Sunday, December 22, 2013

व्हेइकल

एसीचा एकसुरी आवाज, आणि हॉटेलच्या खोलीचा पिवळा पंडूरोगी प्रकाश, सेकांदामागून सेकंद, तासामागून तास चालूच..
एकटेपणा शरीरावर चढत जातो शेवाळासारखा. मनावर अंधाराचे थरच्याथर चढत रहातात बुळबुळीत बुरशीसारखे. आतल्याआत आक्रसून जायला होतं, खोल अंधाऱ्या गढूळ पाण्यातल्या कोशातल्या किड्यासारखं.
त्या कोशातल्या अंधारातून बाहेरचं रंगीत जग दिसतं, पण कोश सोडता येत नाही, अनामिक आदिम भीती वाटत रहाते...
एखादा जरी रंगीत कवडसा पडला तरी, एखादा नवखा जीव उत्सुकतेने पाहू लागला तरी, जीव घाबरतो, अजून आक्रसून घेतो आतल्याआत.
तशी हालचाल चालू असतेच, जिवंतपणा असतो, पण तो असतो अतिशय भौतिक, जनावराच्या पातळीवरचा. जवळून जाणारा एखादा भरकटलेला जीव हळूच पटकन कोशाबाहेर येऊन मटकावण्याचा पराक्रमी जिवंतपणा.
दोनच आदिम अवस्था, लाखो वर्षे चालत आलेल्या, दुसऱ्या लहान अशक्त जीवाला पाहून भूक लागणे किंवा मोठ्या बुलीइंग जीवाला पाहून घाबरून जाणे. या दोनच शाश्वत अवस्था, बाकी उत्क्रांती, बुद्धी वगैरे सब झूठ.. जगाचं गाडं चालू या दोन चाकांवरच.
बाकी सगळा हवेतला पसारा, सगळे रंग, सगळा नाद सगळे आकार अत्यंत मायावी, अशाश्वत, पोकळ... आणि केव्हातरी आयुष्यात एकदा तिसरी तडफड.... मैथुन. संपला कोट्यावधी जीवांचा सारांश.. आहार भय आणि मैथुन..
निसर्गाने घालून दिलेल्या तीन रेषा.. तीन मर्यादा... अब्जावधी वर्षे लागली एका पेशीपासून माणूस बनायला पण तीन रेषा अजूनही त्याच आहेत. या अब्जावधी वर्षात कोट्यावधी जमाती जन्मल्या आणि मेल्या, या तीन बिदुंच्या आजूबाजूने रंगांचे, आकारांचे आणि आवाजांचे खेळ करत.
आपण काय वेगळे आहोत? मासे रंग रचतात, किडे आवाज काढतात, प्राणी आकार फुगवतात तसेच आपण..
टीचभर आयुष्यात काहीही केलं, अगदी काहीही, एकट्याने अथवा समूहात, तरी मूळ प्रेरणा तीनच. सुटका नाही..
मारे बडेजाव कराल तत्वज्ञानाचा, कलेचा... या तीन ठसठसणार्‍या अंधार्‍या बिदुंपासून कसे सुटाल, तुमच्या आतच आहेत ते, आणि तुमचा घास घेत आहेत आणि पुढे सरकत आहेत, तुमच्याच पेशींमधून निघालेल्या पुढच्या पेशीसमुहाकडे सतत ठामपणे..
तुमचं एक व्हेइकल केलं आहे निसर्गाने, काळाच्या अनंत रेषेवर सरपटायला वापरण्यासाठी. तुम्ही मोडून पडाल, मग पुढचं व्हेइकल, मग त्या पुढचं.. मागील पानावरून पुढे चालू, अनंत वर्षे, व्हेइकलला महत्व नाहीच, काळाच्या रेषेवर पुढे सरकण्याला महत्व...
इतकं नागडं निर्घृण सत्य समजल्यावरही रंग, आकार, आवाज, गोंगाट चालूच, काळाच्या अनंत रेषेवर कोण जास्त वाजतगाजत जातो याचीच किळसवाणी मिरवणूक सतत चालू....

नाटकामागचं नाटक - २

तर असे लपलपते फ्लॅट तयार होउन मोडक्या कंबरेनं त्यांच्याकडं बघितलं की खूप्खूप समाधान वाटतं..
नाटक हळूहळू आकाराला येत असतं, मधूनच एखादा वा एखादी चिडून निघून जाणं, मग परत शोधाशोध वगैरे चालूच असतं. साऊंडट्रॅकची सीडी तयार झालेली असते, त्यावर पण संवाद चालू होतात.. हे दहापंधरा दिवस म्हणजे तालमीतलं क्रीम असतं.. नाटक जमणार की हापटणार हे खरंतर इथंच ठरतं.
इथे नाटकातलं नाट्य सापडायला लागतं..आतापर्यंत संवाद पाठ झालेले असतात, अ‍ॅक्शन, फॉर्मेशन, पॉज, पोझिशन, लूक, टायमींग, लिसनींग, पंच, लाफटर, एन्ट्र्या वगैरे भरायला लागतात, प्रत्येक नट मग तो कितीही पादरापावटा असला तरी शब्दामागचं काहीतरी शोधायला लागतो..
एरवी तालमीत दोन डायलॉगच्या मधे होणार्‍या कॉमेंट्स, गप्पा, शिव्या बंद होत जातात.. प्रयोग अंगात हळूहळू भिनत असतो.. याच काळात एके दिवशी दोनतीन गब्रू एखादा प्रसंग असा काही उठवतात की सगळा हॉल अचानक निशब्द होउन जातो..
अचानक काहितरी उत्कट सापडलेलं असतं..
दोन मिनिटं शांततेत जातात नंतर ओल्या डोळ्यांनी एकमेकांना मारलेल्या मिठ्या आणि 'भ' च्या बाराखडीतलं कौतूक यातच उरलेली रात्र जाते..आणि तालमीचा अचानक प्रयोग होउन जातो… साला बाकी कसली नशा तर केली नाही आजपर्यंत पण त्या एका रात्रीची नशा मात्र उतरता उतरत नाही..
प्रयोग हातात येत असतो.. पण बाकी काही अजून तयार नसतं.. स्पर्धा असेल तर ठीक आहे पण स्वत:चा प्रयोग असेल तर इतर सगळे सोपस्कार आलेच, प्रायोजक मिळवणे, 'वाड्यावर' जाऊन थिएटर सवलतीच्या दरात मिळण्याची व्यवस्था करणे, जाहिराती डीजाईन करणे, संपादकाला फुकट पास देऊन जाहिरात कमी खर्चात छापली जाण्याची तजवीज करणे, एकदोन पत्रकारांना जेवायला घालून, एखादी कौतुकाची बातमी छापून आणणे, नाटकाची तिकिटे डीजाईन करणे, नाटकाच्या जाहीरातीचे फ्लेक्सबोर्ड डिजाईन करणे, ते एखाद्या प्रींटरकडून स्वतः उभं राहून प्रिंट करून आणणे, ते फ्लेक्स्बोर्ड लावायला मेटलच्या फ्रेम मिळवणे.
गावातून चक्कर मारून कुठल्या चौकात जास्त पब्लिशीटी होइल याचा अदमास बांधून, त्या चौकातला आधीचा बोर्डचे बांबू काढण्यापुर्वी मांडववाल्याला गाठणे, त्यालाच शेदोनशे रुपयात पटवलं तर नवीन परात बांधायचा त्रास वाचतो, आहे त्याच बांबूच्या परातीवर आपला बोर्ड लटकवून द्यायचा, हे अर्थातच रात्री बारा वाजल्यानंतर...
मग दुसर्‍यादिवशी सकाळी दहावाजता एका भडव्याचा फोन येतो, तो नगरपालिकेतील अतीक्रमण विभागाचा म्हणे अधिकारी असतो, मग तो सक्काळसक्काळ नडतो... एरवी त्याच्या बेडरूममधे अतीक्रमण झालं तरी झोपतो निवांत साला आणी आमी कॉलेजची पोरं म्हणून माज दाखवतो होय रे..
मग आम्हीपण इरेला पेटतो, डायरेक 'वाड्यावर' जातो, नाटकाला आमंत्रण द्यायचं कारण काढून.. हा नवीन त्रास म्हाराजांच्या कानावर घातला.. की तिकडून थेट नगराध्यक्षाला वा 'शीवोसायबाला' फोन... च्यायला.. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.. मग आम्ही त्याच्या नाकावर टीच्चून शीवोसायबाला आमंत्रणाचे दोन पास देऊन येतो..
मग परिनिरीक्षण मंडळाचं पत्र लागतं, पोलीसची परवानगी लागते.. पोलीसांचा फारसा त्रास नसतो, नाटकवाली पोरं म्हणून ते फार त्रास देत नाहीत, आमचा नेहेमीच ओळखीचा पीआय गाठला की तो सगळं काम बसल्याबसल्या करून देतो वर प्रेमानं बसवून घेउन चहा पाजतो. त्यात एखादा एस्पीसाहेब मराठी आणि हौषी निघाला तर तो दोनाचे चार पास हक्कानं मागून घेतो आणी नाटकाला बायकापोरांसकट आवर्जून येतो.
मग प्रयोगाची तारीख जवळ येत असते, तेव्हा नेमका नाटकाचा स्थानीक कॉन्ट्रॅक्टर काहितरी कुरापत काढतो, त्याला नाटक देऊन वट्ट पैसे घेउन पोरांनी मोकळं व्हावं असा त्याचा डाव.. पण आता माघार नाही.. तिकिटाची पुस्तकं छापून येतात, चार दिवस आधी एक पोरगा सकाळ संध्याकाळ 'शाहुकला'ला प्लॅन घेऊन बसवावा लागतो...
गावातल्या प्रतिष्ठीतांचे, नावजलेल्या डॉक्टरांचे, वकीलांचे, जुन्याजाणत्या माणसांचे फोन येत असतात्, आपुलकीनं पुढच्या तिकीटांची मागणी केली जाते, आम्हीही मग शब्दाचा मान ठेवून वेळात वेळ काढून कुणीतरी जाऊन तिकीटे देउन येतोच, अहो या लोकांमुळे तर गावाचं गावपण असतं, काही चुकलंमाकलं तरी कौतुकाचा, प्रेमाचा हातही फिरणार असतो.
नाटक जवळपास पुर्ण बसत आलेलं असतं, नेपथ्य तयार झालेलं असतं, कपडेपट तयार असतो, जाहिरात आलेली असते, फ्लेक्स लागलेले असतात, तिकिटे बर्‍यापैकी खपलेली असतात, पोरं दिवसरात्र जिवाला जीव देउन काबाडकष्ट करत असतात.. आणी असाच अचानक आल्यासारखा एकदम नाटकाचा दिवस उजाडतो..
क्रमशः

नाटकामागचं नाटक - १

इतरत्र एका चर्चेत नाटकाचा उल्लेख आला, आणि एक प्रतीसाद लिहायला घेतला, लिहितालिहिता वेगळा लेखच तयार होईल असं वाटलं म्हणून इथे लिहितोय
कळतं मला आपलं थोडंसं नाटकातलं.. पाहिली आहेत थोडी नाटकं.. कधी अडीअडचणीच्या प्रसंगी थोबाड रंगवून उभाही राहिलेला आहे विंगेत, तिथून धडपडत स्टेजवर, आणि तिथून परत धडपडत विंगेत...
पण नाटकाची एक धगधगती बाजू मात्र अगदी व्यवस्थीत, अगदी चटके बसतील इतक्या जवळून पाहिली.. ती म्हणजे त्या आयताकार स्टेजबाहेर, आणि दिव्यापाठीमागे अंधारात एक मोठं नाटक चालतं ते.
स्पर्धेच्या तारखेवर डोळे ठेवून असणे अथवा स्वता:च्याच ग्रूपच्या नाटयमहोत्सवाची तारीख ठरवणे, ती ठरल्यावर नेहेमीचे खंदे भिडू गोळा करणे,
प्रत्येकाचं मत घेऊन, नाटकाचा मूड, ढोबळ कास्टींग, वगैरेचा अंदाज घेउन साताठ संहीता गोळा करणे,
मित्राच्या रिकाम्या फ्लॅट्वर अथवा एखाद्या वाड्यातल्या एखाद्या खोलीत रात्रभर सगळे जमून सगळ्या संहितांच सँपल वाचन करणे. प्रत्येक संहीतेमधल्या मजबूत अथवा कमकूवत जागा यावर चर्चा करून दोनतीन संहीता फायनल करणे,
साधारण लूज कास्टींग इथेच होते, काहि भुमीका क्लेम केल्या जातात काही गळ्यात मारल्या जातात, बहुतेक वेळचा अनुभव असा की, गळ्यात मारलेलीच भुमीका सगळ्यात भाव खाऊन जाते. आणि क्लेम केलेली खड्ड्यात जाते.
संहीता निवडली की त्याचा दिग्दर्शक ठरवणे, एकदोन हुकूमी दिग्दर्शक असतातच, त्यातला एक फायनल केला की त्याला संहीता आवडत नाही, मग ती बदलावी लागते, (इथे मल्टीपल लूप टू 'संहीता ठरवणे' स्टेप). मग त्याला कास्टींग आवडत नाही, ते थोडंसं बदलावं लागतं,
या सगळ्यामधे कुणाचं लफडं कुणाशी चालू आहे, कुणाचं कुणाशी पटत नाही, मागच्या वेळेला कुणी टांग मारली होती, कोण माजला आहे, कोण त्या ह्यांचा खास आहे, वगैरे सगळं लक्षात ठीवावं लागतं,
या सगळ्या गदारोळातून एकदाची संहीता आणि कास्टींग फायनल होतं. आणि त्याचदिवशी असं लक्षात येतं की प्रयोगाला खूपच कमी दिवस राहिलेले आहेत, मग इतकं अवघड स्क्रिप्ट निवडल्याबद्दल मला दोष देण्यात येतो, मग आता तालमी तरी व्यवस्थीत करा असं मलाच सांगण्यात येतं.
मग तालमीसाठी जागेचा शोध...
एखाद्याची रिकामी खोली, एखादा रिकामा फ्लॅट, एखाद्याच्या घराचा मोठा हॉल, एखादा पडका वाडा, गुळाचं गोडावून, खाजगी मालकीचं मंदीर यापैकी एक तालमीला मिळवावं लागतं, त्या जागा मालकाच्या नाकदुर्‍या काढल्यावर एकदाचा तालमीचा नारळ फुटतो..
मग तालीम सुरू होते, त्या नाटकात जर दोनपेक्षा अधीक पात्रे असतील, एखादा ड्यान्स वगैरे असेल तर जागामालक अचानक त्याच्या म्हातारीला आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार करतो, मग पुन्हा मल्टीपल 'लूप टू जागा शोधणे'
प्रयोगाची तारीख जवळ येतच असते, जागेचा प्रश्न कसातरी सुटतो, मग तालीम वेग पकडते...
बहुतेक सगळी पात्रे ही दिवसाढवळ्या कुठेतरी कॉलेज, मामाचं किराणामालाचं दुकान, बापाचं चहाचं हॉटेल, मेडीकलचं दुकान, सराफी पेढी, कॉम्पुटरदुरुस्तीचा व्यवसाय वगैरे व्यवधानात व्यस्त असल्यामूळे तालमी नेहेमीच रात्री कराव्या लागतात.. एखादं नाटक असेल तर ठीक आहे पण नाट्यमहोत्सवात तीन नाटके करताना रात्री नऊला तालीम सुरू करून सकाळी सहाला संपवावी लागते..
नाटक आता जरा बाळसं धरू लागतं..
तेवढ्यात कुणालातरी आठवण येते, की आपण लेखकाची परवानगी नावाचा सोपस्कार अद्याप केलेलाच नाही, मग लेखकाचा फोननंबर आणी करंट पत्ता याची शोधाशोध.. तो काही मिळत नाही, मग पुस्तकातल्याच पत्त्यावर एक पत्र आणि एकशेएक रुपये मानधनाचा चेक पाठवला जातो..
तालमीत कोण कमी पडतोय, कोण जड होतोय, कोण झोपतोय, कोण कचकचीत,कोण ऐनवेळी पो घालणार यावर रोज रणकंदन आणि उखाळ्यापाखाळ्या. (या प्रसंगी मात्र माझ्या थोड्याशा हुकूमशाही स्वभावाचा आणि माजुर्डेपणाचा फायदा खूप व्हायचा..)
मग कपडेपट, साउंड, आणि नेपथ्य...
नाटकातल्या मुलींचे कपडे जमवणं आणी नाटकात काम करायला मुली जमवणं यात जास्त अवघड काय हे मला अजूनही ठरवता आलेलं नाहिये..
साउंडवाला जो निवडलेला असतो त्याला सगळ्या प्रसंगात बॅकग्राउंडला सनईच वाजवायची हुक्की येते, सनई नसेल तर बॅगपायपर.. मग कुणाचातरी कॉप्युटर पकडायचा, साउंड एडीटींग सॉफ्ट्वेअर दोन दिवसात मीच शिकायचं आणि सगळे ट्रॅक परत एडीट करायचे..
आता नेपथ्य,
दिग्दर्शक सोडून सगळ्यांच मत असतं की नेपथ्य एकदम साधं करायचं यावेळेला, पण दिग्दर्शक अडून बसतो.. त्याचं म्हणणं पडतं की नेपथ्य जबरा नसेल तर पहिला अंक पालथा पडेल आणि दुसरा अंक उठणारच नाही. नेपथ्य करायचं ठरतं... काय करता.. जमतील तेवढ्या टूव्हीलर घेऊन जत्रा हार्डवेअर च्या दुकानात... (गावाकडे नेपथ्य भाड्यानं मिळत नाही भाऊ, स्वत: खपून बनवावं लागतं..)
मग प्लायवूड, लाकूड, खिळे वगैरे खरेदी, ते घेऊन ओळखीच्या सुताराकडे.. हा एकटाच माणूस असा असतो की जो प्रोफेशनल असूनही त्याला नाटकाच्या कुठल्याही कामात मनापासून विन्ट्रेष्ट असतो.. तो मनापासून आठ बाय तीन चे फ्लॅट बनवून देतो..
ते फ्लॅट घेउन जत्रा पुन्हा कुणाच्यातरी बागेत अथवा गोडावून मधे.. अहो नुसते फ्लॅट तयार करून चालत नाहीत, ते रंगवावे लागतात.. रात्री सगळी पुर्वतयारी होते, डिस्टेंपरचे डबे, ब्रश, दारे खिडक्या रंगवायला एक त्यातल्यात्यात बरा चित्रकार जमवले जातात.. रात्री अकरा वाजता डिस्टेंपरचा डबा फुटतो आणि लक्षात येतं की थिनर आणायचा राहिला.. मग एखाद्या हार्डवेरवाल्या मगनलाल मालपाणीच्या पोराला फितवून, दुकान उघडून थिनर आणायचा..
सगळे फ्लॅट जमीनीवर आडवे टाकून कंबर मोडेपर्यंत पहिला हात मारायचा, रात्रभर पाठीचा आणि कंबरेचा भुकना पडतो.. मग दुसर्‍यादिवशी रंग वाळू द्यायचा, मग रात्री परत दुसरा हात... एवढं सगळं करून नाटकाचे फ्लॅट नावाची लपलपणारी वस्तू तयार होते..
क्रमश:

हवेतल्या गोष्टी - ३ - पिंजर्‍याचे दार उघडावे..

पावसाळ्यातील अशीच एक फ्लाईट, अगदी पहाटे पहाटे निघालो होतो. वास्तविक पहाटेची फ्लाईट म्हणजे माझी अगदी आवडती. आजूबाजूची रात्रीबेरात्री उठून विमानतळावर आलेली मंडळी, पुन्हा झोपेच्या आधीन होत असताना, मी टक्क जागा असतो.
ढगांच्या पांढऱ्या समुद्रावर जाऊन शांतपणे उगवता सूर्य पाहणं मोठं लोभसवाण असतं. अजून दिवसाच्या ट्राफिकनं रविराज कावलेले नसतात, नुकतेच क्षितिजावरुन बाहेर येत ढगांच्या मऊशार पाठीवर आपली किरणं आजमावून पहात असतात. तो सगळा सोनेरी सोहळा माझ्याही कोत्या मनात भव्यतेची, मंगलाची छाप दिवसभराकरता ठेऊन जातो.
पण आज मात्र सुर्यादेवांना सुट्टी, करड्या काळ्या ढगांचीच सत्ता आकाशात. आज दिवसभरात काही चांगलं घडूच शकणार नाही असा माहौल..
खराब हवामानाची नेहेमीची सूचना देऊन झाली आहे. मंडळींच्या चेहेऱ्यावर चिंतेच्या छटा चढू लागल्यात. विमान ढगात शिरतं. हादरु लागतं. लोकांच्या नेहेमीच्याच प्रतिक्रिया मी जरा वैतागूनच पहात राहतो.
माझ्या शेजारच्या जागेवर एक आजोबा, ते एकट्यानं प्रवास कसे करतायत ह्याचं मला आश्चर्य वाटलं होतंच. मी त्यांच्याकडे त्यांच्या नकळत निरखून पाहू लागतो. सुरकुतलेला चेहेरा. अंगात स्वेटर, हाफशर्ट. वय साधारण पासष्ठ ते सत्तरच्या आसपास. पण चेहऱ्यावर, डोळ्यात काहीतरी विलक्षण गोड भाव..
काही लोकांच्या चेहेर्यावरच एक तृप्त, समाधानी भाव कोरलेला असतो, म्हणजे बघा.. चंद्रकांत गोखले यांचा चेहेरा आठवतोय, तसा काहीसा भाव... माझ्याकडे बघून एक छानसं कुणालाही जिंकून घेणारं स्मितहास्य..
ते शांत आहेत. विमान हादरु लागल्यावर ते डोळे मिटून घेतात, पण चेहेऱ्यावर एकही जास्तीची सुरकुती उमटत नाही.. तसाच प्रसन्न, शांत चेहेरा.. माझी विचाराश्रुन्खाला नेहेमीप्रमाणे चालूच.. आत्ता या आजोबांच्या मनात काय चालू असेल...
मृत्यूची प्रकर्षानं जाणीव होत असेल का इतरांसारखी.. जर तशी जाणीव होत असेल तर नक्की काय विचार उमटत असतील.. खेद असेल कि तृप्तता... काही करायचं राहिलं याची रुखरुख असेल... की एवढं करू शकलो, एवढ्या लांब आलो याचं समाधान असेल.. आप्तांची आठवण येत असेल का... का पैलतीरावर आप्तांचीच भेट होणार म्हणून उत्सुकता असेल.. आत्तापर्यंतच्या वाटचालीचा कोलाज येत असेल का विचारांच्या पटलावर.. की कोरी पाटी असेल नवा अनुभव घ्यायला..
मी असा सामोरा जाऊ शकेन का... नाही जाणार कदाचित... का म्हणून? अजून खूप जगायचंय म्हणून..जगायचय म्हणजे नक्की काय करायचय.. जास्ती दिवस श्वास घेणं म्हणजे आयुष्य का? म्हणजे मृत्यूला सामोरं जाताना वय महत्वाचं कि वृत्ती..
आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय, जन्मल्यापासून मरेपर्यंत एखाद्या मांजराच्या पिलासाराखं पायात तडमडत रहातं ते, अडखळायला होतंच पण असतं ही लोभसवाणं..

अजून खूप जगायचंय, खूप पहायचय.. पण तरीही असंच म्हणावसं वाटतं...

आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.
कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,
दिली दुर्दैवाला पाठ; अन्‌ संकटाला छाती.
सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,
बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.
जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,
जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.
येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
-संदीप खरे

हवेतल्या गोष्टी - २ : ती

फ्लाईट लेट किंवा रद्द होणं हां नेहेमीचा कार्यक्रम, यात मला तसं नवीन काहीच नाही. पूर्वी असं काही झालं की मी एअरलाईन स्टाफवर आरडाओरडा करून माझा राग, फ्रस्ट्रेशन काढत असे, आता तसं करावसं वाटत नाही.
पण यावेळची गोष्ट खरंच निराळी होती.
मी गेले सतत २८ दिवस घराबाहेर होतो. घरून निघालो तेव्हा अवघ्या सहा दिवसाचा प्लान होता, पण पुढे प्रवास वाढतच गेला. गेल्या अठ्ठावीस दिवसात चार शहरं आणि आठ फ्लाईट झाल्या होत्या. त्यातही गेले १० दिवस तर घराची ओढ खुपच अस्वस्थ करत होती. मला अगदी डेस्परेटली घरी जायचं होतं. एक क्षणभरही आपल्या माणसांपासून दूर रहायला नको वाटत होतं, जीव कासावीस झाला होता घरट्यात जाण्यासाठी.
खरं तर मी एवढा होमसिक वगैरे नाही, पण यावेळेला मात्र परिस्थिती वेगळी होती, मनस्थिती वेगळी होती. कधी एकदा घराची बेल वाजवतोय आणि बायकोचा हसरा चेहेरा डोळे भरून पाहतोय, असं झालं होतं. शुक्रवारी काम आटोक्यात आलं. मी रात्रीची फ्लाईट बुक करायला सांगितली. ऐनवेळेला ती फ्लाईट मिळाली नाहीच. शनिवारी पहाटे सहा वाजताच्या फ्लाईटचं तिकीट मिळालं.
रात्रभर जागाच होतो. पहाटे तीन वाजताच हॉटेलातून उठून बेंगलोर विमानतळावर पोचलो. चेकइन करून किंगफिशर लाउंजमधेही न बसता अधीरपणे बोर्डिंगगेटजवळच जाऊन बसलो. बरोब्बर साडेपाच वाजता फ्लाईट स्टेटस चेंज झालं, “scheduled” वरून नुसतंच “delayed”. हरामखोर साले. नेमकं आजच..
बोर्डिंगगेटच्या टेबलापाशी एकदम गलका झाला, लोक आपला संताप त्या चारपाच पोरापोरींवर काढू लागले. ते बिचारे सगळ्यांना समजावून सांगत होते, “तांत्रिक बिघाड आहे”, “फ्लाईट इंजिनिअरने विमान सुरक्षित घोषित केल्याशिवाय फ्लाईट सोडता येत नाही”, “तुमच्याच जीवाला धोका आहे” वगैरे वगैरे. माझ्या बुद्धीला ही सगळी तांत्रिक कारण पटत होती, पण मनाचं काय...
अनुभवानं हेही माहीत होतं की या प्रकारच्या बिघाडामुळे फ्लाईट रद्द होण्याची शक्यताच जास्त होती. काही समजत नव्हतं काय करावं ते. हताश होऊन लाउंजच्या दिशेने पाय ओढत चालू लागलो. लाउंजच्या रिसेप्शन काउंटरला बसलेल्या सगळ्या पोरी एकजात उर्मट आणि इतक्या आखडू का असतात कुणास ठाऊक. आपल्याच तोऱ्यात असतात. आपल्याला एअरलाईननं नोकरीला ठेवलंय म्हणजे, सगळ्या प्रवाशांसमोर मान ताठ करून, उर्मटपणानं हनुवट्या उडवून, नाक फेंदारून दाखवलंच पाहिजे असा दंडकच आहे जणू.
एका फटाकड्या पोरीनं मला तोऱ्यात मेंबरशीप कार्ड मागितलं, मी जरा नाखुशीनेच कार्ड आणि बोर्डिंग पास काढून दिला. तिनं अत्यंत उर्मट हसून सांगितलं, की “सर, तुम्ही आता लाउंज मधे वेळ घालवलात तर तुम्हाला बोर्डिंगला उशीर होईल”.
झालं, इतका वेळ आवरून ठेवलेला संताप बाहेर पडला, त्या दोन फटाकड्या पोरींना मी झाड झाड झाडलं. एकतर त्यांच्या सारखं खोटंखोटं तोंडदेखल हसण्याचा प्रचंड रागराग होत होता आणि त्यात त्या मला नियम समजावून सांगत होत्या. माझा आरडाओरडा ऐकून बिचाऱ्या तोंड पाडून बसल्या. एव्हाना फ्लाईट डीले झाल्याचं त्याना बहुतेक कळालं होतं.
मला प्रचंड राग आला होता. खूप असहाय्य वाटंत होतं. मला कुठल्याही परिस्थितीत पुण्याला पोहोचायचं होतं. मी माझं फ्रीक्वेंट फ्लायर कार्ड वापरून, माझ्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करायला सांगणार होतो. ते अधिकार ड्युटी मॅनेजरला असतात. मी ओरडूनंच ड्युटी मॅनेजरला घेऊन यायला सांगितलं. कारण मला परत “आमाला पावर नाय” हे ऐकायचं नव्हतं (आठवा: म्हैस). त्यातली एक सुंदरा बिळात उंदीर पळावा तशी पळाली.
दोनच मिनिटात ड्युटी म्यानेजर माझ्या समोर उभी राहिली. माझं बोलणंच खुंटलं. सुंदर, नाजूक, २६-२७ वर्षाची एक युवती लाल-काळ्या रंगाच्या पायघोळ ड्रेसमधे माझ्यासमोर उभी होती.
हसरा, उजळ चेहेरा. मोठे, काळेभोर, बोलके डोळे. केस मागे बांधलेले. हातावर हात ठेऊन उभं राहायची पद्धत, आत्मविश्वास, सगळंच त्या कचकड्याच्या दुनियेत नवखं होतं. ती हसतमुखानं आणि नम्रतेनं मला “येस सर, हाऊ मे आय हेल्प यू” विचारत होती. त्या हसण्यामधे आत्मविश्वास तर होताच, पण खिळवून ठेवणारा निरागसपणाही होता. मला अगदी ठरवूनही चिडता आलं नसतं तिची अवघडलेली अवस्था बघून...
मी तिलाच बसायला सांगितलं. ती समजून मंद हसली. मग तिला बयाजवार सांगितलं, काय झालंय ते. मला इतक्या डेस्परेटली घरी का जायचंय याचं खरं कारण मला तिला सांगावसं वाटलं, मी ते सांगितलंही. ती पुन्हा एकदा खूप मोहक, आश्वासक हसली. “येस सर, आय कॅन अंडरस्टँड, आय विल ट्राय माय बेस्ट”
तिनं संगणकावर पटापट काही काम करायला सुरुवात केली. काही क्षणातच मला सांगितलं, की पुण्याला जाणारी पुढची किंगफिशर फ्लाईट संध्याकाळी सात वाजता आहे. हे सांगताना तिचा स्वर नकळत हलका झाला होता. आवाजातली निराशा, सहानुभूती लपत नव्हती. एव्हाना माझाही राग निवळला होता. ती मला वेगवेगळे पर्याय सुचवू लागली.
वास्तविक फ्लाईट लेट झाल्यावर, तिची जबाबदारी फक्त पुढची फ्लाईट कधीची आहे हे सांगायची होती, निर्णय मलाच घ्यायचा होता. उर्मटपणानं सॉरी म्हणली असती आपल्या कामाला लागली असती तरी फार काही बिघडलं नसतं... पण ही खरंच निराळी होती... शेवटी खूप उस्तवारी करून तिनं माझ्यासाठी एक बेंगलोर-मुंबई फ्लाईट शोधून काढली. मुंबईहून त्यांची गाडी पुण्यापर्यंत अरेंज केली.
मी तिची ठामपणे होणारी हालचाल, फोनवरून सगळ्या एअरलाईन कडे चौकशी करण्याची लगबग, प्रत्येक नकारानंतरची चेहेऱ्यावरची न लपणारी निराशेची छटा, निर्णय घेण्यातली तत्परता. हे सगळं मी मोठ्या कौतुकानं पाहात होतो. माझ्या नजरेतलं कौतुक, कृतज्ञता तिनं कदाचित ओळखली असावी. पुन्हा एकदा ते मंतरलेलं हास्य फेकत ती म्हणाली “इट्स माय ड्युटी सर”.
तिनं जाताना मला हात हलवून ‘बाय’ केलं. मी शेवटी वेळेवर घरी पोचणार होतो, पण याचा आनंद मला तिच्याच बोलक्या डोळ्यांमध्ये जास्त दिसत होता.. आता खोटंखोटं हसायची पाळी माझ्यावर होती. थँक्यू म्हणायलाही माझा आवाज फुटत नव्हता. डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या.
आणि मनात मर्ढेकरांची कविता नव्याने उलगडत होती.

पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो
होता पायातही वारा
कालपरवापावेतो
आज टपोरले पोट
जैसी मोगरीची कळी
पडे कुशीतून पायी
छोटय़ा जिवाची साखळी
पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो
थांब उद्याचे माउली
तीर्थ पायांचे घेईतो

ता. क. -
सर्व प्रतिसादकांचे आणी वाचकांचे आभार..
ती मुलगी खरंच "अवघडलेली" होती.
काही प्रतिसादांवरून असं वाटतंय की हे कदाचीत सर्वांच्या लक्षात आला नाहिये.. मी केवळ ओझरता उल्लेख न करता स्पष्ट उल्लेख करायला हवा होता.

हवेतल्या गोष्टी - १

सकाळी सकाळी मस्त पांघरुणात गुरफटून झोपावं, उन्हं वर येईपर्यंत. बायकोनं मस्त चहाचा कप हातात आणून द्यावा.. पण हे काही घडत नाही. साला नोकरीच अशी आहे की घरी येऊन बॅग टेकतो न टेकतो तोच पुढचं तिकीट मेलबॉक्स मधे येऊन पडतं. खूप जीवावर येतं आपल्या माणसांना सोडून पुन्हा घराबाहेर पडायचं.
पायाला काय भिंगरी लागलीये कळत नाही. दर दोन दिवसांनी एक फ्लाईट पकडायची आणि सारखं पळत रहायचं, दमायला परवानगीच नाही. थांबता येणार नाही असं नाही, कारण माझा कुणीच पाठलाग वगैरे करत नाहीये. मीच कशाचातरी पाठलाग करतोय. कसला कुणास ठाऊक.
सहज म्हणून मोजलं तर मी गेली ६-७ वर्षं सतत प्रवास करतोय, महिन्यातून १५ ते २५ दिवस. सतत आणि अखंड भटकंती. आजवर अनेक रात्री एअरपोर्टवर आणि लाउंजमधे काढल्यात. कधी फ्लाईट लेट आहे म्हणून, कधी रद्द झाली म्हणून. कधी कनेक्टींग फ्लाईट लगेच नाहीये म्हणून. आता प्रत्येक विमानतळावरचा लाउंज हेच घर वाटायला लागलंय. पुणे, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद आणि कोलकोता ह्या विमानतळावरचा कोपरान् कोपरा पाठ झालाय. एवढंच कशाला, विमानकंपन्यांचं वेळापत्रक, कुठल्या विमानात कुठला सीटनंबर इमर्जन्सी विंडोशेजारी येतो. कुठच्या एअरलाईनचं बोर्डिंग गेट कुठलं, असला बारीकसारीक तपशीलही तोंडपाठ झालाय.
ह्या कटकटीच्या कार्यक्रमात एकमेव आसरा म्हणजे हातात एखादं जाडसं पुस्तक, आणि लाउंजमधली आरामखुर्ची. त्यातही कवितासंग्रह असेल तर क्या केहने... पुस्तक नसेल तर आयपॉडवर कुमारजी किंवा अभिषेकीबुवा. काय तंद्री लागते म्हणून सांगू.
पण कधी कधी याचाही कंटाळा येतो. मग इअरफोन नुसता कानात अडकवून ठेवायचा, आणि आजूबाजूची गम्मत पहात बसायचं. कानात इअरफोन लावून, शून्यात डोळे लावल्याचा अभिनय करत, आजूबाजूचं संभाषण ऐकायची, निरीक्षण करण्याची कला अवगत करावी लागते. तुम्ही लक्ष देताय असं वाटलं लगेच मंडळी कॉन्शस होतात.
सहज नजर फिरवली तरी असंख्य नमुने बघायला मिळतात. काळाकरडा कोट घालून इंग्रजी वृत्तपत्र वाचत बसलेले आखडू लोकं. सराईत नजरेला यांच्यातले नवखे कोण आणि मुरलेले कोण हे झटक्यात ओळखू येतं. सफारी घातलेले हातात चॉकलेटी ब्रीफकेस घेतलेले म्हातारे, इन्फोसिस, विप्रो इत्यादी कंपन्यांच्या सॅक पाठीवर टाकून ब्लॅकबेरी शी चाळा करत, हळूच इकडेतिकडे बघणारे तरुण. सोळा ते तीस वर्षे वयोगटातल्या, तंग आणि अपुरे कपडे घालून नाक फेंदारत चालणाऱ्या ललना. वय वर्षे दोन ते आठ मधली विमानातळ डोक्यावर घेणारी बच्चेकंपनी, पांढरे कपडे घातलेले आणि प्रंचंड घाईत असल्याचं दाखवणारे पुढारी, कडेवरचं मुल सांभाळत भांबावलेल्या चेहेर्‍यानं इकडेतिकडे पाहणाऱ्या लेकुरवाळ्या बायाबापे, ह्या लोकांना आपापल्यापरीने मदत करणारा लालनिळ्या कपड्यातला ग्राउंड स्टाफ, ह्या सगळ्या धांदलीकडे अत्यंत तुच्छतेने पहाणाऱ्या हवाईसुंदऱ्या, क्वचित कडक इस्त्रीचे कपडे घातलेले आपल्याच गप्पात गुंगलेले पायलट लोक. पाहावं तितकं कमीच.
सुरवातीच्या दिवसांमध्ये, ह्या हवाईसुंदऱ्या, त्यांची टापटीप, तंग कपडे, सतत सावरला जाणारा मेकप, आपल्याच तोऱ्यात चालण्याची ऐट हे पाहून एकतर असूया तरी वाटत असे किंवा राग तरी येत असे. पूर्वी मित्रांच्या बरोबर चेष्टामस्करी करताना माझा रोजचा विमानप्रवास आणि हवाईसुंदऱ्या यावरून काही कॉमेंट्सही होत असत.. पण जितकं त्यांचं काम जवळून पहात गेलो, तितका आदर वाढत गेला, आता कधीच असा वावगा उल्लेख होत नाही. उलट कधी नामोल्लेख झालाच तर आदरानेच होतो. सी.आय.एस.एफ. अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे जवान आणि अधिकारी, हे या खेळातले असेच दुर्लक्षीलेले शिलेदार.
आता इतक्या दिवसाच्या सान्निध्यानंतर हवाई सुंदऱ्या, एअरलाईन स्टाफ, सीआयएसएफ चे जवान यांच्याशी एक नातं नकळतच तयार झालंय. बरेच जण ओळखीचेही झालेत.
एवढ्या वर्षांच्या प्रवासात, एअरपोर्टवर, विमानात, लाउंजमधे, सिक्युरिटीचेकमधे, आतापर्यंत अनेक किस्से घडलेत. अनेक माणसं मनात घर करून बसलीयेत. अनेक चित्रविचित्र प्रसंग आहेत. सहप्रवाशांच्या कानगोष्टी आहेत.
अशा खूप हवेतल्या गोष्टी मनात आहेत. त्या आठवतील तशा आणि वेळ मिळेल तशा सांगणार आहेच..
सध्या इतकंच..

( पेटवी लंका हनुमंत )

कालच्या सामन्याच्या मानकर्‍यांसाठी आणि अर्थात आमच्या लाडक्या सचिनदेवासाठी हे कवन...
गदीमांचे गीतरामायणातील मूळ काव्य इथे मिळेल. काल रात्रभर नाचुन विजयाच्या उन्मादातच लिवलं गडबडीत आहे, मीटर तपासू नये. काही कडव्यांचा क्रम बदलला आहे, पण मुळ चालीवरच म्हणता येइल. (उद्या वेळ मिळाला की.. " देवहो, बघा 'माही'लीला... या घरी विश्वचषक आला" लिहायचा विचार आहे.. Lol
लीलया उडुनी वानखेडेत
पेटवी लंका हनुमंत
उडे दांडकी सेहेवागाची.
बॅट कोसळे मग 'देवा'ची
चिता भडकली जणूं चिंतेची
राक्षसी करिती आकांत
कुणी पळाले हरल्या पायी
रिमोट मग कुणी टाकून देई
कुणि भीतीनें अवाक होई
वरून तो सडका श्रीशांत.
गंभीरा पण नक्की ठावे
सवे कोहली हळूच धावे
कप्ताना कर्तव्य आठवे
अचानक आला कल्पांत
या सीमेहून, त्या सीमेवर
कंदुक पळतो, नुरे भुईवर
गंभीराचा स्ट्रोक भयंकर
चालला धावा जमवीत
उडे मलिंगा, फुटे थीसारा,
मुरली पोकळ, कुणा न थारा
रडे, ओरडे तों रणदिव
कुमारा पडला चिंतेत
सहज फोर ते असे मारती
विजेपरी तें सिक्स मागुतीं
आग वर्षवी नगरीवरती
गर्जना करती फलंदाज
आकांक्षा मग पुन्हा उसळल्या
युवराजांच्या बाहू स्फुरल्या
पवित्र मंगल घटिका भरल्या
मातृभू बुडे उत्सवात
धोनी, भज्जी, संघच सारा
“देव” मस्तकी मिरवी प्यारा
देवाच्या अन् भारतभूच्या
नशीबीचा संपे वनवास
......पेटवी लंका हनुमंत ..... पेटवी लंका हनुमंत

सराईत

आताशा सुंदर लागलाय स्वर वगैरे..
सगळं कसं छान चालू आहे
हसतमुखानं यशाच्या छटा मोजत मस्त सरकतोय दिवस.
माझ्याकडे यांव आहे आणि मी त्याला त्यांव दिलं.
हिशोबाच्या कागदाचा मनात लागलाय ढीग.
थुंकी झेलणारे झेलतायत..
असुयेच्या आठ्या सुखावून जातायत .
मित्रांचाही आहेच की घोळका...
सगळं कसं छान चालू आहे .
मारायला शिकतोय की नकोसे विचार,
हव्याशा प्रलोभनांच्या बदल्यात.
खूप ताकद आहे अजून.. लांब धाव घ्यायची..
जवळच्या नात्याची मिठी फक्त सोडवायची
सुखाच्या व्याख्या बदलतायत,
नजर अजून रुंद होतेय.. घाव अजून खोल.
जल्लोष होतोय धुंद..
दरडावून विचारणारा आवाज क्षीण होत जातोय.
प्रशस्त होतायत रस्ते... तडजोडी अप्रशस्त..
बुद्धी तल्लख आणि जाणीवा सुस्त
नव्या लालसांचे अंकुर फुटताहेत.. वठलेल्या संवेदनांवर
एक क्षीण आवाज येतो कधीकधी.. पण..
सराईत हाताला आता कंपही नाही सुटत.. अचूक दाब देताना

रिक्षावाले

कुठल्याही शहरातले रिक्षावाले यांचं माझ्याशी नक्की नातं काय हा प्रश्न मला अजून सुटलेला नाहीये.
माझ्या चेहरयावर केवळ ह्या लोकांनाच वाचता येणाऱ्या भाषेत कायमचा एक यडबंबु भाव कोरून ठेवला असावा, किंवा त्यांना केवळ माझा चेहेरा पाहून 'हा येणारा इसम अगदीच ‘हा’ असून ह्याला गंडवलं नाही तर संघटना आपल्याला वाळीत टाकेल' अशी भीती वाटत असावी. नेमका मी गेल्यावर ‘ह्याला आपल्या घरी आज फुकट जेवायलाच घेऊन जायचंय’ असे चेहरे करून बघतात लेकाचे. त्रास ‘नाही’ म्हणल्याचा होत नाही हो, ते ज्या हलकट्ट सुरात म्हणतात त्याचा होतो. ‘स्वारगेटला येणार का’ असं विचारल्यावर ज्या स्वरात मला आत्तापर्यंत उत्तर मिळाली आहेत ती जर तुम्ही ऐकलीत तर तुम्हाला माझ्या हेतूविषयी आणि गंतव्य स्थानाविषयी नक्की शंका येईल.
हा प्रश्न मला भेडसावायला लागला त्याला आता खूप वर्ष झाली. तेव्हा मी कॉलेजला शेअररीक्षा किंवा ज्याला आमच्याकडे वडाप म्हणतात त्याने जात असे, बापानं खडूसपणा दाखवून अजून बाईक घेऊन दिली नव्हती. पॉकेटमनी नावाची ‘नियमित उत्पन्न योजना’ आमच्या वेळेला एवढी बापप्रिय नव्हती. त्यामुळे जसे लागतील तसे पैसे घेऊन शेअररीक्षाने २.५ रुपयात कोलेजला जाणे हा सर्वमान्य उपाय होता. अगदी त्यावेळेपासूनच ‘रम्य’ आठवणी आहेत या लोकांच्या. अगदी पहिला पाशिंजर मी असलो तरी मीच आत बसायचं, आणि मी शेवटी आलो तरी मीच आत बसायचं. माझ्या कॉलेज आयुष्यातली अनेक लेक्चर मी केवळ रीक्षाचा प्रवास करून गेल्यावर परत लाकडी बाकावर बसायला लागू नये म्हणून बुडवली आहेत. ज्यांनी रिक्षातुन त्या उजव्या बाजूला लावलेल्या बारक्या लोखंडाच्या आडव्या दांडीवर बसुन प्रवास केलाय त्यांनाच कदाचित माझं दु:ख कळू शकेल.
मी समजत होतो कि रिक्षातुन फक्त चार किंवा जास्तीतजास्त पाच माणसं जाऊ शकत असतील, चालक सोडून. पण अलीकडेच हैद्राबाद मध्ये मी शेअररीक्षा सारखाच एक प्रकार बघितला, आणि माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा कुठल्याही क्षणी रुंदावू शकतात याचा अनुभव घेतला. त्या छोट्याश्या वाहनातून ते दाक्षिणात्य भरदार स्त्रीपुरुष ८-१० च्या संख्येने आरामात गप्पा मारत प्रवास करताना पहिले आणि मनोमन प्रवास ह्या शब्दाला ‘सफर’ हा इंग्रजी अर्थाचा हिंदी प्रतिशब्द योजणारयाला प्रणाम केला. तसे मी बऱ्याच शहरात रीक्षावर सर्वांगीण अत्याचार झालेले बघितलेत पण आमच्या भागानगरातली मौजच न्यारी, ‘पुढे एक मागे चार’, ‘पुढे दोन मागे तीन’, ‘पुढे तीन मागे दोन’, अश्या असंख्य शक्यतांचा सामना ह्या डोळ्यांनी केल्यावर आता माझी ‘पुढे शून्य मागे दहा’ असे प्रवासीही चालत्या रिक्षात बघायची तयारी आहे.
पण रिक्षातुन अनेक प्रवाशांना नेलं तरच गैरसोय होते असं जर तुमचा गैरसमज असेल तर तो दिल्लीच्या रिक्षातुन प्रवास करून मोडू शकेल, खरतर मोडू बरच काही शकेल. दिल्लीत रिक्षा विकताना बहुतेक शॉकअब्सोर्बर काढून विकत असावेत. समोर दिसलाच तर दिसणारा अगदी नगण्य खड्डा, तुमच्या मणक्यापर्यंत पोचताना भलताच दणका देऊन जातो. थोडक्यात अर्धा तास प्रवास केलात तर आपण रिक्षातुन चाललोय की ‘अन्त’रिक्षातुन हेच कळेनासं होतं. बरं त्याला सांगायला जावं तर तो मान मागे वळवून आपल्याला दिल्लीतल्या रस्त्याबद्दल तक्रारी सांगू लागतो, आपला जीव खालीवर.
नोएडामध्ये ते सायकलरीक्षावाले असतात, खरं सांगू का त्यापैकी कुणी ‘कहा जाना है’ असं विचारू लागला ना कि खरच गलबलून येतं हो. नाही पण म्हणवत नाही आणी ते श्रम पहावतही नाहीत. मी तरी अजून त्यातून कधी गेलेलो नाहीये. तीच गोष्ट कलकत्त्यात. अगदी नको नको होऊन जातं ते त्यांचे श्रम बघून.
त्यातल्यात्यात मुंबईचे रिक्षावाले बरे वाटतात. मलातरी अनुभव चांगला आहे. माझ्या एका दिल्लीच्या मित्राला मुंबईत रीक्षावाल्याने वरचे सुट्टे दोन रुपये परत दिलेले पाहून अगदी भरून आलं होतं. पुण्यातले एकेक अनुभव वर्णन करायला लागलो तर उगच इथेच आखाडा व्हायचा नेहेमीसारखा. पण मी हल्ली पुण्यात थोडा सावधपणे रीक्षात बसतो, शक्यतो कुठेतरी जाणारी रीक्षा थांबवतो, स्टॉपवरची नाही निवडत, मग नाही म्हणत नाहीत शक्यतो. पण पुण्यातही काही चांगले अनुभव आहेतच, मी तरी लगेच जनरलायझेशन करणार नाही, पण पुण्यातले वाईट अनुभव मला तुलनेने जास्त आहेत हे खरंच.
पुण्यात अथवा मुंबईत मला हौशी रिक्षावालेही नाही दिसले कधी, सांगली, कोल्हापूरकडे तो अनुभव जास्ती, स्वच्छ चकचकीत पांढरं हूड, पोलिश केलेली बोडी, हूडच्या आतमधून सुंदर लाल, निळी हिरवी नक्षी. पितळी चकचकीत हँडल, चालकाच्या पाठीमागे मखमली कुशन, आत छोटासा पंखा आणि ढाकचिक ढाकचिक वाजणारा डेक. वा वा क्या बात है. साला रिक्षा असावी तर अशी.

बरान


बरान


माझिद माझ्दी हा माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक. कलर ऑफ पॅरेडाइज, चिल्ड्रन ऑफ हेवन, द फादर अशा सगळ्याच कलाकृतींचा मी प्रचंड चाहता आहे. माझ्या तेहेरानच्या वास्तव्यात माझी या असामीची भेट होऊ शकली नाही याची अजुनही मला हुरहूर वाटते.
त्यांच्या सर्व कलाकृतींमधे माझी विशेष आवडती फिल्म म्हणजे 'बरान'
रशिया - अफगाण युद्धामधे विस्थापीत झालेले अफगाणी निर्वासीत लोक लपूनछपून तेहेरान बाहेरच्या निर्वासीतांच्या छावण्यांमधून दुर्दैवाचे दशावतार भोगताहेत. इराणमधे त्यांना कामासाठी येण्याची मुभा आहे पण अनेक नोंदी करून आणि ओळखपत्र मिळवूनच. इराणमधे राहण्याचीही अनुज्ञा नाहीच, दिवसभर काम करून संध्याकाळी छावणीत परत. याशिवाय अनेक अफगाणी निर्वासीत ओळखपत्राशिवाय अनधिकृतपणे तेहरानच्या जवळपास अगदी तुटपुंज्या मोबदल्यावर काम करून लपुनछपून दिवस काढतायत. स्वदेशापासून तुटलेली आणि त्यामुळेच आपापसात ऋणानुबंध तयार झालेली माणसे..
अशाच एका मोठ्या इमारतीच्या बांधकामावर अनेक अफगाणी अनधिकृतपणे काम करताहेत, एक इराणी मुलगा याच बांधकामावर चहा देणे, जेवण बनवणे इत्यादी आरामाची कामे करून दिवस काढतोय. तिथल्या इराणी - अफगाणी कामगारांना टोमणे मारणे, पक्ष्यांना दगडं मारणे, काहीसा उडाणटप्पूपणा करणे ह्या सगळ्या मधे 'लतीफ' चे दिवस आरामात चाललेत.
अचनक एके दिवशी एक अफगाणी मजूर नजाफ याला बांधकामावर अपघात होउन दवाखान्यात जावं लागतं, आणि पुन्हा आपल्यासमोर त्या विदीर्ण आयुष्यातले कष्ट आणि अपरिहार्य दु:ख चमकून जातं. दुसर्‍या दिवशी नजाफचा मुलगा रहामत त्याच्याऐवजी कामावर येतो. नजाफसारखंच कष्टाचं काम करण्याचा तो बिचारा प्रयत्न तो करतोही पण गरीब चेहेरा आणी अशक्तपणामुळे त्याला कष्टाचं काम न देता लतीफचं आरामशीर काम देण्यात येतं आणि आपल्या लतीफवर पुन्हा विटा आणि पोती उचलायची वेळ येते.
चिडलेला लतीफ रहमतचं जिणं अवघड करून टाकतो, त्याला हरप्रकारे त्रास देतो, पण रहमत चकार शब्द न बोलता आपलं काम करतच रहातो. या सगळ्या घटनाक्रमात आपल्याला लतीफचा राग अजिबात येत नाही, उलट आपल्या जाणवत राहतं ते महाग होणार मानवी आयुष्य. त्या सगळ्याच घटनांची अपरिहार्यता आणि हतबलता..
अचानक एका संतापाच्या क्षणी लतीफला हे कळतं की रहमत हा मुलगा नसून मुलगी आहे, आणि वडिलांच्या गरीबीला हातभार लावण्यासाठी हे अवघड काम ती करतेय. लतीफच्या चेहेर्‍यावरचे भाव बदलत जातात. अपराधीपणा, करूणा, संताप अशा अनेक छटामधून एका कोवळ्या निरागस नात्याचा अंकूर जन्म घेतो.
अकस्मात कथा एक करूण वळण घेते, बांधकामावरून सर्व अफगाण मजूरांना हाकलून द्यावं लागतं आणि रहमतही परागंदा होतो/ते.. लतीफचा अस्वस्थ करणारा शोध सुरू होतो 'रहमत'साठी म्हणजेच खर्‍या 'बरान'साठी...
त्यापुढचा सगळा प्रवास केवळ स्तब्ध करणारा, मानवी भावनांचे खोल पण ओळखीचे रंग अधीक गहिरेपणाने जाणवून देणारा....
नियती नावाच्या हरामखोर श्वापदाचा सतत संताप येत रहातो. प्रत्येक व़ळणावर असंख्य प्रश्न उभे रहातात. उत्तरासाठी आपली तडफड चालू रहाते..
कथेच्या ओघात अनेक पात्रांच्या तोंडून काही क्रूर पण शाश्वत सत्यं समोर येतात, आयुष्याचं तत्वज्ञानही इतक्या भयाण पणानं समोर येत रहातं.. आपली घालमेल होतंच रहाते... प्रेमाचा अर्थ जाणवतो आणि वैयर्थही..
आणि ह्या सगळ्याच्या पाठिमागे युद्धाची पार्श्वभूमी एखाद्या कातर करणार्‍या सारंगीच्या खोल स्वरासारखी सतत जाणवत राहाते, काळीज पोखरत रहाते...
कथेचा सगळ्यात अप्रतीम भाग म्हणजे शेवटच्या दॄष्यामधील प्रेमाचा आश्वासक स्वर.. रहमतच्या गालावरचं हलकं पुसटसं स्मित.. प्रीतीचा इतका हळुवार संवाद... आणि शेवटी कोसळणारा 'बरान' म्हणजेच 'पाउस'
युद्धाच्या रखरखीत वाळवंटात भिरकवली जाणारी आयुष्याची लक्तरं आणि त्याच विदीर्ण पार्श्वभूमीवर एक सोनेरी हळूवार अल्लड प्रेमकथा ही आवर्जून पहावी अशीच आहे...

एखादा झकास लेख....

रोज दिवसभर काहीतरी सुचत असतं, आज थोडं यावर लिहुया असंही मनाशी म्हणतोही तेव्हा...
एखाद्या क्षणी हे अगदी उजळपणे जाणवतं की.. अरे.. हा... हाच.. हाच तर क्षण खूप सकस आहे.. खोल आहे.. किती उत्कट आहे..
आपल्या मित्रांना सांगायलाच हवा.. उलगडायलाच हवा निवांतपणे.. मनात नोंदही होते तशी पण.. पण...

पण एक प्रॉब्लेम होतो.. हल्ली काही लिहायला घेतलं तर पुर्णच करता येत नाही... काहीतरी विचार घेउन कळफलक समोर घ्यावा... तर दोन चार वाक्यं लिहून होतात..
त्यापुढंच वाक्य लिहिता लिहिता विचारांची मालीका कुठेतरी भरकटत जाते.. धडाडती फास्ट ट्रेन.. सुसाट वेगाने रूळ बदलते..
मनाच्या अवकाशात असंख्य रंग उधळले जातात.. नवीन ताल घूमू लागतात.. नवीन खेळ सुरू होतो नव्या गड्यांचा... एका निसटत्या क्षणी जाणवतं बरंका, की काहीतरी चुकतंय.. आपण वेगळे होतो आत्ता .. आत्ता रंग बदलतोय... पण तरीही एखाद्या निसटत्या क्षणी आपणंच देतो भिरकावून स्वत:लाच.. स्वतःच्याच पोकळीत.. मग खरा आनंद असतो.. मुक्त असतो आपण काही क्षण.. निवांत सुंदर फ्रीफॉल.. अलगद उतरणार आपण स्वप्नांच्या मखमली प्रदेशात.. पण असं कोसळताना प्रत्येक वेळेला नाही लागत तो प्रदेश...
जाणवतं की हे कोसळणं थांबवलं पाहिजे.. असं अधांतरी कसं चालेल. घट्ट जाणीव नको का आधाराला, आणि तर्काची बळकट जमीन.. आधार तर शोधायलाच हवा.. धडपड करून
एखाद्या अणुकुचीदार विचारानं सळकन कापला जातो हात.. भळभळता... उगाचच वहावलो आपण.. क्षणांची जादू क्षणाची असते.. आपणच राहीलो असतो जरा खंबीर तर... असं नुसतं कीबोर्डकडं ब्लँक बघावं लागलं नसतं...
झाला असता ना एखादा झकास लेख....

शोंदेष, चोमचोम, मिष्टीदोई आणि रोशोगुल्ला

*हे प्रवासवर्णन नाही, माझ्या आवडत्या शहराविषयीचा कृतज्ञतालेखच म्हणा हवे तर*
एका मुठीत लॅटपॉटची बॅग, दुसर्‍या मुठीत जीव आणि पोटाने सामानाची ट्रॉली ढकलत नेताजी सुभाषचंद्र विमानतळाच्या बाहेर आलो तेव्हा समोर गच्च गर्दीमधून भरधाव वेगाने पिवळ्या टॅक्सी जात होत्या, आणि एक टॅक्सी ड्रायवर तिथे माणसांना एका हाताने थोपवून गाड्यांना पुढे सोडत होता. मी ह्याचा अर्थ लावत असतानाच त्याचे शब्द कानावर पडले "जोल्दी जोल्दी जोल्दी... जोल्दी चोलो.. दो चार मर गया तो भी प्रोब्लेम नोई.. जोल्दी चोलो"
माझं भारतातलं दुसरं सर्वात आवडतं शहर म्हणजे कोलकोता. मला हे शहर नक्की कशामुळे आवडतं ते कदाचीत माझं मलाही सांगता येणार नाही. भरभरून बोलणारी माणसं, बाराही महिने चालणारे सांस्कृतीक महोत्सव, वाहत्या रस्त्यात स्थितप्रज्ञपणे चालणारी ट्राम, शहराचा अजूनही एकाच साच्यात न बसण्याचा अट्टाहास, विवीध प्रकारची आणि आकाराची अवीट गोडीची बोंगॉली मिष्टी, आणि त्या मिष्टीहुनही गोड बंगाली भाषा... की ह्या सगळ्या पलिकडे असणारा राजकीय आणि सांस्कृतीक वारसा... खुब भालो.. खुब भालो..
कधी बंगालात प्रवचनाची संधी आली की मी अजिबात ती सोडत नाही, आणि प्रत्येक वेळेला वेगळं कोलकोता समोर येतं. एखादा तरी बंगाली बाबू.. दादा दादा म्हणत जवळीक साधतोच. दिवसभराचं काम आटोपून मी नेहेमीच शहर अनुभवायला बाहेर पडतो, प्रत्येक वेळेला वेगळं गारूड, वेगळा रंग..
एकंदरीतच बंगाली लोक व्यवहारी नव्हेत, दादा दादा म्हणुन लाडात तरी येतील किंवा फटकन काहीतरी तोडून तरी बोलतील, मला पहिल्या प्रकारचेच जास्त भेटतात. या वेळी जिथे प्रवचन होतं तिथल्या बंगाली बाईला माझ्या पुण्याच्या टीममधल्या कुणीतरी सांगितलं होतं की मला मिष्टी आवडते म्हणुन.. ती प्रत्येक दिवशी दुपारी येउन विचारायची. सर लोंच? मिष्टी?
यावेळेलाही नेहेमीचा अजेंडा होताच..
चार दिवस संध्याकाळच्या जेवणा ऐवजी केवळ आणि केवळ मिष्टी मिष्टी आणि मिष्टी... केळीच्या पानात गुंडाळलेला शोंदेष, अप्रतीम चोमचोम, आंबटगोड मिष्टीदोही आणि लाडू इतक्या आकाराचे रोशोगुल्ले.. पोट भरतं पण मन भरत नाही..
असो..
येताना एक मोठं खोकं भरून मिष्टी आणली होती. पण मित्रांनी (आणि त्यांच्या नावाखाली मी) केव्हाच संपवली, त्यामुळे फोटो काढायलाही शिल्लक राहिली नाही.. क्षमस्व..
पुढच्या वेळेला कोलकत्यामधेच मिष्टीचे फोटो काढुन या लेखाचा पुढचा भाग म्हणुन डकवले जातील. ( लाळेने कीबोर्ड भिजल्याने लेख इथेच संपवावा लागतोय )

एकच लख्ख अनंत किरण...

तुम्हाला कधी टोचतो की नाही माहित नाही पण मला खुप टोचतो मखमली अंधार... परका अंधार आणि पोरका मी.... म्हणजे नेहेमीच नाही बरंका... कधी कधी कसा मस्त दुलइ सारखा असतो... हवी तेव्हा गुडुप ओढून घ्यावी तोंडावर... कंटाळा आला की खसकन् फेकुन द्यावी... सगळा सोहळा हजर तुमचं स्वागत करायला हसर्‍या चेहेर्‍यानं.
कधी कधी मात्र खुप गुदमरायला लावतो... अंधार्‍या डोहात बुडल्यासारखं वाटतं... जिव गुदमरतो अगदी... मग मी डोळे टक्क उघडे ठेउन झपाटल्यासारखा पाहात बसतो... नजरेनेच चाचपडत, तडफडत बसतो... तो तळाशी ही खेचत नाही आणि श्वासही घेउ देत नाही... कधी सोसतो.. कधी पोळतो.
पळताही येत नाही त्यापासुन.. सगळ्या श्वासातच गच्च भरुन राहिलायसं वाटतं... केविलवाणी अधांतरी धडपड... आणि मग हळुहळू शांतपणे सगळं थंडावत जाणार.. आणखी एक बळी आतल्या अंधाराचा...
म्हणुन एखादाच लख्ख किरण, पण नेहेमी असावा सोबत... आपला प्रकाश घेउन फिरावं आपल्याच आत... कधितरी श्वास कोंडला तर कामी येतो एखादाच लख्ख किरण...
एरवीच्या भगभगीत प्रकाशात नसेल महत्वाचा.... काळोखुन जात असेल... एखादाच लख्ख किरण... पण अशा अंधार्‍या समुद्रात दुप्पट वेगाने उसळतो ना... उजळतो ना सारं तुझंच अस्तित्व... एरवी दिसतं का एवढं सुंदर, भेसुर सावल्यांनी कुरूप झालेलं तुझं अंतरंग...
सगळ्या भेसूर सावल्या, सगळे भयाण भास... भेदायची ताकद नसेलही कदाचीत त्या किरणात... पण तशी ती तुझ्यात तरी कुठाय वेड्या... तुझ्या पुरता घेउन फिरायचा तो सतत.. जवळ ठेवायचा फक्त... किंमत नाही करायची कृतघ्नासारखी लगेच... तुझ्यापुरता आहेच ना तो शाश्वत... तुझ्या आयुष्याच्या टीचभर मापात का होइना..आहेच ना तो 'अनंत'.. एकच लख्ख अनंत किरण..
एखादाच बाबुजींचा स्वर...'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...'
एखादाच "ठकठकठक.. धनंजय माने आहेत का घरात... "

धिस टाईम फॉर आफ्रिका. - चित्रसफर.

थांबा... शिर्षक वाचुन घाबरू नका, अजुन एक भाग पाणी घालून वाढवत नाहिये. पण प्रवासातल्या गडबडीमुळे शेवटच्या काही भागात फोटो टाकायला जमलं नव्हतं. भरपाई म्हणुन या भागात केवळ फोटोच टाकतोय. शिर्षकंही देत नाहिये सगळ्या फोटोंना
नीट वर्गवारी केलेले नाहियेत आणि माझ्या फोटोग्राफीच्या कलेचा केव्हाच बालमृत्यू झालाय तेव्हा सांभाळुन घ्या..धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ९ - अंतीम.

काल सुट्टी होती. स्थानीक साथीदारांच्या मदतीनं भोजनशोध मोहिमेवर बाहेर पडलो. थोडी जुजबी माहिती जमा झाल्यावर टेंपल स्ट्रीट या रस्त्यावर येउन पोचलो. इथं पोहोचेपर्यंत काही ह्या नावातली खोच लक्षात आली नाही. शहराचं नाव दारेसलाम. बहुतांश लोकवस्ती मुस्लीम, उरलेली ख्रिश्चन अशा शहरात अगदी मध्यावर, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी हा टेंपल स्ट्रीट आहे. रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत सुंदर हिंदु देवदेवतांची मंदिरे. अगदी सुंदर प्रशस्त देवळं. कृष्ण, राम, शंकर, कालिमाता, हनुमान अगदी सगळ्या देवांनी अगदी ऐसपैस बस्तान बसवलंय. एकेक मंदेर म्हणजे एखाद्या तिर्थक्षेत्री असतं तेवढं सुबक नी प्रशस्त. प्रत्येक देवळात एक मोठा हॉल, प्रवचनासाठी. कृष्णाच्या देवळात चाललेलं एक गुजराती भाषेतलं लडिवाळ प्रवचनही ऐकल अर्धातास बसुन. कुठे पिंपळाचा मोठा पार, चिवचिवणार्‍या चिमण्या तर कुठे पांढर्‍या धाग्यांनी गुंडाळुन अदृष्य केलेला वडाचा बुंधा.
त्या रस्त्यावरुन जाणार्‍या तीनपैकी एक चेहेरा भारतीय. भारतीय लोक इथं इतकं वजन राखुन असतील याची कलपनाच नव्हती. देवळात बसल्यावर वाटुच नये आपण आपल्या देशापासुन हजारो मैल दूर येउन बसलोय. बजुलाच एक चक्क शुद्ध शाकाहारी हॉटेल आणि शेजारी अर्थातच एक मिठाइचं ऐसपैस दुकान. काचेच्या काउंटरमागे ढोकळा, फरसाण, फापडा,रसगुल्ला, जिलबी, गुलाबजाम वगैरे थाट आणि काउंटरला त्या दुग्धजन्य मिठाइचाच एक अविभाज्य भाग वाटणारा एक गोड गुज्जुभाय.
आजचं जेवण तर जोरकस झालं.. मस्त गरमगरम फुलके, बटाट्याची भाजी, वालाची उसळ, रसगुल्ला, दाल, भजी हे सगळं पचवायला दोन मोठे ग्लास मसाला ताक. आणि नंतर मुखशुद्धी म्हणुन चवीपुरता उगाच दोन-तीन प्लेट ढोकळा.. आहाहा क्या केहेने..
गुज्जु समाजाचं वर्चस्व इथे खुपच आहे, त्या बाजारपेठेतल्या काही प्रकारच्या व्यापाराचे अनभिषीक्त सम्राटच जणु. त्या रस्त्यावर इलेक्ट्रॉनीक वस्तंपासुन कापड दुकानापर्यंत सगळी दुकानं होती सगळ्याचे मालक गुज्जु. (मला बँकॉकच्या नाना स्ट्रीट ची आठवण झाली, त्या रस्त्यावर दुतर्फा शेकडो दुकानं टेलरची आणि सगळ्याचे मालक सरदारजी.) ह्या सगळ्या दुकानात कामगार स्थानीक आहेत आणि आमचे गुज्जुभाय आपल्या अस्खलीत स्वाहीली भाषेतुन सगळा कारभार चालवतात.
भाषा ऐकायला मस्त वाटते. अगदी आपल्या बंगालीसारखी मधुर नसली तरी प्रत्येक शब्दाचा शेवट स्वरानं होत असल्यामुळे प्र्त्येक शब्द हेल काढुनच उच्चारावा लागतो. ह्या स्वाहीली भाशेत व्यंजनानं शेवट होणारा शब्द ऐकु आला तर तो इंग्रजी किंवा इतर कुठल्यातरी परक्या भाषेतला आहे असं बेलाशक समजा. इतके दिवस ती भाषा कानावर पडुन सुधा माझं स्वाहीली भाषेचं ज्ञान काही मोजक्या शब्दांपलिकडे गेलं नाही म्हणा.
दुका म्हणजे दुकान. दवा म्हणजे औषध्. असांते म्हणजे धन्यवाद. खरीबू म्हणजे स्वागत. सींबा म्हणजे सींह, थिंबा म्हणजे हत्ती. साफ म्हणजे स्वच्छ. माझी म्हणजे पाणी. माझिवा म्हणजे दुध. 'चाय माझिवा' मागवायचा नाहितर काळा काढा प्यावा लागतो. मी आमच्या कॅटीनमधे एकदा त्या पोरीला कॉफी मागितली. माझ्याकडे बघुन ती हसतंच सुटली. मी बावरलो. माझी यथेच्छ कीव करुन आणि हसून झाल्यावर तिनं सांगितलं की कहाव्हॉ म्हणजे कॉफी.. आणि काफी म्हणजे कानफाटात.. मी चक्क तीला एक कानफाटात मागितली होती.. माझं स्वाहीलीचं ज्ञान एवढ्यावरच आटोपतं.
इथं एके ठिकाणी स्थानीक नृत्य बघायला मिळालं जास्त वर्णन करत बसत नाही पण पन्नास एक स्त्रीपुरुष हातात हात घालुन रिंगण करून पाय आपटंत आपापला पार्श्वभाग एका ठेक्यात हादरवण्याची ती कसरत करताना पाहिले की काहीतरी वेगळीच शंका येते ब्वॉ. साधरणतः आपल्याकडे अडीअडचणीच्या वेळी शौचालय रिकामे नसल्यास पोट आत घेउन स्वतःचं वजन उजव्या डाव्या टाचेवर करत पाच मिनीटाचा 'ग्रेस टाइम' मिळवण्यासाठी जे पदलालित्य केलं जातं त्याच्या बराचसा जवळपास जाणारा हा नाचाचा प्रकार आहे.
हाच नृत्यप्रकार सगळ्या स्थानीक कार्यक्रामांतुन केला जातो. अगदी आबालवृद्ध आनंदाने तो नाच करतात. बाकी तो नाच कसाही असुदेत पण असा सगळा समुदाय हसत गात हातात हात घालुन त्या तालावर धुंद होउन नाचताना पाहिला की त्या उत्स्फुर्त प्रसन्नतेची लागण आपल्यालाही झाल्याशिवाय रहात नाही.
हेच नृत्य निवडणुकीच्या प्रचारातही केलं जात असावं बहुतेक. आत्ताच्या सत्ताधारी राष्ट्राध्यक्षाचा गर्द हिरवा फोटो घेउन एक माणुस असाच नाचताना एका चौकात बघितल्याचं आठवतंय. जिकडेतिकडे त्याचे त्या एकाच हिरव्यागर्द शर्टातले फोटो बघुन हा हिरवा पोपट रस्तोरस्ती अजुन किती दिवस बघणं यांच्या नशिबी आहे असा एक विचार उगाचंच मनात येउन गेला. हा राष्ट्राध्यक्ष गेली दहा वर्षे सत्तेवर आहे. त्याचे हिरव्याकंच रंगाचे फोटो मोठमोठ्या बॅनर वर लावलेले दिसतात. संसदेत सगळे आपापल्या पक्षाच्या रंगाचा शर्ट घालुन येतात. आपले सगळे थोर्थोर नेते असे रंगीबेरंगी शर्ट घालुन लोकसभेत दंगा करतानाचं चित्र मनःचक्षुंपुढे उभं राहिलं आणि हसायलाच आलं एकदम.
देशाच्या बाकी परीस्थितीविषयी बोलायचं तर गरिबी भरपूर. देशात कुठंही नविन गाडी विकत मिळंत नाही, सगळ्या जपानी गाड्या सेकंडहँड आयात होतात इथे. सार्वजनीक वाहतुकीसाठी रिक्षांचा वापर सर्रास होतो, आपल्या बजाजच्या रिक्षांचा. वेगवेगळे रोग आहेत, महागाई आहे. गेला महिनाभर ह्या युनिवर्सीटीमधे एड्सविरोधी जनजागरण मोहीम चालू होती. गुन्हेगारी आहे. बेकारी आहे. पाण्याचा प्रश्न आहे. शहरीकरणाचा प्रश्न आहे. रस्ते रोज तीनचार तास तरी ट्रॅफीक जॅम मुळे बंद असतात. पण तरी लोक मजेत आहेत. हसताना दिसतात. मोठं मजेशीर समाजमन आहे हे. इथल्या कुठल्याही समस्येविषयी तुम्ही लोकांशी बोलायला गेलात तर इकंदरीत प्रतिक्रिया ऐकुन तुमच्या लक्षात येइल की आपण आफ्रिकन स्थितप्रज्ञ संतांच्या मेळाव्यात येउन पोहोचलेलो आहोत.
चला इथले दिवस संपत आलेत, गेले २५-३० दिवस इथलं जग पहात होतो. नविन माणसांना भेटत होतो. पण खरंच हे जग वेगळ होतं का?..का मला ते भासलं वेगळं?.. नविन ठिकाणे नक्की काय बदलतं तेच कळत नाहिये... केवळ जागा बदलते म्हणजे मी बदलतो का? राग, आनंद दु:ख घरी असताना जितक्या वेळेला वाटतं तितक्याच वेळेला इथंही वाटलंच की... एकटेपणाचे चार क्षण जास्त आले असतील कदाचित पण तसा तो एकटेपणा माझ्या बरोबरच चालतोय की लहानपणापासुन.
या देशात जे काही पाहिलं ते 'माझ्या' नजरेतुन ना.. माझ्याच चष्म्यातुन... मग हे प्रवासवर्णन नाहीच की.. हे तर माझ्या त्यावेळच्या दृष्टीकोनाचं वर्णन.. अथवा माझ्या त्या क्षणांच्या अंतरंगाचं प्रतिबिंब म्हणा ना... म्हणजे खरी अफ्रिका आपल्याला दिसलीच नाही की काय... की 'खरी अफ्रिका', 'खरा भारत' असं नसतंच मुळी काही... आपलं अंतरंग जेवढं सजग, समृद्ध, तेवढंच बाहेरचं जगही रंगीबेरंगी..
असो.. इथला मुक्काम संपताना जितका आनंद साचलाय मनाच्या गाभार्‍यात.. घरी जायचं, आप्तांना भेटायचं, मातृभूला भेटायचं म्हणुन.. तसा एक हळवा कोपराही आहेच की इथल्या आठवणींसाठी... आयुष्यातले २५-३० दिवस इथं काढले, थोडासा तरी उरणारंच की मी इथं...
आणि २५-३० दिवस म्हणजे काही कॅलेंडरवरचे ३० चौकोन नव्हेत, मोजता येणारे.. रोजची नवी पहाट, संपुर्ण जगलेला दिवस आणि स्मरणात रमलेली रात्र म्हणजे तो एक चौकोन... त्या कॅलेंडरवर जरी सुट्टीचे चौकोन लाल आणि बाकिचे काळे रंगवले तरी वास्तवात कोणता लाल आणि कोणता काळा हे आधी थोडंच सांगता येतं.. कधि उत्तुंग निळा.. कधी धुक्यातला पांढरा.. कधी अश्रुंचा काळा.. कधी लाजलेला गुलाबी.. असं सुंदर कॅलेंडर प्रत्येक क्षणी जगतच असतो आपण...
.
.
.
नमस्कार मंडळी,
जरा जास्तच लांबलेल्या लेखमालिकेतील हा शेवटचा लेख.
आपण माझं अर्धकच्चं लेखन वाचलंत. आणि वर मोठ्या मनानं प्रतिक्रियाही दिल्यात याबद्दल धन्यवाद.
अर्थात तुम्हाला लेखन आवडलं याचं खरं श्रेय त्या वर्ण्यविषयाला, त्या वास्तवाला, तिथल्या माणसांना. ते वास्तव इतकं मोहक होतं, इतकं सच्चं होतं की माझ्यासारख्याच्या लेखनाचीही तुम्ही प्रशंसाच केलीत. माझा सहभाग एवढाच की मी ते सगळं माझ्या तोकड्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवलं.
धन्यवाद.

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ८

इथे येण्याआधी आंतरजालावर खोदकाम करताना इथल्या गुन्हेगारीविषयी माहिती वाचली होती. पोलिसांच खोटं आयकार्ड दाखवून पर्यटकांना लुटण्याचे दोनतीन किस्सेही ऐकुन होतो. मागच्या सफारीच्या वेळचा किस्सा तुम्हाला सांगायचाच राहिला.
त्या अभयरण्यातुन बसनेच परत येत होतो. त्या सकाळच्याच उबुंगो बसस्थानकावर उतरलो तेव्हा संध्याकाळचे आठ-साडेआठ वाजले असावेत. दमलो होतो खुप. सामान काही नव्हतंच बरोबर. एक सॅक होती पाठीला फक्त. त्या स्थानकाचं रूप वेगळंच भासत होतं रात्री. इकडे सात वाजताच सगळी दुकानं बंद होतात. आठपर्यंत सगळा शुकशुकाट होतो. रस्त्यावर तुरळक येजा होती. एक टॅक्सी बघितली. त्या ड्रायवरशी पैसे ठरवले आणि त्यानं थोडं दुर एका कोपर्‍यात टॅक्सी उभी केली होती तिथपर्यंत चालत निघालो.
जवळ पोचलो न पोचलो तेवढ्यात एक माणुस आडवा आला. त्यानं हात आडवा करुन मला थांबवलं. खिशातुन आयकार्ड काढुन 'मी पोलीस आहे' असं सांगीतलं. त्यानं मला अडवताच मी एकदम अलर्ट झालो होतो. दिसायला साधा वाटत होता. कपडेही ठिकठाक पण गणवेष नव्हता. मी आयकार्ड बघितल्यासारखं करुन त्याला परत दिलं. त्या कार्डला असंही त्या ठिकाणी किंमत नव्हतीच. ते खरं की खोटं मला अजिबात कळणार नव्हतं. तो तोडक्यामोडक्या इंग्रजीत मला बरंच काही सांगायला लागला.
त्याच्या मागुन त्याचे अजुन दोनतीन साथीदार आले. सगळेजण काहीतरी आपापसात बोलु लागले. मी नजरेनं एकवार परिस्थीतीचा अंदाज घेतला. अंधारा, अनोळखी रस्ता जवळजवळ निर्मनुष्य. सगळी आवष्यक कागदपत्रे, पासपोर्ट अर्थात माझ्या सॅकमधेच होते. त्या चारपाच जणांच समाधान व्हावं एवढे पैसे स्थानीक चलनातही होते आणि डॉलरमधेही. प्रश्न होता तो फक्त ते खरे पोलीस आहेत की नाहित याचा. आणि हे प्रकरण केवढ्यावर संपणार याचा...
अर्थात अशा वाटाघाटींची माझी पहिलीच वेळ होती असं नाही. असल्या प्रसंगातुन याआधीही गेलो होतोच. त्यानं मला पहिल्यांदा हटकलं तेव्हाच वेगानं विचारप्रक्रिया चालू झाली होती. सावध पवित्रे आपोआपच पडले होते. त्याच्याशी पहिलं वाक्य बोलतानाच, मी टॅक्सीला पाठ चिकटवुन, त्या सर्वांकडे तोंड करुन, सॅक खांद्याला लावुन, दोन्ही हात मोकळे ठेउन, पण कुठेही आक्रमकता न दाखवता उभा होतो. करु काहीच शकणार नव्हतो. ते चौघे होते, मी एकटा. फक्त काही हालचाल करायला पुरेसा वेळ मिळाला असता एवढंच.
त्यानं माझा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे मागितली होती. मी त्यांना सांगितलं की मला एक मित्र न्यायला येणार आहे तो आला की मी सगळी कागदपत्रं दाखवतो कारण ती घरी आहेत. तो लगेच म्हणाला मग टॅक्सी कशाला थांबवलिये. मी सांगितलं की त्याला यायला उशीर झाला म्हणुन मी कंटाळुन टॅक्सी केलिये. माझे सगळे कागद आणि पैसे त्याच्याकडे घरी आहेत असं सांगितल्यावर थोड्या वाटाघाटीनंतर तो मला फोन करू द्यायला तयार झाला. मी लगेच माझ्या मोबाइलवरुन माझ्यासाठी युनिवर्सीटीनें जो अधिकारी नेमुन दिला होता (इमॅन्युअल त्याचं नाव) त्याला फोन केला. त्याला सगळी परिस्थीती समजावुन सांगितली. हेही स्पष्ट सांगितलं की मी माझा पासपोर्ट तो येइपर्यंत कोणाकडेही देणार नाहिये. आणि त्याला लगेच त्याठिकाणी येण्याची सूचना केली. तो ही लगेच निघतो म्हणाला. आता फक्त तो इथे येइपर्यंत वेळ काढायचा होता.
तेवढ्यात टॅक्सीवाला धंदा बुडतोय म्हणुन गडबड करायला लागला. त्याला मी तुझा वेटींग चार्ज देतो तु चिंता करू नको म्हणुन समजावुन सांगितलं. इमॅन्युअल यायला जसाजसा वेळ लागत होता तसेतसे ते तथाकथीत पोलीस गडबड करायला लागले. मी 'प्लॅन बी' मघाशीच बनवून ठेवला होता. त्यांना सांगितलं की कुठलेही कागद आणि पासपोर्ट माझ्याकडे आत्ता नाहित हवंतर आपण पोलीस स्टेशनला जाउया. तिथे मी सगळे कागद मागवुन घेतो.
पुन्हा थोडं समजावल्यावर ते तयार झाले. त्यांच्या गाडीकडे बोट करू लागले. पण मी आग्रह करून टॅक्सीवाल्यालाच त्या पोलीसस्टेशनला न्यायला सांगितलं. शेवटी त्यातला एक अधिकारी पुढच्या सीटवर आणि मी मागच्या सीटवर बसलो आणि पाचच मिनिटात गाडी तिथल्या पोलीसस्टेशनच्या आवारात शिरली. मी आधीच तसा मेसेज इमॅन्युअलला केला होता. पोलीसस्टेशनचा बोर्ड वाचुन माझी चिंता अर्धी कमी झाली होती.
गाडितुन उतरलो आणि समोर पाहिलं तर इमॅन्युअल तिथल्या गणवेषवाल्या पोलिसांबरोबर बसुन हसत गप्पा मारत होता. मग मी पुर्ण निश्चींत झालो.
माझा पासपोर्ट आणि इतर कागद सॅकमधुन काढुन इमॅन्युअलच्या हातात दिले तेव्हा माझ्याबरोबरचा पोलीस खाउ का गिळु अशा नजरेनं पाहात होता माझ्याकडं. बाकी काही प्रॉब्लेम नव्हताच कागद सगळे पुर्ण होतेच. तरीही इमॅन्युअल ला जास्त वाद घालावा लागला. एकतर मी त्या पोलीसांच्या पोलीसपणावर विश्वास न ठेवल्यामुळे ते जास्त चिडले होते आणी त्यांची त्या रात्रीची वरकमाई पण मी बुडवली होती.
इमॅन्युअलच्या गाडीतुनच घरी आलो व त्याला लैवेळा धन्यवाद म्हणुन मॅगी खाउन शांत झोपलो.
माझ्या अदमासे एक महिन्याच्या वास्तव्यात ह्या इमॅन्युअलने कुठलंही काम वेळेवर आणि अचुक केल्याचा हा पहिलाच आणि शेवटचा प्रसंग. पण त्यानंतर मी बाकी सगळे प्रसंग अजिबात आरडाओरडा न करता त्याला सपशेल माफ करून टाकले हे वेगळं सांगायला नकोच.
आपण नेहेमी खूप 'प्रोटेक्टेड चॅनल' मधुन सगळीकडे प्रवास करतो म्हणुन कदाचित आपल्याला या स्थानीक समस्यांची म्हणावी तेवढी कल्पना येत नसेल. पण कधितरी एखाद्या प्रसंगी ते सगळं वास्तव त्या क्षणिक प्रकाशात लख्ख दिसुन जातं.
ता.क. - परत येताना माझ्या फ्लाइट मधे एक पुण्याचा तरुण होता. तो झांजीबार येथे एका हॉटेल मधे बल्लवाचार्य म्हणुन नोकरीला आला होता काही महिन्यांपुर्वीच. त्याच्या शेजारच्याच खोलीत दिवसाढवळ्या एकाचा खून झाला. ह्यानं तो प्रकार स्वतःच्या कानानं ऐकला होता दुपारी जेवताजेवता. हा बिचारा घाबरून परत निघाला होता. "साब, मै कैसा तो दो दिन रूका उधर, लेकिन नौकरी छोडके आया हू अभी. जान बची तो पैसा किधरबी मिलेगा, साब"
.
.
अवांतर - या भागात ही लेखमाला संपवायचा विचार होता, परंतु हा प्रसंग सांगायचा राहिला होता म्हणुन आज टाकलाय. माझे टुकार लेख वाचायला लावुन तुमचा अधिक अंत पहात नाही, पुढच्या भागात संपवतो. Smile

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ७

मी सफारीला जाण्याच्या आधीची गोष्ट आहे ही, ह्यावर वेगळा लेख लिहायचा विचार होता म्हणून थोडा उशीरा लिहितोय. इथे आल्यावर माझ्या राहाण्याची काय सोय झाली ते दुसर्‍या भागात सांगीतलंच आहे. नंतर थोडी खटपट करून युनिवर्सिटी पासुन काही अंतरावर माझा मीच शोध घेउन एक राहाण्याची जागा मिळवता झालो.
इथल्या मुख्य फाटकातून आत शिरल्यावर आपण कुठल्या देशात आहोत याचाच विसर पडतो. पन्नास टुमदार बैठ्या बंगल्यांची ही वसाहत. मुख्य मार्गाला आखुन दिलेले मोठे बांधीव रस्ते. प्रत्येक घराला स्वतंत्र हिरवळीनं माखलेलं मैदान. स्वच्छ. मोठं. चांगल निगा राखलेलं आवार, प्रशस्त खोल्या, सर्व अत्याधुनीक सोयीसुविधा, उंची फर्नीचर. स्वतंत्र पोहण्याचा तलाव आणि खेळाचं मैदान वसाहतीसाठी. अगदी वेगळ्या जनरेटरने केलेला विजपुरवठाही.. भारताच्या सर्वसामान्य घरांच्या रचनेच्या हिशोबाने अगदी 'लॅव्हीश' म्हणता येइल अशा प्रकारचा थाट आहे एकंदरीत.
उंच भितींनी आणि लोखंडी फाटकांनी आजुबाजुच्या गरीब जगापासुन जाणिवपुर्वक तोडलेली ही वसाहत, जणु एखाद्या उच्चभ्रू महागड्या सोसायटीचा युरोपातून अलगद उचलुन आणलेला तुकडाच. बाहेरच्या जगाशी फटकुन वागणार्‍या कॉलनीची सगळी वैशीष्ठ्य अगदी प्रथमदर्शनीच दिसुन येतात. बहुतेक सगळे रहिवासी युरोपियन किंवा अमेरिकन. स्थानीक अफ्रिकन माणुस, केवळ गेटवर, रखवालदार म्हणुन.
इथे रहायला येउन एकदोनच दिवस झाले होते. त्या मॅनेजरने सांगितलं होतच की सगळे बंगले काही भरलेले नाहियेत. तीसच भरलेत, त्यात पुन्हा वर्षातुन ठरावीकच दिवस रहायला येणार्‍यांचीच संख्या जास्त, त्यामुळे कायम लोकवस्ती असणारे बारा-पंधराच बंगले. मला तर आधी कुणिच दिसलं नाही आजुबाजुला.
मी रहायला आल्याच्या तिसर्‍याच दिवशीची गोष्ट. संध्याकाळी टॅक्सीतून उतरलो, आणि मुख्य फाटकातून आत शिरलो. सात-सव्वासात वाजले होते. माझ्याच विचारात एकटाच चालत होतो त्या आखीव रस्त्यांवरून माझ्या घरापर्यंत आलो, किल्ली शोधुन दार उघडलं. आत पाउल ठेवताना लक्षात आलं, काहितरी चुकल्याचुकल्यासारखं वाटतय. लाइटचं बटण दाबलं तेव्हा जाणवलं की कॉलनीमधे नेहेमीचे दिवे दिसत नाहियेत.. आणि घरातले पण लागत नाहियेत.
आता एवढ्या मोठ्या घरात एकट्यानं अंधारात बसायचं म्हणजे त्रासच की. शिवाय कॉलनीच्या तसल्या तुटक रचनेमुळे कसले आवाज नाहीत, की चाहुल नाही. नुसता भकास एकटेपणा आणि भयाण अंधार.. आता आली का पंचाइत, करायचं काय रात्रभर...
दुसरा काहीच पर्याय नव्हता, पोटाची सोय तर करायला हवी होती, इथं येउन एक-दोनच दिवस झाले होते. कुठली दुकानं वगैरे पण माहिती नव्हती. तरी शोध घेणं भागच होतं म्हणुन ऑफीसची बॅग घरात ठेवली. कपडे बदलले आणि बाहेर पडलो. नेहेमीचा कॉलनीबाहेर पडायचा रस्ता न पकडता, जरा घरामागुन कॉलनीबाहेर जाणार्‍या रस्त्याने चालत निघालो.
काही अंतर सोडुन एका घराच्या लॉन वर खुर्च्या मांडलेल्या दिसल्या. थोडा हसण्याखिदळण्याचा आवाज ऐकु आला. त्या गुडुप अंधारात काही अंदाज येत नव्हता. पण एकंदरीत चित्रावरून अमेरीकन लोकांच काहीतरी बार्बेक्यू वगैरे चाललं असणार हे ओळखलं. निदान लाइट कधी येणार हे तरी माहीत असेल तर विचारावं म्हणुन थोडा जवळ गेलो. आणि कानावर शब्द आले..
"मिष्टी खतम हो गयी क्या..." क्षणभर थबकलोच. जर त्या क्षणी माझा चेहरा कुणी पाहिला असता.. तर 'आनंदानं गहिवरून येणे' ह्या वापरून पापरुन गु़ळगुळीत झालेल्या उक्तीचा अर्थ कळला असता. मी अजुन अंधारातच होतो, त्या दिशेने पुढे सरकलो. एव्हाना त्याही मंडळींना माझी चाहुल लागली होती.
आटोपशीर टेबलखुर्च्या मांडलेल्या, मांडी घालुन बसलेला एक चाळीशीचा पण मस्त, मिश्कील गोरा माणुस. त्याच्या शेजारी बसलेली त्याची सुंदर बायको.. समोरच बसलेलं, आंधळ्यालाही ओळखु यावं असं टिपीकल गुज्जू कुटुंब.. (अगदी 'जिग्नेस' च). तो हाफ्चड्डीतला गुज्जूबाबा आणि त्याची दणकट बायको. आणि एकटाच बसलेला थेट दक्षिणेतल्या चित्रपटातुन उचलुन आणलेला केरळी 'कुमार'
माझा चेहेरा दिसायला लागल्याबरोबर, कुमार उठुन हसत हसत सामोरा आला. 'फ्रॉम इंडिया?' अशा प्रश्नानं सुरू झालेली ती मैफील पहाटेपर्यंत रंगतच गेली... बघता बघता चेहेरे फुलले, दुसरी खुर्ची आणली गेली, डिश समोर आली. ग्लास समोर आला.. ते पाचही जण इतका प्रेमळ आग्रह करत होती की बस्स.. शेवटी कुमारच्या बंगल्यातून जाउन त्यानं सोडा आणून माझ्या ग्लासात ओतला तेव्हाकुठे मंडळींचा आग्रह कमी झाला.. आयुष्यात दारु पीत नसल्याचा खेद अगदी मोजक्या वेळेला वाटलेला आहे आजपर्यंत, त्यापैकी हा एक प्रसंग...
हळु हळु अनेक विषय निघाले. घरच्या आठवणी निघाल्या. सगळी मंडळी इकडे गेली आठ दहा वर्षं राहात होती. वर्षातुन एकदोनदा भारतात खेप व्ह्यायची. सगळे इकडचेच होउन गेले होते. स्थानीक भाषा बोलत होते. रस्ते, पत्ते अस्खलीतपणे सांगत होते. पण कसल्यातरी शुल्लक वाटणार्‍या उल्लेखानं अगदी व्याकुळ होत होते. अगदी आतून जाणवणारी, हलवून सोडणारी वाक्य बोलत होते, आपल्या गावाचा, देशाचा उल्लेख आल्यावर.
त्यादिवशी त्या गांगुली दांपत्याच्या लग्नाचा चौदावा वाढदिवस होता. त्यानिमित्तच मैफल बसली होती. हसीमजाक होत होता. सुरुवातीला सगळे जरा सावधपणानं बोलत होते माझ्याशी बोलताना. पण थोड्यावेळातच, हा आपल्यासारखाच हसीमजाकवाला भिडु आहे हे समजल्यावर त्यांनी सहज सामील करुन घेतलं कळपात, आणि माहौल अजुन मोकळा झाला.
नवनवीन विषय चर्चेला येत होते आणि वेगात मागंही पडत होते. कधी मुल्यव्यवस्थेवर चर्चा चालली होती तर कधी दारूच्या ब्रँड्वर.. नवेनवे पदार्थही येत होते समोर. पण माझं मन त्या चर्चेमधे नव्ह्तंच मुळी. मी पहात होतो ते त्या सगळ्याच्या पलिकडचा मानवी स्वभाव. वयाच्या चाळिसाव्या-पंचेचाळिसाव्या वर्षीही थोडक्या उल्लेखानं कातर होणारी ती माणसं.. त्यांच निर्व्याज हसणं, बोलणं.. थोडा मद्याचा अंमलही असावा आणि कदाचित आपल्या मातीच्या आठवणींची नशाही असेल.. पण भावना अव्वल होत्या, हळव्या होत्या.
खुप सुंदर होती संध्याकाळ ती.. मिष्टीच्या, दुर्गापुजेच्या आठवणींनी उसळुन येणारा गांगुली, त्याची अप्रतीम सुंदर, मनमोकळी, बंगाली उच्चारातलं हिंदी बोलणारी बायको. लग्नाच्या चौदाव्या वाढदिवशीसुधा तिचं ते लाजणं. तो केरळी उच्चारात हिंदी बोलणारा कुमार, "मै ये सब चॉडक्ये वॅपस जाणे वाळा उं" म्हणत तावातावानं मुद्दा मांडण्याची त्याची पद्धत. सगळंच छान होतं, लोभसवाणं होतं...
रात्री उशीरा सगळ्यांचा निरोप घेउन अंधारातच घरी येउन पडलो... कितीतरी वेळ जागाच होतो... रात्रीच्या त्या निरव शांततेत कानावर येणारे हसण्याचे आवाज… डोळ्यासमोरुन हलत नव्हतं त्या गडद अंधाराच्या मखमली पडद्यावरचं सुंदरसं चित्रं......

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ६

पहिल्याच दिवशी जंगलात घुसल्या घुसल्या, चक्रधराशी संवाद सुरू केला. तो बिचारा गेले दोन दिवस एका जपानी ग्रूप बरोबर सगळं अभयारण्या पालथं घालत होता. सगळे प्राणी दिसले पण जंगलचा राजा काही दर्शन द्यायला तयार नव्हता.. त्यानं मला खुप वैतागुन हे सांगितलं.. माझा चेहराच पडला, त्यानं ओळखलं असावं काय ते.. तो पुढे काहीवेळ इकडे हत्ती दिसतील, हरणं दिसतील, तिकडे हिप्पो असतात वगैरे सांगुन सारवासारव करायचा प्रयत्न करत होता. मी मात्र हिरमुसला होउन, त्याच्या बडबडण्याकडे सरळ दुर्लक्ष करून, छतातून बाहेर तोंड काढुन उभा राहिलो..
पुढचा काही काळ त्याच पोझिशन मधे सावरून उभं रहाण्यातच गेला. तेवढ्यात चालकानं गाडीला एकदम ब्रेक लावला.. मी खाली वाकुन त्याला काही बोलणार एवढ्यात त्याने डावीकडे बोट दाखवून 'सींबा' 'सींबा' असं हळुच सांगीतलं..
चालक अनुभवी होता. त्यानं गाडी बंद केली लगेच.. मला आधी त्या पिवळ्या गवतात काहीच दिसेना, पण डोळे पिवळ्या छटांच्या बारकाव्याला सरावल्यावर हालचाल दिसु लागली... संथ, लयदार्...गवतासारखीच, पण थोडी वेगळी..
हळुहळू त्या पिवळ्या पार्श्वभूमीवर ८-१० मुर्तीमंत रुबाब नजरेला पडले... आमच्या डाव्या बाजुला ८-१० सींहांचा एक समूह, आपल्याच लयीत, डौलदारपणे, आमच्या वाहनाला समांतर चालत होता... तेच त्या वनराजांच पहिलं दर्शन... अस्सल कलावंताचं दर्शन असंच व्हावं नाही का... अचानक, उत्कट आणि उत्फुल्लही...वाह.. वनराजांच दर्शन तर अगदी यथोचीत झालं, तेही अगदी ध्यानीमनी नसताना... हा राजा अगदी खर्‍या सम्राटासारखा वागला.. मनातली इच्छा अगदी पुर्ण केली...
लयदार, दमदार पावले टाकत.. रुबाब म्हणजे काय.. सींहावलोकन म्हणजे काय.. ह्याचे जणु प्रत्येक पावलाला वस्तुपाठच देत तो जथ्था चालला होता.. हळुहळू गवतातून एकेक जण बाहेर येत होता, आमच्यामधलं अंतर कमी कमी होत होतं... काहीवेळ समांतर चालल्यावर त्यांच्यातल्या नायीकेने दिशा बदलली, आणि रस्त्याच्या दिशेने संथ पावले पडायला लागली... हळुहळू त्या सगळ्या काफिल्याचं नेतृत्व करत... केवळ नजरेनं जरब बसवत ती आम्हाला सामोरी आली.. मी सगळं विसरून एकटक पाहात होतो... हातातला कॅमेरा हातात तसाच राहिला होता...
संमोहीत झालो होतो त्या नजरेने... केवळ ३-४ सेकंद रोखुन पाहिलं तिने आणि काय वाटलं सांगु... भीती... केवळ प्रचंड भीती.. स्वत:च्या जिवाची नाही... नाहितर आम्ही खिडक्या लावल्या असत्या... गाडीत दडी मारून बसलो असतो... आम्ही समोरासमोरच पाहात होतो एकमेकांना... पण ती भीती अनामीक होती.. शब्दातीत होती... आदीम होती... अथांग होती ती नजर... 'क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव सुखे मरणांचा हो पुढे'...
भान आलं तेव्हा ती नायीका शांतपणे आमचा रस्ता अडवून ठिय्या देउन बसली होती.. अवघ्या ७-८ फुटांवर.. तीची एकेक हालचाल.. कटाक्ष... जणु पटवून देत होते तिचा जंगलातला अधिकार.. न बोलता पण ठामपणे.. हातातल्या कॅमेर्याची आठवण झाल्यावर काही फोटो काढले पण ती जरब, ती नजर काही पकडता आली नाही..
तब्बल १०-१५ मिनिटांनी सगळा गोतावळा पलीकडे गेल्यावर ती शांतपणे उठली.. आणि पुन्हा एकदा तो भेदक कटाक्ष टाकून शांतपणे चालती झाली पलिकडच्या गवतात... आयुष्य म्हणजे तरी काय.. असल्या जिवंत, चेतनादायी क्षणांची मालीकाच नाही का.. एरवीचे प्रेतक्षण कशाला मोजायचे..
"धीस इज अ लकी डे". माझा चालक सांगत होता. एरवी इवढ्या जवळुन दिसत नाहीत सींबा. रस्त्यावर तर अजिबात येतच नाहीत. पुढचे दोन दिवस, अनेक गाड्या भेटत होत्या, सींबा दिसला का असं विचारत होत्या आणि चालक अभिमानानं सांगत होता कुठे दिसला ते.. नंतर दोन दिवस काही दर्शनाचा योग नाही आला.
दुसर्‍या दिवशी फेरी संपवून परतीची बस पकडण्यासाठी जंगलातून परतीच्या रस्त्याला लागलो होतो.. तेवढ्यात एका गाडीवाल्यानं सागीतलं, पलिकडच्या दिशेला काही अंतरावर एक सींहीण आहे.. झुडूपात लपलिये पण झोपलेली आहे त्यामुळे लगेच गेलात तर दिसू शकेल.. लगेच गाडी फिरवली.. जवळजवळ १०-१२ किलोमीटरची रपेट केल्यावर त्यानं सागितलेल्या ओळखीच्या खुणा दिसायला लागल्या आणि मी एकदम ओरडलो... चालकाला दिशा दाखवली.. आणि सावकाश, आवाज न करता त्या ठिकाणी जाउन पोचलो..
आजचा रंग निराळाच होता.. दुपारी बाराचा सुमार.. डोक्यावर उन.. गारवा मिळवण्यासाठी, सावलीला आरामात राणीसाहेब पहुडल्या होत्या... दोन मोठ्या गाड्या सहा फुटांवर येउन थांबल्या तरी एका डोळ्याने पाहिल्या न पहिल्यासारखं करून पुन्हा आपल्या निद्रासाधनेत मग्न...
आम्हीही मग शांत उभे राहीलो.. काहीही आवाज न करता.. दहा-पंधरा मिनिटे गेल्यावर.. पोझ बदलून, आळोखे पिळोखे देउन, मातीत गडाबडा लोळणं, सुरू झालं... चार पाय वरती करून पाठीवर लोळणारं ते अजस्त्र जनावर खुप लोभसवाणं दिसत होते... नुसतं बघत रहावं असंच वाटत होतं.. उन्हानं होणार्‍या त्रासापासुन वाचण्यासाठी, सावलीत पाठ, पोट, जमिनीला घासून थंडावा मिळवण्याचा प्रयत्न चालला होता.
ते राजस रूप डोळे भरून पाहिल्यावर हळुहळू आवाज न करता मागेमागे होत नजर सींहीणीवरच ठेउन मागे सरकलो.. त्यांच्या वामकुक्षीमधे अधिक व्यत्यय न आणता.. त्यांच्या सार्वभौमत्वाचा मान ठेउन आम्ही हळुच काढती चाकं घेतली...
काही क्षण टिपलेत.. हे घ्या..


धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ५

त्या जंगलात फिरण्यासाठी स्वतःची गाडी असणे आवश्यक होते.. तिथल्या गाड्या नाहीयेत.... झालं.. एवढ्या कष्टावर बोळा फिरणार असं वाटलं क्षणभर. थोडी आजुबाजूला चौकशी केल्यावर शेजारच्या गावात भाड्याने गाडी मिळू शकेल असा सुगावा लागला.
एकट्यासाठी एवढे पैसे द्यायला जिवावर येत होतं. पण माज करायचाच तर दात टोकरून कशाला असा अस्सल विचार करून, थेट टोयोटाची, उघड्या छताची, फोर व्हील ड्राइव्ह, स्टेशन वॅगन ठरवली दोन दिवसासाठी, तिथल्याच एका रेंजरला चालक म्हणुनही ठरवून टाकला.. आणि क्षणाचाही विलंब न करता जंगलात घुसलो...आत शिरल्यावर सर्वप्रथम काय झालं असेल, तर जंगल ह्या संकल्पनेला जोरदार धक्का बसला.
पण हा धक्का सुखद होता. हे काही सदाहरीत जंगल नव्हे. हा तर सॅव्हाना प्रदेश. चारही बाजुला क्षितीजापर्यंत पसरलेलं पिवळंधम्मक गवत, चार ते बारा-पंधरा फूट उंचीचं... अधुनमधुन 'जागते रहो' असं सांगत रामोशासारखे उभे असणारे वृक्ष... नजर जाइल तिथपर्यंत फक्त पिवळा सोनसळी प्रकाश... मावळत्या प्रकाशात नववधुसारखं सामोरं आलेलं हळदीच्या माखल्या अंगाचं रान... वाह.. काय बेहोषी पहिल्या भेटीतच...
मी भारावल्यासारखा तो पिवळा-तांबूस सोहळा पाहात होतो. ती मावळतीची छटा, पिवळ्या गालिचावरून अस्तंगत होणारा तो लाल गोळा.. रंग बघावेत.. की आकार.. की सावल्या पहाव्यात.. की नुसते आवाज ऐकावेत.. गवताच्या पात्याची ती तळपत्या तलवारीसारखी सारखी सळसळ्..त्या पात्यावरून प्रकाशाची तिरीप चमकुन होणारा भास्..कधि ते चकाकतं सळसळतं गवत पाण्यानं भिजुनंच चमकतय असं वाटतं..
आणि ह्या सगळ्यावर आपल्या आरस्पानी सौंदर्यानं मुक्त बागडणारे ते पशुपक्षी. कधी शेकडो हरणांचे, काळवीटांचे कळप तर कधी एखादाच हत्ती, तर कधी लगबगीनं जाणारा एखादा जिराफ किंवा झेब्रा.
एखादा निवांतपणे गवत खाण्यात गुंग झालेला शेकडो हरणांचा अथवा काळविटांचा कळप म्हणजे तर साक्षात काव्यच.. ती झोकदार, अवखळ चाल, जराशा आवाजानं टवकारणारे कान.. तुमच्याकडं पाहुनही न पाहिल्यासारखं करणारी ती मोहक नजर.. आणि अचानक, अगदी अनपेक्षीत उधळणारा तो संपुर्ण मुक्तछंद....पाण्यावर दगड मारल्यावर अचानक जशा लहरी चौफेर उसळाव्यात तशी चपळ, त्वरीत पण लयबद्ध हालचाल..
एक एक चित्र म्हणजे अक्षरशः एकेक कविताच...
आमच्या करंट्या प्रतिभेला सीमा आहे.. सौंदर्याला नाही. आपली गाडी दिसायला लागल्यापासून दिसेनाशी होइपर्यंत टक लावून मान किंचितही न झुकवता दोन-तीन नर सतत आपल्याकडे बघत असतात. त्या नजरेचं संमोहन जबरदस्त असतं.. खेचलेच जातो आपण.. यालाच रानगारूड म्हणत असावेत का..
आम्हाला झेब्रा माहीती आहे तो, RTO च्या जाहिरातीतला, पण खरा झेब्रा जेव्हा रस्ता ओलांडतो तेव्हा जनजागृती मोहीम, शिट्टी, लाल दिवा कश्शाचीही आवश्यकता नसते. गाड्या आपोआप बंद होतात. नजर थबकते. जिराफ वगैरे भारदस्त मंडळींची तर काय ऐट विचारता, आपला घास खाता खाता मान तिरकी करून असं रोखुन बघतील की आपल्यालाच ओशाळल्यासारखं व्हावं, आणि आपण अनाहुतपणे बोलुन जावं 'चालुदे, चालुदे.. सावकाश'
पण हे सगळं, बघायला ओपन ४*४ असेल तरच खरी गंमत. छत उघडं टाकून, उभं राहुन, मोकळा, भणाणता वारा कान सुन्न होइपर्यंत तोंडावर घ्यायचा. चारीबाजुला नजर फिरवुन, त्या अथांग पिवळ्या कॅनव्हासवर एखादा फटकारा जिकडे दिसेल ती दिशा चक्रधराला ओरडुन सांगायची... की निघाले त्या दिशेने सुसाट.. चांगली गाडी, चांगला चालक आणि चांगली नजर असेल तर सफारीत मजा आहे.. नाहितर थोडं अडचणीचंच काम आहे ते... माझ्या बरोबर एक युरोपियन जोडपं बिचारं छोट्या कारमधुन आलं होतं.. प्रत्येक ठिकाणी हे पोहोचेपर्यंत प्राणी पसार व्हायचे.. प्रत्येक वेळेला हे त्यांच वरातीमागुन घोडं बघुन मलाच दया आली.
सॅव्हाना मधे पाहायचे ते 'बिग फाइव्ह' म्हणजे सींह, हत्ती, चित्ता, बफेलो, आणि गेंडा.. यापैकी हत्ती, बफेलो उदंड दिसले.. गेंड्यानं पण लांबुन दर्शन दिलं.. चित्त्याचा काही योग आला नाही.. आणि वनराजांच काय झालं हे पुढच्या लेखात..
काही प्रकाशचित्रे टाकतोय.. अगदी साधा कॅमेरा नेला होता, पॉइंट अँड शूट... काही फोटो चांगले आले असतील तर ती रानाची जादू, माझी कला नाही.. काही नसतील आले तर ते काव्य मला लक्षांशानेही टिपता आलं नाही हा साधा निष्कर्श.
इथल्या फोटोंचा एक वेगळा संग्रह कलादालनात प्रकाशीत करावा म्हणतो.. म्हणजे अजुन बरेच फोटो टाकता येतील..


धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ४

आपल्याकडे व्हॉल्वोचा सुकाळ होण्याआधी, खाजगी लक्झरी बस जशा असायच्या, तशा थाटाची ती बस, फक्त विडीओकोच सेवा नव्हती हे सुदैव. सुरूवातीला जरा स्थिरस्थावर झाल्यावर, मी शेजार्या्शी संवाद वाढवण्यासाठी शब्द जुळवायला सुरूवात केली, पण थोडं अंतर गेल्यावर डायवर सुराला लागला. मला कंडक्टरची पेशल शीट मिळाल्याने, माझी अवस्था मात्र केवीलवाणी झाली होती, मला सगळ्या प्रवासात सारखा एका डोळ्यानं डायवरपुढचा वेगमापक (स्पिडोमीटर) दिसत होता.. मी आख्ख्या प्रवासात त्यावरून नजर काढली नाही.
सगळा मिळुन सव्वादोन लेनचा तो हायवे. दोन्ही बाजुला सुसाट वेगाने जाणारी वाहने या सगळ्यात हा पठ्ठ्या काही शंभराच्या खाली यायला तयार नव्हता. जरा रस्ता रिकामा दिसला की लगेच १२०-१३० प्रतीतास. माझी गाडी मला खूप वेगाने चालवता येते हा माझा समज त्या जाता-येतानाच्या दहा तासाच्या प्रवासात त्याने समूळ नष्ट केला.
वार्‍याच्या वेगाने गाडी पळत होती, शहरातून बाहेर पडेपर्यंत दर १५-२० मिनिटांनी शीटा भरल्या जात होत्या, बहुतेक सगळे टिकटी रिझव केलेलेच असावेत. मधे एका थांब्यावर एक बाइ एकदम अस्सल मालवणी आवेशात कंडाक्टर आणि किन्नरची आयमाय काढुन गेली, कारणही अगदी तेच, तिच्या मुलाला बॅग डिकीत ठेवायला लावली, गाडीत बरोबर घेउ दिली नाही म्हणुन. वाटेत वाड्या वस्त्या लागत होत्या, मला सारखी कोकणातल्या रस्त्यांची आठवण होत होती.
वाटेत २-३ ठिकाणी पोलीस चेकपोस्ट लागले, पोलीस गाडीत चढुन सगळीकडे नजर फिरवून गेला, एकदा सगळ्यांना सीट-बेल्ट लावा असा हावभाव करून सांगुन पण गेला. प्रत्येक चेकपोस्ट वर गाडी नंबर ची नोंद होत होती, चेकपोस्ट ओलांडलं की ड्रायवर गाडी सुसाट पळवायचा.. निम्मं अंतर गेल्यावर एका चेक्पोस्ट वर गाडीत दोन पोलीस आणि एक महिला पोलीस चढले, त्यांनी ड्रायवर ला खाली उतरवलं.
हा काय नवीन प्रकार म्हणुन मी चिंतेत पडलो. तर तेवढ्यात त्या पोलिसानं मला अगम्य भाषेत काहीतरी पटवून द्यायला सुरूवात केली. पोलीस काहीही म्हणाला तरी त्यांचच बरोबर असतं हा धडा आपल्याकडे अनेक प्रसंगातून शिकलो होतोच म्हणुन काहीच कळेना तरी मी मान डोलावली.. त्यानंतर तो अजुनच पोटतिडिकीनं माझ्या खांद्याला हात लावुन काहीतरी सांगायला लागला, आणि काही वेळानं हताश झाल्यासारखा चेहेरा करून खाली उतरला.
नंतर मी शेजार्‍याला विचारल्यावर असं कळलं की ड्रायवरनं गाडी वेगात चालवल्यामुळं त्याला खोपच्यात घेतला होता, आणि तो पोलीस मला समजावून सांगत होता की 'तुम्ही प्रवाशांनी सांगायला हवं त्याला, वेगाबद्दल. शेवटी तुमच्या जिवाचा प्रश्न आहे.....'
मग आपल्या ड्रायवरनं खाली उतरून त्यांना काय सांगितलं या जिज्ञासेला पैसे मोजल्याची खुण करून त्यानं उत्तर दिलं आणि मी अत्यंत अजाणतेपणाचा हावभाव करून पुढचा प्रवासभर गप्प बसलो.
वाटेत खूप प्रसीद्ध किलिमांजारो पर्वत लागला, म्हणजे तसा समज माझा मीच करून घेतला. अगदीच काही 'ऑल्सो रॅन' नव्हता, चांगला मोठाबिठा होता तसा. गणेशोत्सवात आपल्याकडे कैलास पर्वत करतात तसा दिसत होता थोडासा.. धुक्यातून डोकावणारी शिखरं, उनसावलीचा लपंडाव ह्या सगळ्यात आपल्याच धुंदीत हरवल्यासारखा वाटत होता.
एक हरीण वाहनाची धडक बसून मेलं होतं. कुणी त्याकडे ढुंकूनसुधा बघितलं नाही, माझा मात्र जीव हळहळला. ते सुंदर मखमली कातडं रस्त्याला चिकटलेलं बघुन खुप गलबलून आलं. कुत्रं मेलेलं दिसतं तेव्हा एवढा विचार करतो का हो आपण?
प्रवासात आवर्जून जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे, मोबाइल क्रांती ह्या देशात अगदी शेवटपर्यंत पोचली आहे. अर्थात या एवढ्या दुर्गम देशात अत्यावश्यकच आहे म्हणा ते.. अगदी छोट्या वाड्या वस्त्यांवर सुधा प्लॅस्टीकच्या रंगीबेरंगी कापडाचे मोबाइल कंपन्यांचे स्टॉल, आकर्षक कॉल रेट्स च्या जहिराती, आणि गाडीत फेरीवाल्यांबरोबर विकायला येणारी रीचार्ज वाउचर्स. भारतातल्या सारखेच उदंड मोबाइल आहेत. बहुतेक सर्व व्यवहार प्रीपेड पद्धतीवर चालतो. आपल्या भारती ग्रूपनं नुकत्याच घेतलेल्या झेन टेलीकॉमचं वर्चस्व आहे.
दुपारी बाराच्या सुमारास मिकूमी अभयारण्याच्या मुख्य फाटकापाशी पोचलो. ३२३० वर्ग किलोमीटरचा एकुण आवाका, आणि त्याला मधोमध दुभागणारा हायवे...
तिथल्या अधिकारणीपाशी चौकशी केली आणि लहानपणापासून पिच्छा पुरवणारा एक ड्वायलॉग कानात घुमायला लागला. "तुझ्या टाळुवर कुणी तेल घातलय की नाही कुणास ठाउक. सारखं नन्नाचाच पाढा..."
(छोटे भाग टाकल्याबद्दल क्षमस्व, पुढचे जंगलातले दोन भाग येकदम टंकतोय.. होतच आलेत.. जास्त वाट पहावी लागणार नाही.)
त्या प्रवासात काही टिपलय.. हे घ्या


धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ३

सर्वप्रथम पुढचा लेख लिहायला उशीर झाल्याने क्षमा मागतो, इकडची काही कामे आणि माझ्या जंगलातल्या फेरफटक्याचे नियोजन यातच अडकलो होतो, त्यामुळे पुढचा भाग टंकायला वेळ नाही मिळाला, पण ती कसर आज भरून काढण्याचं ठरवलं आहे.
मी इथे येउन पडलो तेव्हाचा करूण आणि हृदयद्रावक प्रसंग तुम्ही मागच्या भागात वाचला आहेच, ते एकदोन दिवस तसेच काढून इथल्या लोकांच्यावर आरडाओरडा करून, माझ्या राहण्याची नवीन ठिकाणी बर्‍यापैकी सोय करून घेण्यात यशस्वी ठरलोय. ह्या दोन ठिकाणांमधे अगदी जमीन-अस्मानाचा फरक आहे. ही एक स्वतंत्र बंगल्यांची वसाहत आहे, युनिवर्सीटीच्या सीमेवरच. इथल्या शेजार्‍यांवर एक लेख पाडतोच नंतर, म्हणजे त्या सगळ्यांना स्वतंत्र लेखाचा मान दिलाच पाहिजे. पण तुर्तास सफारीकडे वळूया.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
इकडच्या २-३ दिवसांच्या अनुभवाने, हा अंदाज नक्की आला होता की इथे युनिवर्सीटीत माझ्या सहाय्याला म्हणुन जो अधिकारी दिला होता, त्याचा उपयोग यथातथाच असणार आहे. तो किती उपयोगाचा होता हे पुढे सांगतोच. पण या देशात, आपली अस्तित्वनौका आपल्यालाच तारून न्यावी लागणार आहे अशी मनाची तयारी केली होतीच. मला माझ्या इथल्या प्रवचनांच्या वेळापत्रकाप्रमाणे केवळ गुरूवार आणि शुक्रवार असे दोनच दिवस मोकळे मिळणार होते. त्या दोन दिवसांतच काहीतरी डाव केला पाहिजे ही खुणगाठ इथे आल्याआल्याच नक्की केली होती.
बुधवार दुपारपर्यंत कुठे बाहेर जाता येइल का, काही व्यवस्था होइल का, असं जमेल त्या मार्गानं. इथल्या लोकांना विचारत होतोच. कुणी ताकास तूर लागू देइनात साले... माझ्या आधी इथे येउन गेलेल्या सहकार्यांनाही विचारलं, भारतात फोन करून, त्यांनी अजुनच घाबरवलं, 'कुठेही जाउ नकोस एकटा', 'सार्वजनीक वाहनानं प्रवास करू नकोस' वगैरे वगैरे. यामागे काळजी होती की असूया होती कोण जाणे...
मग मीच माझ्या दोन तीन शिष्यगणांना थोडं घोळात घेतलं. बुधवारी संध्याकाळचं प्रवचन संपल्यावर त्यातले दोघे मला सोडायला आले, बहुदा माझ्या प्रवचनांवर खूश असावेत. त्यांच्यापुढे माझी अडचण मांडल्यावर त्यांनी आपापसात काही चर्चा केली आणि मला सागितलं की तुला आम्ही आमची गाडी आणि ड्रायव्हर गाठुन देउ शकतो. अथवा तुझी तयारी असल्यास तू बसनेही जाउ शकतोस. काय, कुठे, कसं ते आम्ही समजावून देउ. अत्यंत दु:खी स्वरामधे सुट्टी काढता येत नसल्याबद्दल माफीपण मागितली वारंवार.
आधीच खुप भीती असल्यामुळे निर्णय होत नव्हता. पण क्षणभर विचार केला. आपण नक्की कशाचा विचार करतोय? आपण भारतात एवढ्या प्रोटेक्टेड वातावरणात फिरतो का? आपण आत्ता या पदावर नसतो तर बसनं जायला एवढा विचार केला असता का? आपण नक्की काय कमावतोय आणि काय गमावतोय? आपल्याला भीती नक्की कशाची वाटतेय? आपल्या जीवाची की जवळ असलेले पैसे गमावण्याची? जिवाची वाटत असेल तर आत्ता आहोत तेही ठिकाण अनोळखीच आहे की. आणि पैसे गमावण्याची वाटत असेल तर... इथे जेवढी भीती आहे तेवढीच तिथे असणार आहे? आपल्याकडच्या शहरातला अनुभव काय आहे? लोक शहरात जास्त वास्तपुस्त करतात की खेड्यात? मग इथेही शहर सोडुन खेड्यात का जाउ नये?
१-२ मिनिटेच असा स्तब्ध उभा होतो. मनाचा वेग मोठा विलक्षण असतो नाही!! त्या मोजक्या क्षणांत कायकाय विचार येउन गेले मनात, कायापालट इतका झर्र्कन होत असेल... मी पटकन त्यांना म्हणालो.. 'ठिक आहे, कुठून बस पकडायची'....
त्या क्षणापासून पुढचे २ दिवस, सगळी आवरणं गळून पडली आपोआप. युनिवर्सीटीचा प्राध्यापक, कंपनीचा उपाध्यक्ष, कुठल्यातरी विषयातला ख्यातनाम तज्ञ वगैरे वगैरे सगळे खोटे मुखवटे विरून गेले .. माझा मी उरलो... सगळं विसरून पुन्हा एकदा गावाकडे फिरायचो तसा पाठीवर सॅक टाकून एक पाण्याची बाटली घेउन, नवीन जग बघायला, नवीन अनुभव घ्यायला, नवीन नजरेन सिद्ध झालो... नवा मी..
त्या देवमाणसांनी, मोठ्या बारकाइनं आणि काळजीपुर्वक आराखडा समजावून दिला आणि मी त्यांचा निरोप घेतला. दारापर्यंत पोचवायला गेलो तोच त्यातला एक जण मागे वळून म्हणाला. 'त्यापेक्षा आपण असं करू.... मी सकाळी ५ वाजता तुला न्यायला येतो, तुला गाडीत बसवून देइन म्हणजे काळजी नको'... मी काय बोलणार यावर..
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळी सकाळी त्या 'रॉबर्ट' बरोबर उबुंगो बस स्टेशनावर येउन पोचलो, थोड्याच वेळात अंधाराला डोळे सरावले आणि तो कोलाहल समजून घ्यायला लागलो...
साधारणतः बंगळूरूच्या मॅजेस्टीक सर्कलच्या बसस्टेशनएवढा आकार, तशीच काहीशी रचना. शिवाजी टर्मिनसला असते त्याच्या ७०% गर्दी, रत्नागिरी च्या येष्टी ष्ट्यांडावरची माणसं आणि चिपळूणच्या ष्ट्यांडावरचे वास एवढा मालमसाला एकत्र केला तर हे उबुंगो स्थानक डोळ्यासमोर येउ शकेल. वीविध आकाराच्या, प्रकाराच्या आणि रंगाच्या ८०-१०० बस लागलेल्या. सगळ्या बस खाजगी कंपन्यांच्या . सार्वजनीक वाहतूक अजुन सरकारच्या ताब्यात नाही.
तो सगळा कोलाहल बघुन, मी अनोळखी ठिकाणी आलोय असं वाटेचना. माणसं अस्सल देशी, अगदी आपल्या ष्ट्यांडावर पहाटे असते तशीच गर्दी, गर्दीत आपापली व्यवधानं सांभाळणारे तसेच पाशींजर, सराइतपणाच्या तोर्‍यातले तसेच डायवर-कंडाक्टर, लहान पोरांच्यावरती तसेच खेकसणारे मायबाप, गर्दीत पळापळ करून जागा धरणारी पोरं, तुमच्या अगदी नाकापर्यंत आणून केळी, वेफर्स, पाणी, कोक, उशी, काठ्या असे असंख्य चित्रविचित्र वस्तू विकणारे फेरीवाले, जड सामान डोक्यावरून नेताना अगम्य आवाज काढीत वाट मोकळी करून घेणारे हमाल, लगबगीने 'सुरक्षीत' जागेतुन पैसे काढुन देणार्या् तशाच अफ्रिकन महिला. सगळं जग आपल्याकडेच बघुन राहिलय अशा तोऱ्यात इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याचा अभिनय करणारे तरूणतरूणीही अगदी तस्सेच....
केवळ भाषा आणि पोषाख बदलले तर भारतातल्या कुठल्याही तालुक्याच्या गावी सहज नेवुन चिकटवावं हे चित्र.. अजिबात ओळखू येणार नाही या दोन खंडातलं अंतर.
मी कितीतेरी वेळ त्या रॉबर्ट बरोबर आलोय हे अजिबात विसरून हे सगळं पाहात बसलो होतो. तेवढ्यात तो कुठल्यातरी कंडक्टरशी बोलून, माझ्या जाण्यायेण्याचं तीकीट वगैरे व्यवस्था करून आला होता आणि त्या कंडक्टरशी 'पावने मुंबैवाले हायत, हौसेनं गावाकड चाल्लेत, जरा ध्यान ठिवा' वगैरे चालीवर बोलत होता. आता त्याला थँक्यु तरी कसं म्हणावं ते कळेना.... 'असांते' 'असांते' म्हणजे 'धन्यवाद' चा गजर करत गाडीत बसलो, आणि ठिक साडेसहा वाजता निघालो. अंतर कापायचं होतं तब्बल ४००-४५० किलोमीटर....
हाच तो रॉबर्ट, आणि पाठिमागे दिसणारं उबुंगो ष्ट्यांड

भाजून केळ खाणारे लोकं पहिल्यांदाच बघितले

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग २

माझं असं दणक्यात स्वागत झालेलं बघून मनातून खुश झालो होतोच, तो कार्यकर्ता इतक्या निरागस चेहेऱ्याने बघत होता की त्याला समजावून काय सांगणार कप्पाळ. तो मला हौसेने त्याच्या पिकअप वॅगन मध्ये बसवून युनिवर्सिटी मध्ये घेऊन आला.
पहिल्या नजरेतच गारद झालो. दीडशे एकराचा हिरवागार कॅम्पस, घनदाट झाडी, मधे मधे डोकावानार्‍या छोट्या इमारती, झाडीतून वळणं वळणं घेऊन जाणारे रस्ते. कॉलेज तरुण तरुणींचे हसतखिदळत आपल्याच धुंदीत जाणारे थवे. सगळं अगदी स्वप्नांतल्यासारखं. माझी राहण्याची सोय युनिवर्सिटीच्या रिसर्च फ्लॅट मधे केलीये अशी बातमी लागली. किल्लीने दार उघडून आत पाउल ठेवलं आणि स्वप्न मोडलं.
अगदी रानात असावं तसं एक कॉटेज, म्हणजे काय, रानातच होतं म्हणा ते, आजूबाजूला किर्र झाडी. खायचे प्यायचे वांदे. माझा चालक मला सोडून निघून गेलेला, स्थानिक मालकिणीला मी इंग्रजीशी थोडी झटापट करून माझे ‘छत्रपती’पण पटवायचा प्रयत्न केला, एकंदरीत संवाद येणेप्रमाणे.
मी – प्यायचं पाणी मिळेल का?
मालकीणबाई – हो, किचनच्या नळाला आहे ते प्यायचंच आहे. (ती जे इंग्रजी बोलली त्याचा असं अर्थ मी काढला, वेगळा अर्थ असल्यास कळायला मार्ग नाही )
मी – ठीकाय, पण काही त्रास नाही नं होणार?
मालकीणबाई – काय माहित, आम्ही पीत नाही ते. आम्ही बाटलीबंदच पितो.
मी – मग ते कुठे मिळेल?
मालकीणबाई – इथे काही अंतरावर युनिवर्सिटीच्या कॅटीनमधे मिळेल.
मी – ठीक आहे , चालू असेल नं ते आता?
मालकीणबाई – नाही, बंद झालं ते आता.
मी – आता हो !!
मालकीणबाई - उद्या मिळेल पण तुम्हाला नक्की.
मी – आणि ए. सी. चालू नाहीये..
मालकीणबाई – पंखा चालू आहे.
मी – संडासाचे दार लागत नाहीये.
मालकीणबाई – हो.
मी अधिकचा संवाद टाळला, प्रवास बराच झाला होता. परक्या देशात स्त्रीहत्येचं पातक कशाला डोक्यावर म्हणून सोडून दिलं. हताश चेहेर्यानं रूमवर येऊन. थोडसं फरसाण खाल्लं. विमानतळावर एक कोकची बाटली घेतली होती ती अगदी शेवटच्या थेंबापर्यंत चवीचवीने संपवली आणि झोपलो.
कितीतरी वेळ झोप लागत नव्हती, किर्र झाडी अंगावर येत होती, कितीतरी वर्षांनी मी जंगलाचा आवाज एवढ्या निवांतपणे ऐकत होतो. एवढ्या शांततेत स्वतःलाच सामोरं जाणही खूप अवघड असतं बुवा.
आयुष्यातल्या काही रात्री, तुमचा अहं, मानसन्मान, प्रतिष्ठा, अक्कडबाजपणा सगळं सगळं खेचून पार नागवं करून सोडतात. त्यापैकी ती एक.... असो.
दुसऱ्याच दिवशी प्रवचन होतं, लवकरच जाग आली, थोडा बाहेर आलो फेरफटका मारायला तर, सगळ्या आसमंतानं एकदम रूपच पालटलं होतं. की मलाच रात्रीच्या त्या खोल, खडसावानार्या स्वसंवादामुळे नवी उत्तरं मिळत होती. कोवळं उन पांघरून, सगळं रान बेटं मोठ्या साळसूदपणे उभं होतं.
मस्त ताजी पहाट, पक्ष्यांचा किलबिलाटात, एवढ्या वृक्षांच्या समवेत बघायची म्हणजे, त्याला आमचं निबर मन काय कामाचं, त्याला बालकवींची किंवा बोराकारांची हळूवार, तरल प्रतिभाच काहीतरी न्याय देऊ शकेल. मी कितीतरी वेळ शांतपणे एकटाच घोटाघोटाने ती अप्रतीम सोनपहाट पीत होतो.
आपण ह्याच केम्पस मधे राहणार असू तर रोज इथे असेपर्यंत ही पहाट पहायचीच असा तेव्हाच मनोमन निश्चय केला.
बाकी काही बघायला वेळच नाही मिळाला आज, सरळ प्रवचन चालू केलं. आमच्या शिष्यगणाचा एक फटू तेवढा काढलाय हा घ्या

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग १

आजवर कामाच्या स्वरूपामुळे अनेक ठिकाणी फिरण्याचा योग आला. अजूनही येतच आहे, पायाला चक्र लागलंय कधी थांबणार माहिती नाही. ताकद आहे तोवर फिरतोय, घरट्याची ओढ वाढलीये, भरारीची झेपही. नवीन मुलूख बघतोय, अनवट वाटा शोधतोय, नवीन माणसं धुंडाळतोय. चालूच आहे माझा शोध आणि ‘माझा’ शोध.
माझे सगळे प्रवास तसे लहानसे असतात, दहा-पंधरा-वीस दिवस फारतर एक महिना. आतापर्यंतची सगळी भ्रमंती, सगळे प्रदेश तसे नेहेमीच्या पठडीबाहेरचे, इंग्लंड अमेरिकेत आम्हाला कुणी बोलावत नाही. तिथे जाण्याची तीव्र इच्छा एकेकाळी होती तशी आता जाणवत नाही, तिथे जायचं नाहीच असेही नाही. (‘२२१बी, बेकर स्ट्रीट’ वर मात्र अजूनही जायचंय एकदा तरी ) अजूनही खूप भ्रमंती होणार आहे, सुरुवातीचा ‘लाजते पुढे सरते, फिरते’ चा काळ आता गेलाय. आता मजा वाटतेय... चष्मा काढून बघितलं तरी धूसर नाही दिसत आता.
जगात कुठेही गेलो तरी रंगपेटी सारखीच, तुम्हाला कुठला खडू मिळणार हा शेवटी ‘गेम ऑफ चान्स’. कधी काळा, कधी करडा, कधी छान गुलाबी, कधी शांत निळा. कुठलाही खडू हाताशी आला तरी, बाकीचे रंग त्याच्या शेजारीच असतात हे विसरायचं नसतं. कित्येक वेळा आपलं रंगाकडे लक्ष जातं, प्रत्येक रंगातल्या समान स्निग्धतेकडे जातच नाही पण ती असतेच ना. जाणवतो हा समान धागा या सगळ्या रंगांमध्ये कधीतरी. असो, पाल्हाळ आवरतो नाहीतर रूपक होऊन जायचं.
आजच्या टंकनकळा आहेत, एका नवीन रंगपेटीसाठी. निमंत्रीत प्राध्यापक म्हणून आफ्रिकेतील एका विश्वविद्यालयात यायचा योग आहे. मला त्यांच निमंत्रणपत्र आलेलं, मुद्दाम कुणा मित्रांना दाखवलेलं नाहीये, माझा माझ्या मित्रांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांचे त्यावरचे कुत्सित कटाक्ष, आणि हलकट्ट हास्य, हे कुणाचाही आत्मविश्वास गमावण्यासाठी पुरेसे आहेत. तर ते एक असो. मी ह्या विश्वविद्यालयात तात्पुरता का होईना पण प्राध्यापक म्हणून दाखल झालो आहे.
आफ्रिकेतला गरीब देश असल्यामुळे विजा, अर्ज, विनंत्या वगैरे भानगड नाही, अगदी ‘येवा, टांझानिया आपलाच असा’ हा घोष सुरुवातीपासूनच ऐकू येतोय. इथे या, साधा अर्ज भरा, सही करा, थोडे डॉलर द्या, लगेज विजा. त्या इमिग्रेशन वाल्या महिला अधिकाऱ्याने, गोड हसून ‘वेलकम’ म्हणाल्यावर डोळे अंमळ पाणावले. कुठल्याही गणवेशधारी अधिकाऱ्याला, सामान्य जनतेकडे बघून हसताही येतं ही भारतात केवळ अफवाच. थोडक्यात काय, तर जगाकडे बघून आपलं ते सुंदर मोहक आफ्रिकन हास्य करत लोकं स्वागताला उत्सुक आहेत.
१०-१२ तासाचा कंटाळवाणा प्रवास करून गेल्यावर, नेहेमीचे कंटाळवाणे सोपस्कार करायला अगदी जीवावर येत होतं. सामान वगैरे शोधाशोध झाल्यावर, स्थानिक चलन घ्यायला गेलो आणि पहिला सुखद धक्का, टांझानियन शिलीन्गाची भलीमोठी गड्डीच घेऊन बाहेर पडलो, चक्क साडेसात लाख शिलिंग मिळाले अवघ्या पाचशे डॉलरला. अगदी खरं लक्षाधिश झाल्यासारखं वाटलं काही क्षण.
बाहेर येऊन विमानतळावर जरा शोधाशोध करतो तर कुणीच माझ्या नावाची पाटी घेऊन दिसेना. मी हल्ली या प्रकाराला वैतागणे सोडून दिले आहे, तरी जरा अचंबाच वाटला. सगळ्या जपानी नावांच्या पाट्या, दोनचार अमेरीकन, ओळखीचे काहीच दिसेना.
त्यातल्यात्यात एका ओळखीच्या पाटीकडे नजर गेली, चांगला हसतमुख कार्यकर्ता होता, बहुतेक त्याने माझा फोटो आधी बघितला असावा किंवा माझ्या चेहेर्‍यावर केवळ ड्रायवर, रिक्षावाले यांनाच ओळखू येणारा, एक यडबंबु सारखा भाव गोंदून ठेवला असावा. पण तो लगबगीने माझ्याजवळ येऊन पाटीकडे बोट करू लागला. नीट वाचलं आणि दचकलोच. माझा नकळत का होईना पण एवढा मोठा सन्मान बघून मला शब्दच सुचेनात. मनात दणकून खुश झालो, म्हणालं चला सुरुवात तर चांगली झाली. आता ह्या देशात कुणाची माय व्यालीये माझ्या वाटेला जायची.
धक्का ओसरल्यावर मी विचारलं, ही पाटी कुणी लिहिलीये, तेव्हा त्यानं मला अत्यानंदानं आणि अभिमानानं माझ्या तिकीटाची प्रत दाखवली, त्यावरच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या विमानतळाचं नाव त्यानं माझंच नाव समजून अगदी न चुकता पाटीवर लिहून आणलं होतं. मी निरुत्तर. हे बघा काय ते...