Sunday, December 22, 2013

हवेतल्या गोष्टी - १

सकाळी सकाळी मस्त पांघरुणात गुरफटून झोपावं, उन्हं वर येईपर्यंत. बायकोनं मस्त चहाचा कप हातात आणून द्यावा.. पण हे काही घडत नाही. साला नोकरीच अशी आहे की घरी येऊन बॅग टेकतो न टेकतो तोच पुढचं तिकीट मेलबॉक्स मधे येऊन पडतं. खूप जीवावर येतं आपल्या माणसांना सोडून पुन्हा घराबाहेर पडायचं.
पायाला काय भिंगरी लागलीये कळत नाही. दर दोन दिवसांनी एक फ्लाईट पकडायची आणि सारखं पळत रहायचं, दमायला परवानगीच नाही. थांबता येणार नाही असं नाही, कारण माझा कुणीच पाठलाग वगैरे करत नाहीये. मीच कशाचातरी पाठलाग करतोय. कसला कुणास ठाऊक.
सहज म्हणून मोजलं तर मी गेली ६-७ वर्षं सतत प्रवास करतोय, महिन्यातून १५ ते २५ दिवस. सतत आणि अखंड भटकंती. आजवर अनेक रात्री एअरपोर्टवर आणि लाउंजमधे काढल्यात. कधी फ्लाईट लेट आहे म्हणून, कधी रद्द झाली म्हणून. कधी कनेक्टींग फ्लाईट लगेच नाहीये म्हणून. आता प्रत्येक विमानतळावरचा लाउंज हेच घर वाटायला लागलंय. पुणे, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद आणि कोलकोता ह्या विमानतळावरचा कोपरान् कोपरा पाठ झालाय. एवढंच कशाला, विमानकंपन्यांचं वेळापत्रक, कुठल्या विमानात कुठला सीटनंबर इमर्जन्सी विंडोशेजारी येतो. कुठच्या एअरलाईनचं बोर्डिंग गेट कुठलं, असला बारीकसारीक तपशीलही तोंडपाठ झालाय.
ह्या कटकटीच्या कार्यक्रमात एकमेव आसरा म्हणजे हातात एखादं जाडसं पुस्तक, आणि लाउंजमधली आरामखुर्ची. त्यातही कवितासंग्रह असेल तर क्या केहने... पुस्तक नसेल तर आयपॉडवर कुमारजी किंवा अभिषेकीबुवा. काय तंद्री लागते म्हणून सांगू.
पण कधी कधी याचाही कंटाळा येतो. मग इअरफोन नुसता कानात अडकवून ठेवायचा, आणि आजूबाजूची गम्मत पहात बसायचं. कानात इअरफोन लावून, शून्यात डोळे लावल्याचा अभिनय करत, आजूबाजूचं संभाषण ऐकायची, निरीक्षण करण्याची कला अवगत करावी लागते. तुम्ही लक्ष देताय असं वाटलं लगेच मंडळी कॉन्शस होतात.
सहज नजर फिरवली तरी असंख्य नमुने बघायला मिळतात. काळाकरडा कोट घालून इंग्रजी वृत्तपत्र वाचत बसलेले आखडू लोकं. सराईत नजरेला यांच्यातले नवखे कोण आणि मुरलेले कोण हे झटक्यात ओळखू येतं. सफारी घातलेले हातात चॉकलेटी ब्रीफकेस घेतलेले म्हातारे, इन्फोसिस, विप्रो इत्यादी कंपन्यांच्या सॅक पाठीवर टाकून ब्लॅकबेरी शी चाळा करत, हळूच इकडेतिकडे बघणारे तरुण. सोळा ते तीस वर्षे वयोगटातल्या, तंग आणि अपुरे कपडे घालून नाक फेंदारत चालणाऱ्या ललना. वय वर्षे दोन ते आठ मधली विमानातळ डोक्यावर घेणारी बच्चेकंपनी, पांढरे कपडे घातलेले आणि प्रंचंड घाईत असल्याचं दाखवणारे पुढारी, कडेवरचं मुल सांभाळत भांबावलेल्या चेहेर्‍यानं इकडेतिकडे पाहणाऱ्या लेकुरवाळ्या बायाबापे, ह्या लोकांना आपापल्यापरीने मदत करणारा लालनिळ्या कपड्यातला ग्राउंड स्टाफ, ह्या सगळ्या धांदलीकडे अत्यंत तुच्छतेने पहाणाऱ्या हवाईसुंदऱ्या, क्वचित कडक इस्त्रीचे कपडे घातलेले आपल्याच गप्पात गुंगलेले पायलट लोक. पाहावं तितकं कमीच.
सुरवातीच्या दिवसांमध्ये, ह्या हवाईसुंदऱ्या, त्यांची टापटीप, तंग कपडे, सतत सावरला जाणारा मेकप, आपल्याच तोऱ्यात चालण्याची ऐट हे पाहून एकतर असूया तरी वाटत असे किंवा राग तरी येत असे. पूर्वी मित्रांच्या बरोबर चेष्टामस्करी करताना माझा रोजचा विमानप्रवास आणि हवाईसुंदऱ्या यावरून काही कॉमेंट्सही होत असत.. पण जितकं त्यांचं काम जवळून पहात गेलो, तितका आदर वाढत गेला, आता कधीच असा वावगा उल्लेख होत नाही. उलट कधी नामोल्लेख झालाच तर आदरानेच होतो. सी.आय.एस.एफ. अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे जवान आणि अधिकारी, हे या खेळातले असेच दुर्लक्षीलेले शिलेदार.
आता इतक्या दिवसाच्या सान्निध्यानंतर हवाई सुंदऱ्या, एअरलाईन स्टाफ, सीआयएसएफ चे जवान यांच्याशी एक नातं नकळतच तयार झालंय. बरेच जण ओळखीचेही झालेत.
एवढ्या वर्षांच्या प्रवासात, एअरपोर्टवर, विमानात, लाउंजमधे, सिक्युरिटीचेकमधे, आतापर्यंत अनेक किस्से घडलेत. अनेक माणसं मनात घर करून बसलीयेत. अनेक चित्रविचित्र प्रसंग आहेत. सहप्रवाशांच्या कानगोष्टी आहेत.
अशा खूप हवेतल्या गोष्टी मनात आहेत. त्या आठवतील तशा आणि वेळ मिळेल तशा सांगणार आहेच..
सध्या इतकंच..

No comments:

Post a Comment