Sunday, December 22, 2013

बरान


बरान


माझिद माझ्दी हा माझा अत्यंत आवडता दिग्दर्शक. कलर ऑफ पॅरेडाइज, चिल्ड्रन ऑफ हेवन, द फादर अशा सगळ्याच कलाकृतींचा मी प्रचंड चाहता आहे. माझ्या तेहेरानच्या वास्तव्यात माझी या असामीची भेट होऊ शकली नाही याची अजुनही मला हुरहूर वाटते.
त्यांच्या सर्व कलाकृतींमधे माझी विशेष आवडती फिल्म म्हणजे 'बरान'
रशिया - अफगाण युद्धामधे विस्थापीत झालेले अफगाणी निर्वासीत लोक लपूनछपून तेहेरान बाहेरच्या निर्वासीतांच्या छावण्यांमधून दुर्दैवाचे दशावतार भोगताहेत. इराणमधे त्यांना कामासाठी येण्याची मुभा आहे पण अनेक नोंदी करून आणि ओळखपत्र मिळवूनच. इराणमधे राहण्याचीही अनुज्ञा नाहीच, दिवसभर काम करून संध्याकाळी छावणीत परत. याशिवाय अनेक अफगाणी निर्वासीत ओळखपत्राशिवाय अनधिकृतपणे तेहरानच्या जवळपास अगदी तुटपुंज्या मोबदल्यावर काम करून लपुनछपून दिवस काढतायत. स्वदेशापासून तुटलेली आणि त्यामुळेच आपापसात ऋणानुबंध तयार झालेली माणसे..
अशाच एका मोठ्या इमारतीच्या बांधकामावर अनेक अफगाणी अनधिकृतपणे काम करताहेत, एक इराणी मुलगा याच बांधकामावर चहा देणे, जेवण बनवणे इत्यादी आरामाची कामे करून दिवस काढतोय. तिथल्या इराणी - अफगाणी कामगारांना टोमणे मारणे, पक्ष्यांना दगडं मारणे, काहीसा उडाणटप्पूपणा करणे ह्या सगळ्या मधे 'लतीफ' चे दिवस आरामात चाललेत.
अचनक एके दिवशी एक अफगाणी मजूर नजाफ याला बांधकामावर अपघात होउन दवाखान्यात जावं लागतं, आणि पुन्हा आपल्यासमोर त्या विदीर्ण आयुष्यातले कष्ट आणि अपरिहार्य दु:ख चमकून जातं. दुसर्‍या दिवशी नजाफचा मुलगा रहामत त्याच्याऐवजी कामावर येतो. नजाफसारखंच कष्टाचं काम करण्याचा तो बिचारा प्रयत्न तो करतोही पण गरीब चेहेरा आणी अशक्तपणामुळे त्याला कष्टाचं काम न देता लतीफचं आरामशीर काम देण्यात येतं आणि आपल्या लतीफवर पुन्हा विटा आणि पोती उचलायची वेळ येते.
चिडलेला लतीफ रहमतचं जिणं अवघड करून टाकतो, त्याला हरप्रकारे त्रास देतो, पण रहमत चकार शब्द न बोलता आपलं काम करतच रहातो. या सगळ्या घटनाक्रमात आपल्याला लतीफचा राग अजिबात येत नाही, उलट आपल्या जाणवत राहतं ते महाग होणार मानवी आयुष्य. त्या सगळ्याच घटनांची अपरिहार्यता आणि हतबलता..
अचानक एका संतापाच्या क्षणी लतीफला हे कळतं की रहमत हा मुलगा नसून मुलगी आहे, आणि वडिलांच्या गरीबीला हातभार लावण्यासाठी हे अवघड काम ती करतेय. लतीफच्या चेहेर्‍यावरचे भाव बदलत जातात. अपराधीपणा, करूणा, संताप अशा अनेक छटामधून एका कोवळ्या निरागस नात्याचा अंकूर जन्म घेतो.
अकस्मात कथा एक करूण वळण घेते, बांधकामावरून सर्व अफगाण मजूरांना हाकलून द्यावं लागतं आणि रहमतही परागंदा होतो/ते.. लतीफचा अस्वस्थ करणारा शोध सुरू होतो 'रहमत'साठी म्हणजेच खर्‍या 'बरान'साठी...
त्यापुढचा सगळा प्रवास केवळ स्तब्ध करणारा, मानवी भावनांचे खोल पण ओळखीचे रंग अधीक गहिरेपणाने जाणवून देणारा....
नियती नावाच्या हरामखोर श्वापदाचा सतत संताप येत रहातो. प्रत्येक व़ळणावर असंख्य प्रश्न उभे रहातात. उत्तरासाठी आपली तडफड चालू रहाते..
कथेच्या ओघात अनेक पात्रांच्या तोंडून काही क्रूर पण शाश्वत सत्यं समोर येतात, आयुष्याचं तत्वज्ञानही इतक्या भयाण पणानं समोर येत रहातं.. आपली घालमेल होतंच रहाते... प्रेमाचा अर्थ जाणवतो आणि वैयर्थही..
आणि ह्या सगळ्याच्या पाठिमागे युद्धाची पार्श्वभूमी एखाद्या कातर करणार्‍या सारंगीच्या खोल स्वरासारखी सतत जाणवत राहाते, काळीज पोखरत रहाते...
कथेचा सगळ्यात अप्रतीम भाग म्हणजे शेवटच्या दॄष्यामधील प्रेमाचा आश्वासक स्वर.. रहमतच्या गालावरचं हलकं पुसटसं स्मित.. प्रीतीचा इतका हळुवार संवाद... आणि शेवटी कोसळणारा 'बरान' म्हणजेच 'पाउस'
युद्धाच्या रखरखीत वाळवंटात भिरकवली जाणारी आयुष्याची लक्तरं आणि त्याच विदीर्ण पार्श्वभूमीवर एक सोनेरी हळूवार अल्लड प्रेमकथा ही आवर्जून पहावी अशीच आहे...

No comments:

Post a Comment