंगी गुंगविला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
गुंगवुनी अरि-सर्प शिवा गारुडी गडावरि तो ।
प्रहर रात्र उलटतां मराठी जादू मग करितो ॥
कृष्णपक्षिच्या काळ्या काळ्या रात्रीं त्या दडल्या ।
गर्द झाडिला भिउनि चांदण्या बाहेरि न पडल्या ॥
अशा तमीं किलकिलें दार का तटावरी झालें ।
बाजि निघाले श्री शिव आले आले शत भाले ॥
भाला खांद्यावरी मराठा घोडयावरि स्वारी ।
भरतां घोडा थै थै नाचे तोंचि शीळ झाली ॥
वीर हो टाच घोडयाला । बाण हा सुटला । हटविणें त्याला ।
रिपु तुडवित व्हा व्हा पार ।
चौक्यासि तुम्हा दावील ।
काजवा चोर कंदील ।
गेला गडतळ गेला सत्तर मैल भूप आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
तुरी शिद्धिच्या हातीं देउनि सुटता शिवनृपती ।
‘अब्रह्मण्यम्’ कितिक भाबडीं भोळिं भटें वदतीं ॥
अब्रह्मण्यम् यांत कायरे दोष कोणता तो ।
आला ठक ठकवाया उलटा भला ठकविला तो ॥
साप विखारी देश-जननिला ये घ्याया चावा ।
अवचित गांठुनि भुलवुनि ठकवुनी कसाही ठेचावा ॥
ये यथा प्रपद्यंते माम् । भजाम्यहं तान् । तथैव; श्रीमान् ।
भारतीं कृष्ण वदला हें ।
अधमासि अधम या न्यायें ।
रक्षिलें राष्ट्र शिवरायें ।
राष्ट्ररक्षका सावध रे रिपु हुडकित तुज आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
हात जोडितों पाया पडतों बाजि तुझ्या राया ।
गड अवघड रांगणा तिथें तुम्ही जाणें या समया ॥
राष्ट्रदेविचा हस्त कुशल तूं तरि लाखों भाले ।
अम्हासारिखे मिळतील; चिरतिल चरचर रिपु सारे ॥
जाऊं काय मी बाजि मृत्युमुखिं ढकलुनि तुम्हाला |
कधीं शिवा जातिचा मराठा मृत्यूला भ्याला ॥
चढा गड तुम्ही यशोदायिनी तोफ पांच करा ।
तोंवरि लढवूं गनीम अडवूं खिंड करुं निकरा ॥४॥
वसुदेव तूंचि शिवराया । कंस कपटा या । करुनियां वाया ।
स्वातंत्र्य-कृष्ण-चिन्मूर्ती ।
जा घेउनि अपुल्या हातीं ।
गड गोकुळांत नांदो ती ।
गडीं चालला शिव तो खिंडित ‘दीन’ शब्द उठला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
आले आले गनीम खिंडिंत चवताळुनि आले ।
झाले झाले सज्ज मराठे सरसावुनि भाले ॥
संख्या दुप्पट रिपुची, परि ते निकरानें लढती ।
हर हर गर्जुनि समर रंगणीं तुटोनियां पडती ॥
खङगाचे खणखणाट त्या मधिं शर सणसण येती ।
मारण मराणावीण नेणती वीर रणीं रंगती ॥
तो हर हर एकचि झाला । वदति रे चला । म्लेंछ हा हटला ।
चला चढवा नेटाचा हल्ला ।
वीरश्रीचा करा रे हल्ला ।
निकराचा चालु द्या हल्ला ।
मारित हाणित हटवित म्लेंछा खिंडिपार केला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपुवरी घाला ॥
म्लेंछ हटवितां बाजी वळुनी गडाकडे पाहे ।
श्री शिव चाले मागे बघुनियां वीर गर्जताहे ॥
गडांत जाईल राष्ट्रदेविचा जिवलग शिवराणा ।
तोंवरि लढवूं खिंड शूर हो हा अपुला बाणा ॥
त्या बाण्याच्या आधिं रणांगणि जरी घडे मरणें ।
पुनर्जन्म घेउनी तत्क्षणीं पुनः पुन्हा लढणें ॥
रघुराया रावणहरणा । कंसमर्दना । भो जनार्दना ।
लाडक्या देश जननीचे ।
स्वातंत्र्य रक्षणीं साचे ।
हे प्राण दान जरि अमुचे ।
पवित्र हे जरि त्वत्प्रिय हे जरि दे तरि सुयशाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
आले आले गनीम चालुनि पुनरपि तों आले ।
झाले जाले सज्ज पुनरपी उठावले भाले ॥
दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला ।
भिडला ओष्ठीं दंत मस्तकीं खङग वक्षिं भाला ॥
हल्ला चढवित परस्परावरि पुनः पुन्हा लढती ।
नटती योद्धे समरभाजनीं वीररसा लुटिती ॥
कचरला मराठी भाला । बाजि तों आला ।तोलुनी धरिला ।
रणिं रंग पुन्हा ये साचा ।
गर्जती मराठे रिपुचा ।
घ्या सूड म्लेंच्छ मत्तांचा ।
त्याचा मस्तक चेंडू साचा ।
समररंगणीं चेंडूफळीचा डाव भरा आला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
डाव उलटला म्लेंच्छावरी तो पुन्हा परत हटला ।
जय झाला परि वीर मराठा बहुतांशी पडला ॥
तिकडे गडिंच्या तोफा अजुनी पांच कां न सुटती ।
वीर मराठे सचिंत आशाबद्ध सर्व बघती ॥
तशांत घेउनि ताजी टोळी फाजलखां येतो ।
धन्य बाजिची; पुन्हा उसळुनी अशनी सम पडतो ॥
खिंड तोफ तिज मधुनी सुटला गोळा श्री बाजी ।
रणीं तळपतो वीरश्रीचा रणनवरा बाजी ॥
तों गोळी सूं सूं आली । अहो त्या काली । मर्मिं ती शिरली ।
श्री बाजी विव्हळ पडला ।
मागुती तत्क्षणी उठला ।
बेहोष वीर परि वदला ।
तोफे आधीं न मरे बाजी सांगा मृत्यूला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
थांबा बाजी जखम तरि पुरी बांधूं द्या थांबा ।
हर हर रणिंचा ऐकुनि वीरा उसळुं नका थांबा ॥
जखम कुठें रे असे फक्त मी तृषाक्रांत थोडा ।
रिपुरक्ताते पितों घटघटा सोडा मज सोडा ॥
खरी जखम भू-आईस माझ्या, फोडी हंबरडा ।
ओढुनि अरिची अंतडी बांधुया पट्टि तिला सोडा ॥
भले मराठे लढा तसेची आलो मी सोडा ।
प्रखर आपुली भूक शमविण्या रिपु नरडी फोडा ॥
होईल तोफ शिवबाची । क्षणीं दो क्षणिंची । खिंड लढवावी ।
फेडाया ऋण या भूचें ।
अजि उष्ण बिंदु रक्ताचे ।
द्या मुद्दल मोजुनि साचें ।
व्याज तिला स्वातंत्र्य देउनी फेडा कर्जाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
काय वाजलें ? बाजीराया बार न गडिं झाला ।
शिला कोसळे, पान सळसळे, पक्षी ओरडला ॥
लढा तरी मग वीर चला हो रणांत घुसलों मी ।
रक्तें मढवूं लढवूं खिंडिची तसू तसू भूमी ॥
शपथ तुम्हाला वृक्ष, पक्षि, जल, शिला तेज, वारे ।
मरतां आम्ही तोफेपूर्वी लढा तुम्ही सारे ॥
देहबंध तो तुटला बाजीराय धरे पडला ।
वीरवराचा विव्हल आत्मा नयनाशीं भिडला ॥
तों बार धडाधड झाले । प्राण परतले ।हास्य मुख केलें ।
हा पहिला बार शिवाचा ।
हा दुसरा निजधर्माचा ।
हा तिसरा निजदेशाचा ।
हा चवथा कर्तव्याचा |
बार पांचवा धडाडला हर बोला ज्या झाला ।
चला घालुं स्वातंत्र्य संगरीं रिपूवरीं घाला ॥
दिव्य द्युतिचा चकचकाट आकाशीं कोंदटला ।
रथ श्रीमती स्वतंत्रतेचा भूवरती आला ॥
ऊठ चितोडा ऊठ देविला उत्थापन द्याया ।
प्रतापसिंहा प्रथित विक्रमा उठि मंगल समया ॥
भूमातेच्या तान्ह्या उठि कां वीतचिंत व्हाना ? ।
असे कुशल रांगण्यांत तुमचा जिवलग शिवराणा ॥
स्वांतत्र्याचा पोवाडा हा ऐकाया आलां ।
उठा सर्व स्वातत्र्यवीरवर जयमंगल बोला ॥
श्री स्वतंत्रता भगवती । बाजिला नेती । आपुल्या रथीं ।
गंधर्व तनन तैं करिती ।
दुंदुभी नभीं दुमदुमती ।
श्री बाजी स्वर्गा जाती ।
करी चराचर विश्व बाजिच्या जयजयकाराला ।
चला घालुं स्वांत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
चला मराठे रणीं पहुडले जे आणिक सुर ते ।
पावन खिंडिंत बसून तीसह जाति नभः पंथे ॥
श्री बाजीचें रक्त पेरिलें खिंडिंत त्या काळा ।
म्हणुन रायगडिं स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला ॥
अहो बंधु हो पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी ।
स्वतंत्र त्या पूर्वजां शोभतां वंशज कां आजी? ॥
विनवि विनायक समजुनि घ्यावें यांतिल अर्थाला ।
स्वदेश नाहीं स्वराज्य नाहीं धिक् या देहाला ।
चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥
- पोवाडा समग्र सावरकर साहित्य खंड – ८ मधून साभार.
मूळ पोवाड्यात एकुण १८ चौक (चरण) आहेत, मी फक्त १४ चौक लिहिले आहेत.
हेच काव्य आंतरजालावर काही ठिकाणी उपलब्ध आहे पण, बराच पाठभेद असल्यामुळे मी छापील प्रत, मूळ मानली आहे. काही मोजक्या ठिकाणी आजच्या काळात प्रचलित असणारे पण छंदवृतात बसणारे पर्यायी शब्द घातले आहेत.

मार्सेलीसच्या ऐतिहासिक उडीची आज शताब्दीपुर्ती - विशेष लेख - तेजोनिधी सावरकर

तात्यारावांना पॅरीसाहून परत येताना लंडनच्या स्टेशनात शिरताच अटक झाली. काही दिवस त्यांना कच्चे कैदी म्हणून ठेवले गेले. न्यायालयाकडे त्यांचे वकील रेजिनाल्ड व्होगन यांनी केलेल्या सर्व अर्ज-विनंत्या फेटाळून लावत, सावरकरांना हिंदुस्थानात परत पाठवण्यात यावे आणि त्यांच्यावरील सुनावणी तिकडेच व्हावी असा निकाल लंडनच्या न्यायालयाने दिला.
सावरकरांना लंडनच्या कारागृहातून पळवून नेण्याचे १-२ प्रयत्न झाले पण ते फार यशस्वी झाले नाहीत. कदाचित ह्या प्रयत्नांची कुणकुण लागल्यामुळेच, त्यांच्या हिंदुस्थानात प्रयाणाचा मार्ग व वेळ अत्यंत गुप्त ठेवली होती. इंग्रज सरकारला सावरकरांना बोटीवरून पळवण्याचा प्रयत्न होऊ शकेल ह्याची पूर्ण कल्पना होती. वास्तविक नेहेमीचा हिदुस्थानात यायचा मार्ग होता इंग्लिश खाडीतून फ्रान्समार्गे, पण इतका स्फोटक दारुगोळा जहाजावर असताना, कुठल्याही परदेशी किनार्‍याला न लागता हिंदुस्थान गाठायचे ठरले आणि जहाज बिस्केच्या आखातातून हाकण्यात आले.
हिंदुस्थानच्या किनार्‍याला लागण्यापूर्वी एक अंतीम प्रयत्न करण्याचे तात्यारावांच्याही मनात घाटात होतेच. मोठ्या मोठ्या नावाजलेल्या इंग्रज पोलीस अधिकार्‍यांसमवेत आणि कडेकोट बंदोबस्तात प्रवास सुरु झाला, दिनांक १ मार्च १९१० रोजी.
कुणा क्रांतीकारकाच्या अंतस्थ प्रयत्नामुळे की इतर काही कारणामुळे माहीत नाही पण बोट फ्रेंच बंदर मार्सेलिसच्या किनार्‍याकडे वळवण्यात आली. मोठ्या आगबोटी किनार्‍यापासून लांब उभ्या करून किनार्यावर ये-जा लहान बोटीतून केली जाते. मार्सेलीसच्या बंदराजवळ बोट उभी असताना, बोटीवरचा बंदोबस्त अजूनच कडक करण्यात आला. दिनांक ८ जुलै १९१०.
काय असेल त्यावेळची तात्यारावांची मनस्थिती, आताच शेवटची संधी, आता कोणी सहकारी पुढच्या साहसाचा इशारा करील तर अगदी वेडे धाडसही करता येईल. पण आजचा क्षण गमावता कामा नये. तो क्षण समीप येत चालला, आला आला.. गेला.. गेला.. तो क्षण गेला. जहाज हलवण्याची लगबग सुरु झाली. जहाजावर रात्रीपासून प्रस्थानाचे वेध लागले होते, बोट तयारीत होती, कर्मचारी लगबग करत होते. इंग्रज अधिकारी मग्रुरीत होते, सावरकर चिंतेत होते, देश संकटात होता.
रात्र उलटून चालली, सावरकर जागेच होते, सावध होते. विचार करत होते, अंदमानात जाऊन कष्ट करणे हे जर कर्तव्य, तर आमच्या हिंदुस्थानसाठी अवध्य धाडस करून जगाचे लक्ष वेधणे हे पण कर्तव्यच, पुन्हा घडी येईल न येईल. झाला..., निश्चय झाला.., क्षणभर डोळे मिटले. साथीदाराला साद घातली, त्यानही सच्च्या साथीदारासारखी लगेच ओ दिली. मी आहेच तू हो तयार, साथीदार पण अव्वल होता, अशा साथीदाराबरोबर कट करायला तात्यारावांचच काळीज हवं. साथीदार होता साक्षात मृत्यू. त्याला ते सगळ्या आयुश्याच्या प्रवासातच बरोबर घेऊन निघाले होते. आपला रिपू त्यांचा मात्र सखा. मृत्यू आणि मृत्युंजय अनोखी जोडी दाहक, तितकीच शाश्वत.
पहाट होत होती, पहार्‍यावरचे दोन इंग्रज अधिकारी निजले होते, एक जागत होता, संधी साधून सावरकर त्याला म्हणाले. “पहाट झाली आहे शौचास चलावे” तो अधिकारी इतर दोघांना जागे करू लागला. इतर दोघेही उठले, . तिघेही जण तात्यारावांना शौचास घेऊन निघाले. अडचणी वाढत होत्या, धैर्य आणि निश्च्ययही. योजना तयार होत होती.
बोटीवरच्या कैद्यांसाठीच खास बांधवलेल्या संडासाची ती रचना, अरुंद जागा, विलायती शौचकूप, अर्धे दार काचेचे, हो, हो, पारदर्शक काचेचे. आणि त्या दाराबाहेर तीन अधिकारी पहारा देत उभे. तात्यारावांनी दार लावले. क्षण दोन क्षण गेले असतील, विचार झाला. Now or never असे अस्पष्ट शब्द उच्चारले. लंडनहून निघताना विलायती पध्दतीचा पोशाखच अंगावर होता. त्यातला ओव्हरकोट त्या दारावर टाकला, आता थोडा अवधी मिळणार होता. जहाजावर प्रत्येक मजल्यावर दोन्ही बाजूला गोल आकाराच्या हवेसाठी केलेल्या खिडक्या – पोर्टहोल असतात, व्यास अवघा दीड-दोन फुट, कमरेला नेसूचे वस्त्र ठेऊन तात्याराव एका झेपेत पोर्टहोल ला लोंबकळू लागले. अर्धे बाहेरही गेले.... पण तेवढ्यात बाहेरच्या एका अधिकाऱ्याला चाहुल लागली.
त्याने बोंबा ठोकली, तिघांनी मिळून क्षणात काचेचे दार लाथ मारून तोडले, पण सावज निसटले होते. उडी आधीच मारली होती, समोर फ्रांसचा किनारा होता, वारा खारा होता पण न्यारा होता, स्वतंत्र होता, इकडे जहाजावर एकाच गोंधळ, त्या पोर्टहोल मधून इतर कुणाला घुसता येईना. धिप्पाड अधिकारी एकेक. मग गोळ्या सुटू लागल्या, आरडाओरडा, शिव्या यांचा कल्लोळ उडाला. सावरकर मात्र या सगळ्याच्या अपेक्षेतच होते, गोळीबाराने न डगमगता ते वेगाने सरसर अंतर कापू लागले, गोळ्या चुकावण्यासाठी, पाण्याखालून पोहत झपाट्याने किनार्‍याकडे जाऊ लागले.
बोटीवरच्या छोट्या होड्या पाण्यातच होत्या पटापटा उद्या पडल्या, बंदुका रोखल्या, तात्याराव तटापर्यंत आले, ती उंच भींत चढू लागले. किनार्‍यावर काहीजण एव्हाना सावध झाले होते. बावरून इकडेतिकडे पाहू लागले होते तात्याराव ती भिंत चढून धक्क्यावरच्या वाहतुकीच्या रस्त्यावर आले. एक मोकळा श्वास, एक तिक्ष्ण कटाक्ष, स्वतंत्र वारा, नवीन देश,
काय होते त्यांच्याकडे यावेळेला, अंगावर फक्त एक अर्धी विजार आणि पूर्ण दुर्दम्य आत्मशक्ती. एखादा आणा जरी जवळ असता तरी एखाद्या वाहनात उडी मारून मॅजिस्ट्रेट कडे जाता आले असते.
आतापर्यंत तटावरही रान उठले होते, इंग्रज येऊन पोचले होते, स्वातंत्र्यसिंह घेरला जात होता, पारध्यांच्या पिंजर्‍यात. पुढे काय, प्रश्नच नव्हता, सावरकर जाणते होते, तज्ञ होते, बॅरिस्टर होते, आंतरराष्ट्रीय कायाद्यातले जाणकार होते. शोधक नजर फिरू लागली. एखादा तरी फ्रेंच पोलीस शोधू लागली. दिसलाच एक निवांत शिपाइ, त्याच्याकडेच धाव घेतली. मागून ५०-६० जणांचा घोळका मारे बंदुका घेऊन, अधिकारी पोशाखात चालून येत होता. चोर चोर ओरडत, हा आवाज ऐकून काही फ्रेंच लोकही आडवे येत होते, पण सावरकर जीवाच्या आकांताने, सगळ्यांना चकवत त्या शिपायाकडे पळत होते. पोचले, त्याला इंग्रजीत आणि मोडक्या तोडक्या फ्रेंच भाषेत सांगू लागले, मला तुझ्या साहेबाकडे घेऊन चल, कोर्टात घेऊन चल, खटला भर, मी अनधीकृतपणे तुमच्या किनार्‍यावर उतरलो आहे.
पण हाय!, तो शिपाई शेंदाडच निघावा ना. तोच घाबरून गेला. मोठ्या मोठ्या जरीच्या फिती खांद्यावर लावलेले बंदुका घेतलेले अधिकारी सांगतायत हा चोर आहे, आणि एका उघडा-वागडा, धुळीने माखलेला, काळ्या हमालासारखा दिसणारा तरुण म्हणतोय की मला कोर्टात घेऊन चल... कशाला ही नसती ब्याद अंगावर घ्या, म्हणून त्या फ्रेंच शिपायाने तात्यारावांच्या मुसक्या बांधून त्या हरामखोरांच्या ताब्यात दिले हो. आणि कडक इंग्रज पहार्‍यात फ्रेंच किनार्यावरून तात्यारावांना पुन्हा एकदा बळजबरीने ओढत बोटीवर चढवले गेले.
ती रात्र भयाण होती, काळरात्र होती. एका समुद्रातल्या उडीचा अंत पुन्हा नरकातच, एका साहसी प्रयत्नाचा असा अंत, इतकी घोर निराशा, हातातोंडाशी आलेला घास गिळता येऊ नये... खूप कठोर कराव लागतं हृदय अशावेळी. पुन्हा त्या छोट्याश्या केबीनीत, आता पहारा जास्तच कडक,.. कुणाशी बोलायची बंदी. समोर ५-७ अधिकारी समोर नजरेतून आगपाखड करत बसलेले. चवताळलेले, सुडाने, अपमानान पेटलेले... आपापसात देशी शिपायांची चर्चा चाललेली “आज रातको बतलायेगे सालेको”... रात्री जेवणापुर्वीच जहाजाचा तो भाग रिकामा केला गेला, बाकी प्रवाशांना दुसरीकडे हलवले गेले. सावरकरांना कल्पना आली, आजही आपला अमानुष छळ होणार, अत्याचार होणार. पण आज हा धैर्याचा महामेरू प्रक्षुब्ध होता, धगधगता होता. निखार्‍यालाच कुणी जाळू शकेल काय...
तात्याराव झोपेचे सोंग घेऊन वाट बघत होते मारहाणीस केव्हा सुरुवात होते त्याची. शेवटी त्यांच्या मुख्य अधिकारी, त्यांच्याकडे रोखून पाहात त्या खोलीच्या दारात येऊन उभा राहिला. म्हणाला “काय अवलाद आहे” सावरकरांनी डोळे उघडले, त्याच्याकडे रोखून पाहू लागले, अधिकारी म्हणाला “तुला लाज वाटत नाही” काहीच उत्तर नाही तेव्हा आणखी चिडून, जोरात हातवारे करून अंगावर येऊ लागला दोन तीन अश्लील शिव्या देऊन म्हणाला ”मघाशी मी जर तिथे असतो तर तुझ्या .........” हे अपशब्द ऐकताच सावरकर ताडकन उठून बसले, त्याकडे पाहात आपला साखळदंडातला हात हलवत म्हणाले “ अरे मारहाणीची भीती कोणास घालतोस, मेलेल्यास कशाची रे भीती, जेव्हा या कार्यात उडी घेतली तेव्हाच माझ्या सर्वस्वाला आधी आग लावली आणि मग दुसर्‍यांच्या चिता पेटवायला निघालो, तसा मी आत्ताही जीवंतपणी मेलेलाच आहे... तू मात्र नीट विचार कर.., माझ्यासारख्या जीवावर उदार झालेल्याच्या अंगाला हात लावशील तर नाहक प्राणास मुकशील.., बायकामुले आहेत ना तुला.. “
या क्षणिक उद्रेकाने व ह्या दृढनिश्चयी बोलांनी आपले काम केले चोख. हे बोल ऐकल्यावर तो अधिकारी एकदम कळवळून म्हणतो “ मी शिवीबिवी काहीएक देणार नाही तुम्हीही असा काही अविचार करू नये, आतापर्यंत मी तुम्हाला किती सभ्यपणाने वागवले, पण तुम्ही सुटकेचा प्रयत्न करून माझी नोकरीच धोक्यात आणली म्हणून काही अपशब्द माझ्या तोंडून निघाले”
यानंतर मारहाण मावळली, तलवार अदृश्य झाली, शिवीगाळ ऐकू येइना झाली. मात्र पहारा अजूनच कडक झाला, त्या छोट्या केबीन मध्ये सतत २-३ अधिकाऱ्यांच्या सोबतच बसायचे, तिथेच जेवायचे. जेवतानाही हातकडी अर्धीच निघणार, लघवी तिथेच, शौचाला जायचे तरी हातकडीने अधिकार्‍याबरोबर हात बांधूनच.
अशा वातावरणात बोट हिंदुस्थानच्या किनाऱ्यावर २२ जुलैच्या सकाळी लागली, पुन्हा मातृभू दिसली पण ती तलवारी बंदुकांच्या नंग्या पहार्‍यात

स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!
स्वातंत्रलक्ष्मी की जय!!

प्राचार्य गेले - सरस्वतीपुत्र हरवला

एका महाविद्यालयाचं आवार. प्राचार्य गाडीतुन उतरतात, पांढरा शर्ट, लेंगा आणि काळं जाकीट, सुरकुतलेला पण उत्साही प्रसन्न चेहेरा, आणि त्यांचे पेटंट मिश्कील हास्य, इमारतीच्या पायर्‍या चढुन येताना, त्यांच्याच व्याख्यानाचा बोर्ड समोर लावला आहे, त्याकडे क्षणभर कटाक्ष टाकुन पुन्हा त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने तरातरा चालत, हॉल मधे येतात. हॉल काठोकाठ भरलेला. समोरच्या तांब्याभंड्यातुन थोडे पाणी पीउन प्राचार्य सुरुवात करतात.

"आत्ताच येताना खाली मी व्याख्यानाचा बोर्ड बघितला. त्यावर विषय लिहीलेला नाही. तो लिहायचा राहायलाय असं नव्हे. पण हल्ली कुणी व्यक्त्याला विषय देत नाही, दिला तर आम्ही तो घेत नाही, अणि घेतलाच तर विषयाला धरुन कुणी बोलत नाही. तेव्हा कुठल्याही एका विषयावर न बोलता तुमच्या आणि माझ्या तारा जुळेपर्यंत मी बोलणार आहे...."

आणि त्यानंतर सतत १ तास अखंड, शांत आणि कल्लोळी, शीतल आणि दाहक असा विचारप्रवाह, सतत संवाद साधणारा, काहीतरी हितगुज करणारा, अंतर्बाह्य निर्मळ असा ओघवता प्रवाह. आपलं कर्तव्य, आपलं समाजातलं एक जबाबदार अस्तित्व. अभियंता या शब्दाबरोबर येणारी एक थोरलेपणाची जाणीव हे सगळं सगळं...

काही वेळापुर्वी मित्राचा फोन आला 'प्राचार्य गेले'.. एवढं एक वाक्य बोलुन फोन ठेवावा लागला. आणि त्यानंतर पहिल्यांदा मनात दाटला तो वर उल्लेखलेला प्रसंग. आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातलं त्यांचं हे व्याख्यान. मी पहिल्या वर्षाला असताना ऐकलेलं. अगदी जसंच्या तसं माझ्या समोर अगदी काल घडल्यासारखं दिसतंय ऐकु येतंय..
नंतर अशी अनेक व्याख्यानं आठवत गेली. प्राचार्यांना मी अगदी माझ्या शाळेपासुनच ऐकतोय.. सहा आठ महिन्यातुन एकतरी व्याख्यान शाळेत व्हायचंच. शाळेत अगदी सोप्या सोप्या विषयांवर बोलायचे, खुलवुन सांगायचे. नंतर त्यांना ऐकतच गेलो, समृद्ध होतच गेलो सतत. नुसती विषयांची जंत्री द्यायची झाली तरी त्यांच्या व्यासंगाचा आवाका लक्षात येतो. विवेकानंद, शिवछत्रपती, संतसाहित्य, समर्थ रामदासांचे विचार, मुक्तचिंतने, समाजाभिमुख विषय आणि बरेच काही.
अर्थात आमच्या वाट्याला प्राचार्य नेहेमीच जास्त आले. एकतर फलटणपासुन जवळ आणि सातार्‍यालाच त्यांचे शिक्षण झाल्यामुळे त्यांना वाटणारी आपुलकी. मनात अनेक भाषणं दाटुन आली आहेत आत्ता.  शाळेतली, कॉलेजातली, समर्थ सदन मधली, गांधी मैदानावरच विराट जनसमुदयापुढे केलेलं भाषण, आमच्या नगरवाचनालयाच्या छोटेखानी हॉलमधे होणारी छोटी भाषणं.

एक मोठा अविस्मरणीय प्रसंग आठवतो तो म्हणजे.. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या हस्ते शाहुकलामंदीर मधे झालेला त्यांचा सत्कार. आणि त्यावेळेला अत्यंत आदराने बाबासाहेबांनी काढलेले.. " हा साक्षात सरस्वतीपुत्र आहे" हे उद्गार

खुप समृद्ध केलं ह्या माणसानं, संतसाहित्याची गोडी लावली, महाराजांचा, विवेकानंदांचा वारसा शिकवला. खुप लहान वयात आयुष्याचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न केला, विचार शिकवला.. जबाबदारीची जाणिव करुन दिली... जागल्या बनुन राहिला मनाच्या कोपर्‍यात.. सतत, ह्या अंधार्‍या जगात..

खुप खोल खोल दाटुन आलय मनात, खुप लिहायचं होतं.. लिहीताही येत नाहिये.. थांबतो..

जाउद्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला..

तेजोनिधी सावरकर - लेख ३ - जीवनपट २

इंग्लंडच्या बोटीतून उतरून ट्रेनच्या डब्यात बसल्या क्षणीपासून इंग्रज गुप्तहेरांचा पहारा होताच, ती ट्रेन लंडनच्या स्टेशनांत घुसताच सावरकर धरले गेले, ह्याच प्रसंगी त्यानी माझ्या मागच्या लेखात वर्णन केलेली माझे मृत्युपत्र हे काव्य लिहिले. सगळीकडे बातम्यांचा, अफवांचा गदारोळ उडाला, जगातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात हि बातमी झळकली ह्यावेळेपर्यंत त्यांना आपल्याला अटक कुठल्या गुन्ह्यासाठी केलेली आहे हे ही माहीत नव्हते. तिथल्या कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सावरकरांना परत भारतातल्या कोर्टापुढे पाठवायचे ठरले. कारण भारतातल्या कोर्टापुढे विनाविलंब फाशी किंवा जन्मठेप देता आली असती. त्यांना नेणारे जहाज यदाकदाचित फ्रेंच किनारयाला लागलेच तर, झटपट हालचाल करून वैध वा इतर धाडसी मार्गाने सुटकेची योजना तयार होतीच. म्हणूनच कदाचित कुठल्याही राष्ट्रीय बंदराला न लागता थेट भारतात पाठवण्यासाठी अनेक बड्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर कडेकोट बंदोबस्तात तात्याराव जहाजावर चढवले गेले.
जहाज मार्सेलिस बंदराजावळून जात असता मोठ्या धाडसाने जहाजाच्या पोर्ट होल मधून उडी मारून तात्याराव कसे पळाले ह्यावर एक स्वतंत्र लेख लिहायचा मानस आहे. फ्रेंचांच्या स्वतंत्र भूमीवर एका अनधिकृत प्रवेश केलेल्या तरुणाला फ्रेंच कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायला हवी होती. पण त्यांना परत इंग्रज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्या अपेशी काळरात्रीची कथा लेखमालेचा एक सुरस भाग ठरावी हे उचितच. उर्वरीत प्रवास अत्यंत सशस्त्र कडेकोट पहाऱ्यात होऊन शेवटी मातृभूमीस पाय लागले.
पण मार्सेलिसचे साहस अगदीच वाया गेलेले नव्हते, तिकडच्या काही अभिनव भारताच्या सदस्यांनी आपले वजन वापरून, दबाव इतका वाढवला कि सावरकरांना पुन्हा आपल्या ताब्यात द्यावे असे फ्रेंच सरकारचे पत्र येऊन पोचले, इंग्लंड व फ्रेंच सरकारचे राजकीय संबंधात वितुष्ट येते कि काय इतका तणाव वाढला. हे प्रकरण हेग च्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सोपवावे लागले. इकडे हिंदुस्थानात त्यांच्यावरचा खटला सुरु होण्यापूर्वीच गडबडीने एक कायदा पास करून घेतला, ‘स्पेशल ट्रायब्युनल’ असे त्याचे नाव, ह्या कायद्याप्रमाणे सरकाने नेमलेल्या तीन जज्जांना अपिलाशिवाय फाशी देण्याचा अधिकार मिळाला. वा रे न्याय, एका आरोपीसाठी नवीन कायदा.
या खटल्यातील किस्से एका स्वतंत्र लेखासाठी राखून ठेवत आहे, तर अशा सगळ्या जामानिम्यात, तारीख २३ डिसेंबर १९१० उजाडली, कोर्टाच्या कामाकाजात न्यायाधीशांनी सावरकरांचे नाव घेऊन सांगितले “ तुम्हाला फाशीच व्हायची पण आम्ही आजन्म काळ्यापाण्याची शिक्षा सांगतो !! “ सावरकर अर्धे उठले, ताठ मानेने गरजले ‘वंदे मातरम’
आजन्म ह्याचा कायद्याच्या भाषेतला अर्थ आयुष्यातली उमेदीची वर्षे – २५ वर्षे, पण लगेच त्याच पुराव्याखाली दुसरा खटला भरण्यात येऊन सावरकरांना त्याही खटल्यातली शिक्षा सुनावली गेली, अजून एक जन्मठेप म्हणजे ह्या २६ वर्षाच्या तरुणाला एकूण शिक्षा झाली ५० वर्षे.
माझे डोळे आत्तासुद्धा भरून येत आहेत, हे लिहिताना.... वयाच्या २६व्या वर्षी मला कसली अक्कल होती? कसले वेड होते? आणि हा तेजस्वी तरुण कुठल्या ध्येयासाठी हसत हसत बळी जात होता.
हा तेजोनिधी प्रकाशगोल कारागृहाने १९१० साली असा गिळला, तो दिव्य प्रकाश जगाला पुन्हा पहायला मिळाला १९२४ साली. लक्षपटीने अधिक तेजपुंज होऊन. या कारागृहातील काळावर लिहिलेली ‘माझी जन्मठेप’, तेथील जागृतीचे, शुद्धीचे, शिक्षणाचे कार्य यावरही वेगळे ३-४ लेख अवश्यच आहेत. ६ जानेवारी १९२४ ला सावरकरांची राजकारणात भाग न घेणे व जिल्ह्याबाहेर न जाणे ह्या दोन अटींवर सुटका करण्यात आली.
आता प्रकाटकार्य वेगळे होते, आता त्यांनी हातात घेतला तो सामाजिक सुधारणांचा प्रश्न. अस्पृश्यतानिवारण, जातीभेद विरोधी आंदोलन, अंधश्रद्धा विरोधी लेखन, व्याख्याने या सगळ्या बाजूने त्यांनी रान पेटवून दिले. रत्नागिरीत पतीतपावन मंदीर स्थापन केले.
क्रमशः
या लेखांमधून तात्यारावांचा जीवनपट तर मांडत आहेच, त्याचबरोबर माझ्या लेखनाची रुपरेशाही ढोबळमानाने आखून घेत आहे. निळ्या रंगात उल्लेखिलेल्या प्रसंगांवर स्वतंत्र लेख ह्यापुढच्या लेखनमालेत लिहिण्याचा विचार आहे, आपणा सर्व वाचकांना जास्त उत्सुकता वर उल्लेखलेल्या कुठल्या प्रसंगांवर आहे हे सांगितल्यास मला लेखांचा अनुक्रम ठरवण्यास मदत होऊ शकेल. आपल्याला सावरकरांच्या जीवनातील इतर कुठल्याही प्रसंगाबद्दल, विचारांबद्दल, कवितेबद्दल उत्सुकता असेल तर तसेही अवश्य कळवा. म्हणजे तेही लेख यामध्ये समाविष्ट करता येतील

तेजोनिधी सावरकर - लेख २ -जीवनपट १

इंग्लंडच्या बोटीतून उतरून ट्रेनच्या डब्यात बसल्या क्षणीपासून इंग्रज गुप्तहेरांचा पहारा होताच, ती ट्रेन लंडनच्या स्टेशनांत घुसताच सावरकर धरले गेले, ह्याच प्रसंगी त्यानी माझ्या मागच्या लेखात वर्णन केलेली माझे मृत्युपत्र हे काव्य लिहिले. सगळीकडे बातम्यांचा, अफवांचा गदारोळ उडाला, जगातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात हि बातमी झळकली ह्यावेळेपर्यंत त्यांना आपल्याला अटक कुठल्या गुन्ह्यासाठी केलेली आहे हे ही माहीत नव्हते. तिथल्या कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सावरकरांना परत भारतातल्या कोर्टापुढे पाठवायचे ठरले. कारण भारतातल्या कोर्टापुढे विनाविलंब फाशी किंवा जन्मठेप देता आली असती. त्यांना नेणारे जहाज यदाकदाचित फ्रेंच किनारयाला लागलेच तर, झटपट हालचाल करून वैध वा इतर धाडसी मार्गाने सुटकेची योजना तयार होतीच. म्हणूनच कदाचित कुठल्याही राष्ट्रीय बंदराला न लागता थेट भारतात पाठवण्यासाठी अनेक बड्या बड्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर कडेकोट बंदोबस्तात तात्याराव जहाजावर चढवले गेले.
जहाज मार्सेलिस बंदराजावळून जात असता मोठ्या धाडसाने जहाजाच्या पोर्ट होल मधून उडी मारून तात्याराव कसे पळाले ह्यावर एक स्वतंत्र लेख लिहायचा मानस आहे. फ्रेंचांच्या स्वतंत्र भूमीवर एका अनधिकृत प्रवेश केलेल्या तरुणाला फ्रेंच कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायला हवी होती. पण त्यांना परत इंग्रज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्या अपेशी काळरात्रीची कथा लेखमालेचा एक सुरस भाग ठरावी हे उचितच. उर्वरीत प्रवास अत्यंत सशस्त्र कडेकोट पहाऱ्यात होऊन शेवटी मातृभूमीस पाय लागले.
पण मार्सेलिसचे साहस अगदीच वाया गेलेले नव्हते, तिकडच्या काही अभिनव भारताच्या सदस्यांनी आपले वजन वापरून, दबाव इतका वाढवला कि सावरकरांना पुन्हा आपल्या ताब्यात द्यावे असे फ्रेंच सरकारचे पत्र येऊन पोचले, इंग्लंड व फ्रेंच सरकारचे राजकीय संबंधात वितुष्ट येते कि काय इतका तणाव वाढला. हे प्रकरण हेग च्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सोपवावे लागले. इकडे हिंदुस्थानात त्यांच्यावरचा खटला सुरु होण्यापूर्वीच गडबडीने एक कायदा पास करून घेतला, ‘स्पेशल ट्रायब्युनल’ असे त्याचे नाव, ह्या कायद्याप्रमाणे सरकाने नेमलेल्या तीन जज्जांना अपिलाशिवाय फाशी देण्याचा अधिकार मिळाला. वा रे न्याय, एका आरोपीसाठी नवीन कायदा.
या खटल्यातील किस्से एका स्वतंत्र लेखासाठी राखून ठेवत आहे, तर अशा सगळ्या जामानिम्यात, तारीख २३ डिसेंबर १९१० उजाडली, कोर्टाच्या कामाकाजात न्यायाधीशांनी सावरकरांचे नाव घेऊन सांगितले “ तुम्हाला फाशीच व्हायची पण आम्ही आजन्म काळ्यापाण्याची शिक्षा सांगतो !! “ सावरकर अर्धे उठले, ताठ मानेने गरजले ‘वंदे मातरम’
आजन्म ह्याचा कायद्याच्या भाषेतला अर्थ आयुष्यातली उमेदीची वर्षे – २५ वर्षे, पण लगेच त्याच पुराव्याखाली दुसरा खटला भरण्यात येऊन सावरकरांना त्याही खटल्यातली शिक्षा सुनावली गेली, अजून एक जन्मठेप म्हणजे ह्या २६ वर्षाच्या तरुणाला एकूण शिक्षा झाली ५० वर्षे.
माझे डोळे आत्तासुद्धा भरून येत आहेत, हे लिहिताना.... वयाच्या २६व्या वर्षी मला कसली अक्कल होती? कसले वेड होते? आणि हा तेजस्वी तरुण कुठल्या ध्येयासाठी हसत हसत बळी जात होता.
हा तेजोनिधी प्रकाशगोल कारागृहाने १९१० साली असा गिळला, तो दिव्य प्रकाश जगाला पुन्हा पहायला मिळाला १९२४ साली. लक्षपटीने अधिक तेजपुंज होऊन. या कारागृहातील काळावर लिहिलेली ‘माझी जन्मठेप’, तेथील जागृतीचे, शुद्धीचे, शिक्षणाचे कार्य यावरही वेगळे ३-४ लेख अवश्यच आहेत. ६ जानेवारी १९२४ ला सावरकरांची राजकारणात भाग न घेणे व जिल्ह्याबाहेर न जाणे ह्या दोन अटींवर सुटका करण्यात आली.
आता प्रकाटकार्य वेगळे होते, आता त्यांनी हातात घेतला तो सामाजिक सुधारणांचा प्रश्न. अस्पृश्यतानिवारण, जातीभेद विरोधी आंदोलन, अंधश्रद्धा विरोधी लेखन, व्याख्याने या सगळ्या बाजूने त्यांनी रान पेटवून दिले. रत्नागिरीत पतीतपावन मंदीर स्थापन केले.
क्रमशः
या लेखांमधून तात्यारावांचा जीवनपट तर मांडत आहेच, त्याचबरोबर माझ्या लेखनाची रुपरेशाही ढोबळमानाने आखून घेत आहे. निळ्या रंगात उल्लेखिलेल्या प्रसंगांवर स्वतंत्र लेख ह्यापुढच्या लेखनमालेत लिहिण्याचा विचार आहे, आपणा सर्व वाचकांना जास्त उत्सुकता वर उल्लेखलेल्या कुठल्या प्रसंगांवर आहे हे सांगितल्यास मला लेखांचा अनुक्रम ठरवण्यास मदत होऊ शकेल. आपल्याला सावरकरांच्या जीवनातील इतर कुठल्याही प्रसंगाबद्दल, विचारांबद्दल, कवितेबद्दल उत्सुकता असेल तर तसेही अवश्य कळवा. म्हणजे तेही लेख यामध्ये समाविष्ट करता येतील

तेजोनिधी सावरकर - लेख १ - माझे मृत्युपत्र

तेजोनीधी लोहगोल भास्कर हे गगनराज, दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज.
सावरकर ह्या तेजोनिधी विषयी अनेकांनी आपली लेखणी आणि जीभ सतत गेली ५०-६० वर्ष चालवुन देखील हा 'सुर्य कोटी समः प्रभा' अजुन आवाक्यात येत नाही. तात्यारावांचे विचार मला समजले तसे तुमच्यापुढे मांडावेत आणि मांडता माडता मलाच ते जास्त कळावेत ह्या स्वार्थी विचाराने मी ही तात्यारावांच्या वरील लेखमाला चालु करत आहे. तात्यारावांच्या बद्दल काहिही लिहीताना, कुठे विसंगती आढळली तो दोष फक्त आणि फक्त माझाच समजावा.
ह्या मृत्युंजयाच्या 'दाहक परी संजीवक' अशा विचारांचा मागोवा घेताना, माझ्या लेखमालेच पहिलं पुष्प "माझे मृत्युपत्र" असावं हा योग यथोचीतच म्हणा.
१९१०च्या मार्च महिन्यामधे तात्याराव इंग्लंड मधे पकडले गेले तेव्हा त्यावेळच्या एकंदरीत परिस्थीतीनुसार पुन्हा त्याची त्यांच्या वहीनीशी भेट होणे अशक्यप्राय वाटत होते. तात्यारावांच आपल्या वाहिनीशी नातं लहानपणापासुन कीती हळवं होते ह्याविषयी नंतर संदर्भ येइलच, तर अशा अत्यंत पुजनीय वहीनीला आपल्या अटकेची कटु बातमी सांगण्याचं कठोर कर्तव्य करत असतानाच, आपण हातात घेतलेल्या कार्यातील उदात्त, दिव्य, श्रेयस मर्म विशद करणारं असं हे "माझं मृत्युपत्र" तात्यारावांनी लिहीलं.
त्यांनी लंडनमधल्या ब्रिक्स्टन जेलमधुन लीहिलेलं त्यावेळेला त्यांच्या जन्मातलं बहुदा शेवटचं ठरणार असलेलं हे काव्य.
( ह्या संपुर्ण काव्यात चार सर्ग आहेत, मी रसग्रहणासाठी शेवटचे दोन सर्ग घेतलेले आहेत. विवेचनात संदर्भासाठी पंक्तीक्रमांक टाकत आहे, रसभंग होणार नाही अशी अपेक्षा)
हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले, - १
तुतेंची अर्पिली नवी कविता रसाला, लेखप्रती विषय तुंचि अनन्य झाला . - २
त्वत्स्थंडिली ढकलिले प्रिय मित्रसंघा, केले स्वयें दहन यौवन-देह्-भोगा - ३
त्वर्य नैतिक सुसंगत सर्व देवा, तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा. - ४
त्वत्स्थंडिलीं ढकलिलीं गृहवित्तमत्ता, दावानलांत वहिनी नवपुत्रकांता - ५
त्वत्स्थंडिली अतुल्-धैर्य वरिष्ठ बंधू, केला हवी परमकारुण पुण्यसिंधू - ६
त्वत्स्थंडिलावरी बळी प्रिय 'बाळ' झाला, त्वत्स्थंडिली बघ आता मम देह ठेला - ७
हें काय! असतो बंधु जरी सात आम्ही, त्वत्स्थंडिलींच असते दिधलें बळी मी - ८
संतान ह्या भरतभूमिस तीस कोटी, जे मातृभक्ति-रत सज्जन धन्य होती. - ९
हे आपुले कुलही त्यामधि इश्वरांश, निर्वंश होउनी ठरेल अखंड-वंश - १०
की ते ठरोंही अथवा नठरो परंतू , हे मातृभू अम्ही असो परिपुर्ण-हेतू - ११
दिप्तानलात निज मातृविमोचनार्थ, हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ - १२
ऐसें विसंचुनी अहो वहिनी! व्रतांते, पाळोनि वर्धन करा कुल-दिव्यतेते - १३
श्रीपार्वती तप लरी हिमपर्वतीं ती, की विस्तवात हसल्या बहु राजपूती - १४
तें भारतीय अबला-बलतेज कांही, अद्यापि ह्या भरतभूमींत लुप्त नाही - १५
हें सिद्ध होइल असेंच उदार उग्र, वीरांगने तव सुवर्तन हो समग्र - १६
माझा निरोप तुज येथुनी हाच देवी, हा वत्स वत्सल तुझ्या पदिं शीर्ष ठेंवी - १७
सप्रेम अर्पण असो प्रणतीं तुम्हांते, आलिगन प्रियकरां मम अंगनेतें. - १८
की घेतले व्रत न हें अम्हि अंधतेने, लब्ध-प्रकाश इतीहास्-निसर्ग-मानें, - १९
जें दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे, बुद्ध्याचि वाण धरिंले करिं हे सतीचे. - २०
हे मातृभूमी, आतापर्यंत माझे मन, बुद्धी कविता, लेखन, वक्तृत्व हे सगळं फक्त तुझ्याच कारणी लावलं आहे, ह्या सगळ्यातुन फक्त तुझंच वर्णन, तुझीच सेवा करत आलो आहे -------- १,२
तुझं कार्य म्हणजे सर्व देवतांना आवडणारं पवित्र कर्तव्य , आणि तीच इश्वरसेवा मानुन आजपर्यंत मी माझे प्रिय स्नेही, मित्रवर्ग तुलाच अर्पण केले, माझे स्वतःच्या तारुण्यसुलभ यौवनलीला स्वतःच्या हातानी जाळुन भस्म केल्या केवळ तुझ्यासाठीच. --------- ३,४
तुझ्याच पुजेमधे माझे घर, पैसा, संपती अर्पण केली, माझा लहान मुल, माझी पत्नी आणि वहीनी, तुझ्या सेवेच्या वणव्यातच ढकलुन दिली. तुझ्या अग्नीमधे माझा अतीधैर्यवान मोठा भाउ आणि माझा लहान भाउ 'बाळ' ह्याचीही आहुती दिली. व आता माझा देहही मी त्याच यज्ञामधे समर्पण करत आहे.-------- ५,६,७
पण ह्यात मोठे ते काय, आम्ही जरी सात भाउ जरी असतो, तरी आम्ही सर्व तुझ्याच सेवेत बलिदान करुन कृतार्थ झालो असतो. कारण हे मातृभू तुझ्या तीस कोटी संतानापैकी जे कोणी तुझ्यासाठी बलीदान करतात त्यांचच आयुष्य सार्थकी लागतं. आणि आपला हा वंश सुधा त्या उदात्त इश्वरकार्यासाठीच निर्वंश होउनही अमर ठरेल. -------- ८,९,१०
आणि अस नाही झालं तर? तरीही खंत नाही. आम्ही मात्र आता संपुर्ण समाधानी आहोत, तुझ्या उद्धारासाठी, ह्या पवित्र कर्तव्यासाठीच आम्ही ह्या वणव्यात आमाचा स्वार्थे जाळुन केव्हाच कृतार्थ ठरलो आहोत. -------- ११,१२
तेव्हा हे लक्षात ठेउन माझे प्रिय वहिनी, आता तुम्हालाही या पवित्र कर्तव्याचे पालन केलेच पाहिजे. तुम्हीही हिमालयावर जगादोद्धारासाठी तप करणार्‍या त्या पार्वतीप्रमाणे, अथवा स्वधर्मरक्षणासाठी हसत हसत ज्वालाजोहार करणार्‍या रजपुत स्त्रियांच्या प्रमाणे धिराने हे कर्तव्य करुन आपल्या वंशाचा उद्धार कराल.-------- १३,१४
तुमच्या ह्या अतीधैर्यशील व्रतपालनाने ते दिव्य भारतीय स्त्रियांचे तेज अजुनही ह्या देवभूमीत जागें आहे हेच सिद्ध होइल. -------- १५,१६
बाकी काय सांगावे, वहिनी - हाच माझा शेवटचा निरोप समजा, तुमच्या चरणावर डोकं ठेउन वंदन करणार्‍या ह्या तुमच्या मुलाला आषीर्वाद द्या. माझ्या लाडक्यांना आणि माझ्या पत्नीलाही हाच माझा शेवटचा संदेश. --------१७,१८
कारण आम्ही आंधळेपणाने हा निखार्‍यांचा मार्ग चोखळला नाहिये, आमच्या जाज्वल्य इतीहासाला आणि निसर्गदत्त कर्तव्याला साजेसंच असं हे दिव्य, दाहक, पवित्र कर्तव्य आम्ही सर्व विचाराअंतीच जाणतेपणानेच तर स्वीकारलय. -------- १९,२०
ह्या दाहक आणि करुण काव्यावर माझ्या क्षीण लेखणीतून कोणतेही भाष्य करण्याचा वेडा प्रयत्न मी करणार नाही, अर्थानं स्वयंसीद्ध अस हे काव्य केवळ संधी सोडवुन आणि थोडयाश्या सोप्या स्वरुपात मांडुन इथेच थांबतो...