Sunday, December 22, 2013

रिक्षावाले

कुठल्याही शहरातले रिक्षावाले यांचं माझ्याशी नक्की नातं काय हा प्रश्न मला अजून सुटलेला नाहीये.
माझ्या चेहरयावर केवळ ह्या लोकांनाच वाचता येणाऱ्या भाषेत कायमचा एक यडबंबु भाव कोरून ठेवला असावा, किंवा त्यांना केवळ माझा चेहेरा पाहून 'हा येणारा इसम अगदीच ‘हा’ असून ह्याला गंडवलं नाही तर संघटना आपल्याला वाळीत टाकेल' अशी भीती वाटत असावी. नेमका मी गेल्यावर ‘ह्याला आपल्या घरी आज फुकट जेवायलाच घेऊन जायचंय’ असे चेहरे करून बघतात लेकाचे. त्रास ‘नाही’ म्हणल्याचा होत नाही हो, ते ज्या हलकट्ट सुरात म्हणतात त्याचा होतो. ‘स्वारगेटला येणार का’ असं विचारल्यावर ज्या स्वरात मला आत्तापर्यंत उत्तर मिळाली आहेत ती जर तुम्ही ऐकलीत तर तुम्हाला माझ्या हेतूविषयी आणि गंतव्य स्थानाविषयी नक्की शंका येईल.
हा प्रश्न मला भेडसावायला लागला त्याला आता खूप वर्ष झाली. तेव्हा मी कॉलेजला शेअररीक्षा किंवा ज्याला आमच्याकडे वडाप म्हणतात त्याने जात असे, बापानं खडूसपणा दाखवून अजून बाईक घेऊन दिली नव्हती. पॉकेटमनी नावाची ‘नियमित उत्पन्न योजना’ आमच्या वेळेला एवढी बापप्रिय नव्हती. त्यामुळे जसे लागतील तसे पैसे घेऊन शेअररीक्षाने २.५ रुपयात कोलेजला जाणे हा सर्वमान्य उपाय होता. अगदी त्यावेळेपासूनच ‘रम्य’ आठवणी आहेत या लोकांच्या. अगदी पहिला पाशिंजर मी असलो तरी मीच आत बसायचं, आणि मी शेवटी आलो तरी मीच आत बसायचं. माझ्या कॉलेज आयुष्यातली अनेक लेक्चर मी केवळ रीक्षाचा प्रवास करून गेल्यावर परत लाकडी बाकावर बसायला लागू नये म्हणून बुडवली आहेत. ज्यांनी रिक्षातुन त्या उजव्या बाजूला लावलेल्या बारक्या लोखंडाच्या आडव्या दांडीवर बसुन प्रवास केलाय त्यांनाच कदाचित माझं दु:ख कळू शकेल.
मी समजत होतो कि रिक्षातुन फक्त चार किंवा जास्तीतजास्त पाच माणसं जाऊ शकत असतील, चालक सोडून. पण अलीकडेच हैद्राबाद मध्ये मी शेअररीक्षा सारखाच एक प्रकार बघितला, आणि माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा कुठल्याही क्षणी रुंदावू शकतात याचा अनुभव घेतला. त्या छोट्याश्या वाहनातून ते दाक्षिणात्य भरदार स्त्रीपुरुष ८-१० च्या संख्येने आरामात गप्पा मारत प्रवास करताना पहिले आणि मनोमन प्रवास ह्या शब्दाला ‘सफर’ हा इंग्रजी अर्थाचा हिंदी प्रतिशब्द योजणारयाला प्रणाम केला. तसे मी बऱ्याच शहरात रीक्षावर सर्वांगीण अत्याचार झालेले बघितलेत पण आमच्या भागानगरातली मौजच न्यारी, ‘पुढे एक मागे चार’, ‘पुढे दोन मागे तीन’, ‘पुढे तीन मागे दोन’, अश्या असंख्य शक्यतांचा सामना ह्या डोळ्यांनी केल्यावर आता माझी ‘पुढे शून्य मागे दहा’ असे प्रवासीही चालत्या रिक्षात बघायची तयारी आहे.
पण रिक्षातुन अनेक प्रवाशांना नेलं तरच गैरसोय होते असं जर तुमचा गैरसमज असेल तर तो दिल्लीच्या रिक्षातुन प्रवास करून मोडू शकेल, खरतर मोडू बरच काही शकेल. दिल्लीत रिक्षा विकताना बहुतेक शॉकअब्सोर्बर काढून विकत असावेत. समोर दिसलाच तर दिसणारा अगदी नगण्य खड्डा, तुमच्या मणक्यापर्यंत पोचताना भलताच दणका देऊन जातो. थोडक्यात अर्धा तास प्रवास केलात तर आपण रिक्षातुन चाललोय की ‘अन्त’रिक्षातुन हेच कळेनासं होतं. बरं त्याला सांगायला जावं तर तो मान मागे वळवून आपल्याला दिल्लीतल्या रस्त्याबद्दल तक्रारी सांगू लागतो, आपला जीव खालीवर.
नोएडामध्ये ते सायकलरीक्षावाले असतात, खरं सांगू का त्यापैकी कुणी ‘कहा जाना है’ असं विचारू लागला ना कि खरच गलबलून येतं हो. नाही पण म्हणवत नाही आणी ते श्रम पहावतही नाहीत. मी तरी अजून त्यातून कधी गेलेलो नाहीये. तीच गोष्ट कलकत्त्यात. अगदी नको नको होऊन जातं ते त्यांचे श्रम बघून.
त्यातल्यात्यात मुंबईचे रिक्षावाले बरे वाटतात. मलातरी अनुभव चांगला आहे. माझ्या एका दिल्लीच्या मित्राला मुंबईत रीक्षावाल्याने वरचे सुट्टे दोन रुपये परत दिलेले पाहून अगदी भरून आलं होतं. पुण्यातले एकेक अनुभव वर्णन करायला लागलो तर उगच इथेच आखाडा व्हायचा नेहेमीसारखा. पण मी हल्ली पुण्यात थोडा सावधपणे रीक्षात बसतो, शक्यतो कुठेतरी जाणारी रीक्षा थांबवतो, स्टॉपवरची नाही निवडत, मग नाही म्हणत नाहीत शक्यतो. पण पुण्यातही काही चांगले अनुभव आहेतच, मी तरी लगेच जनरलायझेशन करणार नाही, पण पुण्यातले वाईट अनुभव मला तुलनेने जास्त आहेत हे खरंच.
पुण्यात अथवा मुंबईत मला हौशी रिक्षावालेही नाही दिसले कधी, सांगली, कोल्हापूरकडे तो अनुभव जास्ती, स्वच्छ चकचकीत पांढरं हूड, पोलिश केलेली बोडी, हूडच्या आतमधून सुंदर लाल, निळी हिरवी नक्षी. पितळी चकचकीत हँडल, चालकाच्या पाठीमागे मखमली कुशन, आत छोटासा पंखा आणि ढाकचिक ढाकचिक वाजणारा डेक. वा वा क्या बात है. साला रिक्षा असावी तर अशी.

No comments:

Post a Comment