Sunday, December 22, 2013

व्हेइकल

एसीचा एकसुरी आवाज, आणि हॉटेलच्या खोलीचा पिवळा पंडूरोगी प्रकाश, सेकांदामागून सेकंद, तासामागून तास चालूच..
एकटेपणा शरीरावर चढत जातो शेवाळासारखा. मनावर अंधाराचे थरच्याथर चढत रहातात बुळबुळीत बुरशीसारखे. आतल्याआत आक्रसून जायला होतं, खोल अंधाऱ्या गढूळ पाण्यातल्या कोशातल्या किड्यासारखं.
त्या कोशातल्या अंधारातून बाहेरचं रंगीत जग दिसतं, पण कोश सोडता येत नाही, अनामिक आदिम भीती वाटत रहाते...
एखादा जरी रंगीत कवडसा पडला तरी, एखादा नवखा जीव उत्सुकतेने पाहू लागला तरी, जीव घाबरतो, अजून आक्रसून घेतो आतल्याआत.
तशी हालचाल चालू असतेच, जिवंतपणा असतो, पण तो असतो अतिशय भौतिक, जनावराच्या पातळीवरचा. जवळून जाणारा एखादा भरकटलेला जीव हळूच पटकन कोशाबाहेर येऊन मटकावण्याचा पराक्रमी जिवंतपणा.
दोनच आदिम अवस्था, लाखो वर्षे चालत आलेल्या, दुसऱ्या लहान अशक्त जीवाला पाहून भूक लागणे किंवा मोठ्या बुलीइंग जीवाला पाहून घाबरून जाणे. या दोनच शाश्वत अवस्था, बाकी उत्क्रांती, बुद्धी वगैरे सब झूठ.. जगाचं गाडं चालू या दोन चाकांवरच.
बाकी सगळा हवेतला पसारा, सगळे रंग, सगळा नाद सगळे आकार अत्यंत मायावी, अशाश्वत, पोकळ... आणि केव्हातरी आयुष्यात एकदा तिसरी तडफड.... मैथुन. संपला कोट्यावधी जीवांचा सारांश.. आहार भय आणि मैथुन..
निसर्गाने घालून दिलेल्या तीन रेषा.. तीन मर्यादा... अब्जावधी वर्षे लागली एका पेशीपासून माणूस बनायला पण तीन रेषा अजूनही त्याच आहेत. या अब्जावधी वर्षात कोट्यावधी जमाती जन्मल्या आणि मेल्या, या तीन बिदुंच्या आजूबाजूने रंगांचे, आकारांचे आणि आवाजांचे खेळ करत.
आपण काय वेगळे आहोत? मासे रंग रचतात, किडे आवाज काढतात, प्राणी आकार फुगवतात तसेच आपण..
टीचभर आयुष्यात काहीही केलं, अगदी काहीही, एकट्याने अथवा समूहात, तरी मूळ प्रेरणा तीनच. सुटका नाही..
मारे बडेजाव कराल तत्वज्ञानाचा, कलेचा... या तीन ठसठसणार्‍या अंधार्‍या बिदुंपासून कसे सुटाल, तुमच्या आतच आहेत ते, आणि तुमचा घास घेत आहेत आणि पुढे सरकत आहेत, तुमच्याच पेशींमधून निघालेल्या पुढच्या पेशीसमुहाकडे सतत ठामपणे..
तुमचं एक व्हेइकल केलं आहे निसर्गाने, काळाच्या अनंत रेषेवर सरपटायला वापरण्यासाठी. तुम्ही मोडून पडाल, मग पुढचं व्हेइकल, मग त्या पुढचं.. मागील पानावरून पुढे चालू, अनंत वर्षे, व्हेइकलला महत्व नाहीच, काळाच्या रेषेवर पुढे सरकण्याला महत्व...
इतकं नागडं निर्घृण सत्य समजल्यावरही रंग, आकार, आवाज, गोंगाट चालूच, काळाच्या अनंत रेषेवर कोण जास्त वाजतगाजत जातो याचीच किळसवाणी मिरवणूक सतत चालू....

नाटकामागचं नाटक - २

तर असे लपलपते फ्लॅट तयार होउन मोडक्या कंबरेनं त्यांच्याकडं बघितलं की खूप्खूप समाधान वाटतं..
नाटक हळूहळू आकाराला येत असतं, मधूनच एखादा वा एखादी चिडून निघून जाणं, मग परत शोधाशोध वगैरे चालूच असतं. साऊंडट्रॅकची सीडी तयार झालेली असते, त्यावर पण संवाद चालू होतात.. हे दहापंधरा दिवस म्हणजे तालमीतलं क्रीम असतं.. नाटक जमणार की हापटणार हे खरंतर इथंच ठरतं.
इथे नाटकातलं नाट्य सापडायला लागतं..आतापर्यंत संवाद पाठ झालेले असतात, अ‍ॅक्शन, फॉर्मेशन, पॉज, पोझिशन, लूक, टायमींग, लिसनींग, पंच, लाफटर, एन्ट्र्या वगैरे भरायला लागतात, प्रत्येक नट मग तो कितीही पादरापावटा असला तरी शब्दामागचं काहीतरी शोधायला लागतो..
एरवी तालमीत दोन डायलॉगच्या मधे होणार्‍या कॉमेंट्स, गप्पा, शिव्या बंद होत जातात.. प्रयोग अंगात हळूहळू भिनत असतो.. याच काळात एके दिवशी दोनतीन गब्रू एखादा प्रसंग असा काही उठवतात की सगळा हॉल अचानक निशब्द होउन जातो..
अचानक काहितरी उत्कट सापडलेलं असतं..
दोन मिनिटं शांततेत जातात नंतर ओल्या डोळ्यांनी एकमेकांना मारलेल्या मिठ्या आणि 'भ' च्या बाराखडीतलं कौतूक यातच उरलेली रात्र जाते..आणि तालमीचा अचानक प्रयोग होउन जातो… साला बाकी कसली नशा तर केली नाही आजपर्यंत पण त्या एका रात्रीची नशा मात्र उतरता उतरत नाही..
प्रयोग हातात येत असतो.. पण बाकी काही अजून तयार नसतं.. स्पर्धा असेल तर ठीक आहे पण स्वत:चा प्रयोग असेल तर इतर सगळे सोपस्कार आलेच, प्रायोजक मिळवणे, 'वाड्यावर' जाऊन थिएटर सवलतीच्या दरात मिळण्याची व्यवस्था करणे, जाहिराती डीजाईन करणे, संपादकाला फुकट पास देऊन जाहिरात कमी खर्चात छापली जाण्याची तजवीज करणे, एकदोन पत्रकारांना जेवायला घालून, एखादी कौतुकाची बातमी छापून आणणे, नाटकाची तिकिटे डीजाईन करणे, नाटकाच्या जाहीरातीचे फ्लेक्सबोर्ड डिजाईन करणे, ते एखाद्या प्रींटरकडून स्वतः उभं राहून प्रिंट करून आणणे, ते फ्लेक्स्बोर्ड लावायला मेटलच्या फ्रेम मिळवणे.
गावातून चक्कर मारून कुठल्या चौकात जास्त पब्लिशीटी होइल याचा अदमास बांधून, त्या चौकातला आधीचा बोर्डचे बांबू काढण्यापुर्वी मांडववाल्याला गाठणे, त्यालाच शेदोनशे रुपयात पटवलं तर नवीन परात बांधायचा त्रास वाचतो, आहे त्याच बांबूच्या परातीवर आपला बोर्ड लटकवून द्यायचा, हे अर्थातच रात्री बारा वाजल्यानंतर...
मग दुसर्‍यादिवशी सकाळी दहावाजता एका भडव्याचा फोन येतो, तो नगरपालिकेतील अतीक्रमण विभागाचा म्हणे अधिकारी असतो, मग तो सक्काळसक्काळ नडतो... एरवी त्याच्या बेडरूममधे अतीक्रमण झालं तरी झोपतो निवांत साला आणी आमी कॉलेजची पोरं म्हणून माज दाखवतो होय रे..
मग आम्हीपण इरेला पेटतो, डायरेक 'वाड्यावर' जातो, नाटकाला आमंत्रण द्यायचं कारण काढून.. हा नवीन त्रास म्हाराजांच्या कानावर घातला.. की तिकडून थेट नगराध्यक्षाला वा 'शीवोसायबाला' फोन... च्यायला.. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी.. मग आम्ही त्याच्या नाकावर टीच्चून शीवोसायबाला आमंत्रणाचे दोन पास देऊन येतो..
मग परिनिरीक्षण मंडळाचं पत्र लागतं, पोलीसची परवानगी लागते.. पोलीसांचा फारसा त्रास नसतो, नाटकवाली पोरं म्हणून ते फार त्रास देत नाहीत, आमचा नेहेमीच ओळखीचा पीआय गाठला की तो सगळं काम बसल्याबसल्या करून देतो वर प्रेमानं बसवून घेउन चहा पाजतो. त्यात एखादा एस्पीसाहेब मराठी आणि हौषी निघाला तर तो दोनाचे चार पास हक्कानं मागून घेतो आणी नाटकाला बायकापोरांसकट आवर्जून येतो.
मग प्रयोगाची तारीख जवळ येत असते, तेव्हा नेमका नाटकाचा स्थानीक कॉन्ट्रॅक्टर काहितरी कुरापत काढतो, त्याला नाटक देऊन वट्ट पैसे घेउन पोरांनी मोकळं व्हावं असा त्याचा डाव.. पण आता माघार नाही.. तिकिटाची पुस्तकं छापून येतात, चार दिवस आधी एक पोरगा सकाळ संध्याकाळ 'शाहुकला'ला प्लॅन घेऊन बसवावा लागतो...
गावातल्या प्रतिष्ठीतांचे, नावजलेल्या डॉक्टरांचे, वकीलांचे, जुन्याजाणत्या माणसांचे फोन येत असतात्, आपुलकीनं पुढच्या तिकीटांची मागणी केली जाते, आम्हीही मग शब्दाचा मान ठेवून वेळात वेळ काढून कुणीतरी जाऊन तिकीटे देउन येतोच, अहो या लोकांमुळे तर गावाचं गावपण असतं, काही चुकलंमाकलं तरी कौतुकाचा, प्रेमाचा हातही फिरणार असतो.
नाटक जवळपास पुर्ण बसत आलेलं असतं, नेपथ्य तयार झालेलं असतं, कपडेपट तयार असतो, जाहिरात आलेली असते, फ्लेक्स लागलेले असतात, तिकिटे बर्‍यापैकी खपलेली असतात, पोरं दिवसरात्र जिवाला जीव देउन काबाडकष्ट करत असतात.. आणी असाच अचानक आल्यासारखा एकदम नाटकाचा दिवस उजाडतो..
क्रमशः

नाटकामागचं नाटक - १

इतरत्र एका चर्चेत नाटकाचा उल्लेख आला, आणि एक प्रतीसाद लिहायला घेतला, लिहितालिहिता वेगळा लेखच तयार होईल असं वाटलं म्हणून इथे लिहितोय
कळतं मला आपलं थोडंसं नाटकातलं.. पाहिली आहेत थोडी नाटकं.. कधी अडीअडचणीच्या प्रसंगी थोबाड रंगवून उभाही राहिलेला आहे विंगेत, तिथून धडपडत स्टेजवर, आणि तिथून परत धडपडत विंगेत...
पण नाटकाची एक धगधगती बाजू मात्र अगदी व्यवस्थीत, अगदी चटके बसतील इतक्या जवळून पाहिली.. ती म्हणजे त्या आयताकार स्टेजबाहेर, आणि दिव्यापाठीमागे अंधारात एक मोठं नाटक चालतं ते.
स्पर्धेच्या तारखेवर डोळे ठेवून असणे अथवा स्वता:च्याच ग्रूपच्या नाटयमहोत्सवाची तारीख ठरवणे, ती ठरल्यावर नेहेमीचे खंदे भिडू गोळा करणे,
प्रत्येकाचं मत घेऊन, नाटकाचा मूड, ढोबळ कास्टींग, वगैरेचा अंदाज घेउन साताठ संहीता गोळा करणे,
मित्राच्या रिकाम्या फ्लॅट्वर अथवा एखाद्या वाड्यातल्या एखाद्या खोलीत रात्रभर सगळे जमून सगळ्या संहितांच सँपल वाचन करणे. प्रत्येक संहीतेमधल्या मजबूत अथवा कमकूवत जागा यावर चर्चा करून दोनतीन संहीता फायनल करणे,
साधारण लूज कास्टींग इथेच होते, काहि भुमीका क्लेम केल्या जातात काही गळ्यात मारल्या जातात, बहुतेक वेळचा अनुभव असा की, गळ्यात मारलेलीच भुमीका सगळ्यात भाव खाऊन जाते. आणि क्लेम केलेली खड्ड्यात जाते.
संहीता निवडली की त्याचा दिग्दर्शक ठरवणे, एकदोन हुकूमी दिग्दर्शक असतातच, त्यातला एक फायनल केला की त्याला संहीता आवडत नाही, मग ती बदलावी लागते, (इथे मल्टीपल लूप टू 'संहीता ठरवणे' स्टेप). मग त्याला कास्टींग आवडत नाही, ते थोडंसं बदलावं लागतं,
या सगळ्यामधे कुणाचं लफडं कुणाशी चालू आहे, कुणाचं कुणाशी पटत नाही, मागच्या वेळेला कुणी टांग मारली होती, कोण माजला आहे, कोण त्या ह्यांचा खास आहे, वगैरे सगळं लक्षात ठीवावं लागतं,
या सगळ्या गदारोळातून एकदाची संहीता आणि कास्टींग फायनल होतं. आणि त्याचदिवशी असं लक्षात येतं की प्रयोगाला खूपच कमी दिवस राहिलेले आहेत, मग इतकं अवघड स्क्रिप्ट निवडल्याबद्दल मला दोष देण्यात येतो, मग आता तालमी तरी व्यवस्थीत करा असं मलाच सांगण्यात येतं.
मग तालमीसाठी जागेचा शोध...
एखाद्याची रिकामी खोली, एखादा रिकामा फ्लॅट, एखाद्याच्या घराचा मोठा हॉल, एखादा पडका वाडा, गुळाचं गोडावून, खाजगी मालकीचं मंदीर यापैकी एक तालमीला मिळवावं लागतं, त्या जागा मालकाच्या नाकदुर्‍या काढल्यावर एकदाचा तालमीचा नारळ फुटतो..
मग तालीम सुरू होते, त्या नाटकात जर दोनपेक्षा अधीक पात्रे असतील, एखादा ड्यान्स वगैरे असेल तर जागामालक अचानक त्याच्या म्हातारीला आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार करतो, मग पुन्हा मल्टीपल 'लूप टू जागा शोधणे'
प्रयोगाची तारीख जवळ येतच असते, जागेचा प्रश्न कसातरी सुटतो, मग तालीम वेग पकडते...
बहुतेक सगळी पात्रे ही दिवसाढवळ्या कुठेतरी कॉलेज, मामाचं किराणामालाचं दुकान, बापाचं चहाचं हॉटेल, मेडीकलचं दुकान, सराफी पेढी, कॉम्पुटरदुरुस्तीचा व्यवसाय वगैरे व्यवधानात व्यस्त असल्यामूळे तालमी नेहेमीच रात्री कराव्या लागतात.. एखादं नाटक असेल तर ठीक आहे पण नाट्यमहोत्सवात तीन नाटके करताना रात्री नऊला तालीम सुरू करून सकाळी सहाला संपवावी लागते..
नाटक आता जरा बाळसं धरू लागतं..
तेवढ्यात कुणालातरी आठवण येते, की आपण लेखकाची परवानगी नावाचा सोपस्कार अद्याप केलेलाच नाही, मग लेखकाचा फोननंबर आणी करंट पत्ता याची शोधाशोध.. तो काही मिळत नाही, मग पुस्तकातल्याच पत्त्यावर एक पत्र आणि एकशेएक रुपये मानधनाचा चेक पाठवला जातो..
तालमीत कोण कमी पडतोय, कोण जड होतोय, कोण झोपतोय, कोण कचकचीत,कोण ऐनवेळी पो घालणार यावर रोज रणकंदन आणि उखाळ्यापाखाळ्या. (या प्रसंगी मात्र माझ्या थोड्याशा हुकूमशाही स्वभावाचा आणि माजुर्डेपणाचा फायदा खूप व्हायचा..)
मग कपडेपट, साउंड, आणि नेपथ्य...
नाटकातल्या मुलींचे कपडे जमवणं आणी नाटकात काम करायला मुली जमवणं यात जास्त अवघड काय हे मला अजूनही ठरवता आलेलं नाहिये..
साउंडवाला जो निवडलेला असतो त्याला सगळ्या प्रसंगात बॅकग्राउंडला सनईच वाजवायची हुक्की येते, सनई नसेल तर बॅगपायपर.. मग कुणाचातरी कॉप्युटर पकडायचा, साउंड एडीटींग सॉफ्ट्वेअर दोन दिवसात मीच शिकायचं आणि सगळे ट्रॅक परत एडीट करायचे..
आता नेपथ्य,
दिग्दर्शक सोडून सगळ्यांच मत असतं की नेपथ्य एकदम साधं करायचं यावेळेला, पण दिग्दर्शक अडून बसतो.. त्याचं म्हणणं पडतं की नेपथ्य जबरा नसेल तर पहिला अंक पालथा पडेल आणि दुसरा अंक उठणारच नाही. नेपथ्य करायचं ठरतं... काय करता.. जमतील तेवढ्या टूव्हीलर घेऊन जत्रा हार्डवेअर च्या दुकानात... (गावाकडे नेपथ्य भाड्यानं मिळत नाही भाऊ, स्वत: खपून बनवावं लागतं..)
मग प्लायवूड, लाकूड, खिळे वगैरे खरेदी, ते घेऊन ओळखीच्या सुताराकडे.. हा एकटाच माणूस असा असतो की जो प्रोफेशनल असूनही त्याला नाटकाच्या कुठल्याही कामात मनापासून विन्ट्रेष्ट असतो.. तो मनापासून आठ बाय तीन चे फ्लॅट बनवून देतो..
ते फ्लॅट घेउन जत्रा पुन्हा कुणाच्यातरी बागेत अथवा गोडावून मधे.. अहो नुसते फ्लॅट तयार करून चालत नाहीत, ते रंगवावे लागतात.. रात्री सगळी पुर्वतयारी होते, डिस्टेंपरचे डबे, ब्रश, दारे खिडक्या रंगवायला एक त्यातल्यात्यात बरा चित्रकार जमवले जातात.. रात्री अकरा वाजता डिस्टेंपरचा डबा फुटतो आणि लक्षात येतं की थिनर आणायचा राहिला.. मग एखाद्या हार्डवेरवाल्या मगनलाल मालपाणीच्या पोराला फितवून, दुकान उघडून थिनर आणायचा..
सगळे फ्लॅट जमीनीवर आडवे टाकून कंबर मोडेपर्यंत पहिला हात मारायचा, रात्रभर पाठीचा आणि कंबरेचा भुकना पडतो.. मग दुसर्‍यादिवशी रंग वाळू द्यायचा, मग रात्री परत दुसरा हात... एवढं सगळं करून नाटकाचे फ्लॅट नावाची लपलपणारी वस्तू तयार होते..
क्रमश:

हवेतल्या गोष्टी - ३ - पिंजर्‍याचे दार उघडावे..

पावसाळ्यातील अशीच एक फ्लाईट, अगदी पहाटे पहाटे निघालो होतो. वास्तविक पहाटेची फ्लाईट म्हणजे माझी अगदी आवडती. आजूबाजूची रात्रीबेरात्री उठून विमानतळावर आलेली मंडळी, पुन्हा झोपेच्या आधीन होत असताना, मी टक्क जागा असतो.
ढगांच्या पांढऱ्या समुद्रावर जाऊन शांतपणे उगवता सूर्य पाहणं मोठं लोभसवाण असतं. अजून दिवसाच्या ट्राफिकनं रविराज कावलेले नसतात, नुकतेच क्षितिजावरुन बाहेर येत ढगांच्या मऊशार पाठीवर आपली किरणं आजमावून पहात असतात. तो सगळा सोनेरी सोहळा माझ्याही कोत्या मनात भव्यतेची, मंगलाची छाप दिवसभराकरता ठेऊन जातो.
पण आज मात्र सुर्यादेवांना सुट्टी, करड्या काळ्या ढगांचीच सत्ता आकाशात. आज दिवसभरात काही चांगलं घडूच शकणार नाही असा माहौल..
खराब हवामानाची नेहेमीची सूचना देऊन झाली आहे. मंडळींच्या चेहेऱ्यावर चिंतेच्या छटा चढू लागल्यात. विमान ढगात शिरतं. हादरु लागतं. लोकांच्या नेहेमीच्याच प्रतिक्रिया मी जरा वैतागूनच पहात राहतो.
माझ्या शेजारच्या जागेवर एक आजोबा, ते एकट्यानं प्रवास कसे करतायत ह्याचं मला आश्चर्य वाटलं होतंच. मी त्यांच्याकडे त्यांच्या नकळत निरखून पाहू लागतो. सुरकुतलेला चेहेरा. अंगात स्वेटर, हाफशर्ट. वय साधारण पासष्ठ ते सत्तरच्या आसपास. पण चेहऱ्यावर, डोळ्यात काहीतरी विलक्षण गोड भाव..
काही लोकांच्या चेहेर्यावरच एक तृप्त, समाधानी भाव कोरलेला असतो, म्हणजे बघा.. चंद्रकांत गोखले यांचा चेहेरा आठवतोय, तसा काहीसा भाव... माझ्याकडे बघून एक छानसं कुणालाही जिंकून घेणारं स्मितहास्य..
ते शांत आहेत. विमान हादरु लागल्यावर ते डोळे मिटून घेतात, पण चेहेऱ्यावर एकही जास्तीची सुरकुती उमटत नाही.. तसाच प्रसन्न, शांत चेहेरा.. माझी विचाराश्रुन्खाला नेहेमीप्रमाणे चालूच.. आत्ता या आजोबांच्या मनात काय चालू असेल...
मृत्यूची प्रकर्षानं जाणीव होत असेल का इतरांसारखी.. जर तशी जाणीव होत असेल तर नक्की काय विचार उमटत असतील.. खेद असेल कि तृप्तता... काही करायचं राहिलं याची रुखरुख असेल... की एवढं करू शकलो, एवढ्या लांब आलो याचं समाधान असेल.. आप्तांची आठवण येत असेल का... का पैलतीरावर आप्तांचीच भेट होणार म्हणून उत्सुकता असेल.. आत्तापर्यंतच्या वाटचालीचा कोलाज येत असेल का विचारांच्या पटलावर.. की कोरी पाटी असेल नवा अनुभव घ्यायला..
मी असा सामोरा जाऊ शकेन का... नाही जाणार कदाचित... का म्हणून? अजून खूप जगायचंय म्हणून..जगायचय म्हणजे नक्की काय करायचय.. जास्ती दिवस श्वास घेणं म्हणजे आयुष्य का? म्हणजे मृत्यूला सामोरं जाताना वय महत्वाचं कि वृत्ती..
आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय, जन्मल्यापासून मरेपर्यंत एखाद्या मांजराच्या पिलासाराखं पायात तडमडत रहातं ते, अडखळायला होतंच पण असतं ही लोभसवाणं..

अजून खूप जगायचंय, खूप पहायचय.. पण तरीही असंच म्हणावसं वाटतं...

आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.
कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,
दिली दुर्दैवाला पाठ; अन्‌ संकटाला छाती.
सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,
बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.
जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,
जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.
येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे
-संदीप खरे

हवेतल्या गोष्टी - २ : ती

फ्लाईट लेट किंवा रद्द होणं हां नेहेमीचा कार्यक्रम, यात मला तसं नवीन काहीच नाही. पूर्वी असं काही झालं की मी एअरलाईन स्टाफवर आरडाओरडा करून माझा राग, फ्रस्ट्रेशन काढत असे, आता तसं करावसं वाटत नाही.
पण यावेळची गोष्ट खरंच निराळी होती.
मी गेले सतत २८ दिवस घराबाहेर होतो. घरून निघालो तेव्हा अवघ्या सहा दिवसाचा प्लान होता, पण पुढे प्रवास वाढतच गेला. गेल्या अठ्ठावीस दिवसात चार शहरं आणि आठ फ्लाईट झाल्या होत्या. त्यातही गेले १० दिवस तर घराची ओढ खुपच अस्वस्थ करत होती. मला अगदी डेस्परेटली घरी जायचं होतं. एक क्षणभरही आपल्या माणसांपासून दूर रहायला नको वाटत होतं, जीव कासावीस झाला होता घरट्यात जाण्यासाठी.
खरं तर मी एवढा होमसिक वगैरे नाही, पण यावेळेला मात्र परिस्थिती वेगळी होती, मनस्थिती वेगळी होती. कधी एकदा घराची बेल वाजवतोय आणि बायकोचा हसरा चेहेरा डोळे भरून पाहतोय, असं झालं होतं. शुक्रवारी काम आटोक्यात आलं. मी रात्रीची फ्लाईट बुक करायला सांगितली. ऐनवेळेला ती फ्लाईट मिळाली नाहीच. शनिवारी पहाटे सहा वाजताच्या फ्लाईटचं तिकीट मिळालं.
रात्रभर जागाच होतो. पहाटे तीन वाजताच हॉटेलातून उठून बेंगलोर विमानतळावर पोचलो. चेकइन करून किंगफिशर लाउंजमधेही न बसता अधीरपणे बोर्डिंगगेटजवळच जाऊन बसलो. बरोब्बर साडेपाच वाजता फ्लाईट स्टेटस चेंज झालं, “scheduled” वरून नुसतंच “delayed”. हरामखोर साले. नेमकं आजच..
बोर्डिंगगेटच्या टेबलापाशी एकदम गलका झाला, लोक आपला संताप त्या चारपाच पोरापोरींवर काढू लागले. ते बिचारे सगळ्यांना समजावून सांगत होते, “तांत्रिक बिघाड आहे”, “फ्लाईट इंजिनिअरने विमान सुरक्षित घोषित केल्याशिवाय फ्लाईट सोडता येत नाही”, “तुमच्याच जीवाला धोका आहे” वगैरे वगैरे. माझ्या बुद्धीला ही सगळी तांत्रिक कारण पटत होती, पण मनाचं काय...
अनुभवानं हेही माहीत होतं की या प्रकारच्या बिघाडामुळे फ्लाईट रद्द होण्याची शक्यताच जास्त होती. काही समजत नव्हतं काय करावं ते. हताश होऊन लाउंजच्या दिशेने पाय ओढत चालू लागलो. लाउंजच्या रिसेप्शन काउंटरला बसलेल्या सगळ्या पोरी एकजात उर्मट आणि इतक्या आखडू का असतात कुणास ठाऊक. आपल्याच तोऱ्यात असतात. आपल्याला एअरलाईननं नोकरीला ठेवलंय म्हणजे, सगळ्या प्रवाशांसमोर मान ताठ करून, उर्मटपणानं हनुवट्या उडवून, नाक फेंदारून दाखवलंच पाहिजे असा दंडकच आहे जणू.
एका फटाकड्या पोरीनं मला तोऱ्यात मेंबरशीप कार्ड मागितलं, मी जरा नाखुशीनेच कार्ड आणि बोर्डिंग पास काढून दिला. तिनं अत्यंत उर्मट हसून सांगितलं, की “सर, तुम्ही आता लाउंज मधे वेळ घालवलात तर तुम्हाला बोर्डिंगला उशीर होईल”.
झालं, इतका वेळ आवरून ठेवलेला संताप बाहेर पडला, त्या दोन फटाकड्या पोरींना मी झाड झाड झाडलं. एकतर त्यांच्या सारखं खोटंखोटं तोंडदेखल हसण्याचा प्रचंड रागराग होत होता आणि त्यात त्या मला नियम समजावून सांगत होत्या. माझा आरडाओरडा ऐकून बिचाऱ्या तोंड पाडून बसल्या. एव्हाना फ्लाईट डीले झाल्याचं त्याना बहुतेक कळालं होतं.
मला प्रचंड राग आला होता. खूप असहाय्य वाटंत होतं. मला कुठल्याही परिस्थितीत पुण्याला पोहोचायचं होतं. मी माझं फ्रीक्वेंट फ्लायर कार्ड वापरून, माझ्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करायला सांगणार होतो. ते अधिकार ड्युटी मॅनेजरला असतात. मी ओरडूनंच ड्युटी मॅनेजरला घेऊन यायला सांगितलं. कारण मला परत “आमाला पावर नाय” हे ऐकायचं नव्हतं (आठवा: म्हैस). त्यातली एक सुंदरा बिळात उंदीर पळावा तशी पळाली.
दोनच मिनिटात ड्युटी म्यानेजर माझ्या समोर उभी राहिली. माझं बोलणंच खुंटलं. सुंदर, नाजूक, २६-२७ वर्षाची एक युवती लाल-काळ्या रंगाच्या पायघोळ ड्रेसमधे माझ्यासमोर उभी होती.
हसरा, उजळ चेहेरा. मोठे, काळेभोर, बोलके डोळे. केस मागे बांधलेले. हातावर हात ठेऊन उभं राहायची पद्धत, आत्मविश्वास, सगळंच त्या कचकड्याच्या दुनियेत नवखं होतं. ती हसतमुखानं आणि नम्रतेनं मला “येस सर, हाऊ मे आय हेल्प यू” विचारत होती. त्या हसण्यामधे आत्मविश्वास तर होताच, पण खिळवून ठेवणारा निरागसपणाही होता. मला अगदी ठरवूनही चिडता आलं नसतं तिची अवघडलेली अवस्था बघून...
मी तिलाच बसायला सांगितलं. ती समजून मंद हसली. मग तिला बयाजवार सांगितलं, काय झालंय ते. मला इतक्या डेस्परेटली घरी का जायचंय याचं खरं कारण मला तिला सांगावसं वाटलं, मी ते सांगितलंही. ती पुन्हा एकदा खूप मोहक, आश्वासक हसली. “येस सर, आय कॅन अंडरस्टँड, आय विल ट्राय माय बेस्ट”
तिनं संगणकावर पटापट काही काम करायला सुरुवात केली. काही क्षणातच मला सांगितलं, की पुण्याला जाणारी पुढची किंगफिशर फ्लाईट संध्याकाळी सात वाजता आहे. हे सांगताना तिचा स्वर नकळत हलका झाला होता. आवाजातली निराशा, सहानुभूती लपत नव्हती. एव्हाना माझाही राग निवळला होता. ती मला वेगवेगळे पर्याय सुचवू लागली.
वास्तविक फ्लाईट लेट झाल्यावर, तिची जबाबदारी फक्त पुढची फ्लाईट कधीची आहे हे सांगायची होती, निर्णय मलाच घ्यायचा होता. उर्मटपणानं सॉरी म्हणली असती आपल्या कामाला लागली असती तरी फार काही बिघडलं नसतं... पण ही खरंच निराळी होती... शेवटी खूप उस्तवारी करून तिनं माझ्यासाठी एक बेंगलोर-मुंबई फ्लाईट शोधून काढली. मुंबईहून त्यांची गाडी पुण्यापर्यंत अरेंज केली.
मी तिची ठामपणे होणारी हालचाल, फोनवरून सगळ्या एअरलाईन कडे चौकशी करण्याची लगबग, प्रत्येक नकारानंतरची चेहेऱ्यावरची न लपणारी निराशेची छटा, निर्णय घेण्यातली तत्परता. हे सगळं मी मोठ्या कौतुकानं पाहात होतो. माझ्या नजरेतलं कौतुक, कृतज्ञता तिनं कदाचित ओळखली असावी. पुन्हा एकदा ते मंतरलेलं हास्य फेकत ती म्हणाली “इट्स माय ड्युटी सर”.
तिनं जाताना मला हात हलवून ‘बाय’ केलं. मी शेवटी वेळेवर घरी पोचणार होतो, पण याचा आनंद मला तिच्याच बोलक्या डोळ्यांमध्ये जास्त दिसत होता.. आता खोटंखोटं हसायची पाळी माझ्यावर होती. थँक्यू म्हणायलाही माझा आवाज फुटत नव्हता. डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या.
आणि मनात मर्ढेकरांची कविता नव्याने उलगडत होती.

पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो
होता पायातही वारा
कालपरवापावेतो
आज टपोरले पोट
जैसी मोगरीची कळी
पडे कुशीतून पायी
छोटय़ा जिवाची साखळी
पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो
थांब उद्याचे माउली
तीर्थ पायांचे घेईतो

ता. क. -
सर्व प्रतिसादकांचे आणी वाचकांचे आभार..
ती मुलगी खरंच "अवघडलेली" होती.
काही प्रतिसादांवरून असं वाटतंय की हे कदाचीत सर्वांच्या लक्षात आला नाहिये.. मी केवळ ओझरता उल्लेख न करता स्पष्ट उल्लेख करायला हवा होता.

हवेतल्या गोष्टी - १

सकाळी सकाळी मस्त पांघरुणात गुरफटून झोपावं, उन्हं वर येईपर्यंत. बायकोनं मस्त चहाचा कप हातात आणून द्यावा.. पण हे काही घडत नाही. साला नोकरीच अशी आहे की घरी येऊन बॅग टेकतो न टेकतो तोच पुढचं तिकीट मेलबॉक्स मधे येऊन पडतं. खूप जीवावर येतं आपल्या माणसांना सोडून पुन्हा घराबाहेर पडायचं.
पायाला काय भिंगरी लागलीये कळत नाही. दर दोन दिवसांनी एक फ्लाईट पकडायची आणि सारखं पळत रहायचं, दमायला परवानगीच नाही. थांबता येणार नाही असं नाही, कारण माझा कुणीच पाठलाग वगैरे करत नाहीये. मीच कशाचातरी पाठलाग करतोय. कसला कुणास ठाऊक.
सहज म्हणून मोजलं तर मी गेली ६-७ वर्षं सतत प्रवास करतोय, महिन्यातून १५ ते २५ दिवस. सतत आणि अखंड भटकंती. आजवर अनेक रात्री एअरपोर्टवर आणि लाउंजमधे काढल्यात. कधी फ्लाईट लेट आहे म्हणून, कधी रद्द झाली म्हणून. कधी कनेक्टींग फ्लाईट लगेच नाहीये म्हणून. आता प्रत्येक विमानतळावरचा लाउंज हेच घर वाटायला लागलंय. पुणे, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद आणि कोलकोता ह्या विमानतळावरचा कोपरान् कोपरा पाठ झालाय. एवढंच कशाला, विमानकंपन्यांचं वेळापत्रक, कुठल्या विमानात कुठला सीटनंबर इमर्जन्सी विंडोशेजारी येतो. कुठच्या एअरलाईनचं बोर्डिंग गेट कुठलं, असला बारीकसारीक तपशीलही तोंडपाठ झालाय.
ह्या कटकटीच्या कार्यक्रमात एकमेव आसरा म्हणजे हातात एखादं जाडसं पुस्तक, आणि लाउंजमधली आरामखुर्ची. त्यातही कवितासंग्रह असेल तर क्या केहने... पुस्तक नसेल तर आयपॉडवर कुमारजी किंवा अभिषेकीबुवा. काय तंद्री लागते म्हणून सांगू.
पण कधी कधी याचाही कंटाळा येतो. मग इअरफोन नुसता कानात अडकवून ठेवायचा, आणि आजूबाजूची गम्मत पहात बसायचं. कानात इअरफोन लावून, शून्यात डोळे लावल्याचा अभिनय करत, आजूबाजूचं संभाषण ऐकायची, निरीक्षण करण्याची कला अवगत करावी लागते. तुम्ही लक्ष देताय असं वाटलं लगेच मंडळी कॉन्शस होतात.
सहज नजर फिरवली तरी असंख्य नमुने बघायला मिळतात. काळाकरडा कोट घालून इंग्रजी वृत्तपत्र वाचत बसलेले आखडू लोकं. सराईत नजरेला यांच्यातले नवखे कोण आणि मुरलेले कोण हे झटक्यात ओळखू येतं. सफारी घातलेले हातात चॉकलेटी ब्रीफकेस घेतलेले म्हातारे, इन्फोसिस, विप्रो इत्यादी कंपन्यांच्या सॅक पाठीवर टाकून ब्लॅकबेरी शी चाळा करत, हळूच इकडेतिकडे बघणारे तरुण. सोळा ते तीस वर्षे वयोगटातल्या, तंग आणि अपुरे कपडे घालून नाक फेंदारत चालणाऱ्या ललना. वय वर्षे दोन ते आठ मधली विमानातळ डोक्यावर घेणारी बच्चेकंपनी, पांढरे कपडे घातलेले आणि प्रंचंड घाईत असल्याचं दाखवणारे पुढारी, कडेवरचं मुल सांभाळत भांबावलेल्या चेहेर्‍यानं इकडेतिकडे पाहणाऱ्या लेकुरवाळ्या बायाबापे, ह्या लोकांना आपापल्यापरीने मदत करणारा लालनिळ्या कपड्यातला ग्राउंड स्टाफ, ह्या सगळ्या धांदलीकडे अत्यंत तुच्छतेने पहाणाऱ्या हवाईसुंदऱ्या, क्वचित कडक इस्त्रीचे कपडे घातलेले आपल्याच गप्पात गुंगलेले पायलट लोक. पाहावं तितकं कमीच.
सुरवातीच्या दिवसांमध्ये, ह्या हवाईसुंदऱ्या, त्यांची टापटीप, तंग कपडे, सतत सावरला जाणारा मेकप, आपल्याच तोऱ्यात चालण्याची ऐट हे पाहून एकतर असूया तरी वाटत असे किंवा राग तरी येत असे. पूर्वी मित्रांच्या बरोबर चेष्टामस्करी करताना माझा रोजचा विमानप्रवास आणि हवाईसुंदऱ्या यावरून काही कॉमेंट्सही होत असत.. पण जितकं त्यांचं काम जवळून पहात गेलो, तितका आदर वाढत गेला, आता कधीच असा वावगा उल्लेख होत नाही. उलट कधी नामोल्लेख झालाच तर आदरानेच होतो. सी.आय.एस.एफ. अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे जवान आणि अधिकारी, हे या खेळातले असेच दुर्लक्षीलेले शिलेदार.
आता इतक्या दिवसाच्या सान्निध्यानंतर हवाई सुंदऱ्या, एअरलाईन स्टाफ, सीआयएसएफ चे जवान यांच्याशी एक नातं नकळतच तयार झालंय. बरेच जण ओळखीचेही झालेत.
एवढ्या वर्षांच्या प्रवासात, एअरपोर्टवर, विमानात, लाउंजमधे, सिक्युरिटीचेकमधे, आतापर्यंत अनेक किस्से घडलेत. अनेक माणसं मनात घर करून बसलीयेत. अनेक चित्रविचित्र प्रसंग आहेत. सहप्रवाशांच्या कानगोष्टी आहेत.
अशा खूप हवेतल्या गोष्टी मनात आहेत. त्या आठवतील तशा आणि वेळ मिळेल तशा सांगणार आहेच..
सध्या इतकंच..

( पेटवी लंका हनुमंत )

कालच्या सामन्याच्या मानकर्‍यांसाठी आणि अर्थात आमच्या लाडक्या सचिनदेवासाठी हे कवन...
गदीमांचे गीतरामायणातील मूळ काव्य इथे मिळेल. काल रात्रभर नाचुन विजयाच्या उन्मादातच लिवलं गडबडीत आहे, मीटर तपासू नये. काही कडव्यांचा क्रम बदलला आहे, पण मुळ चालीवरच म्हणता येइल. (उद्या वेळ मिळाला की.. " देवहो, बघा 'माही'लीला... या घरी विश्वचषक आला" लिहायचा विचार आहे.. Lol
लीलया उडुनी वानखेडेत
पेटवी लंका हनुमंत
उडे दांडकी सेहेवागाची.
बॅट कोसळे मग 'देवा'ची
चिता भडकली जणूं चिंतेची
राक्षसी करिती आकांत
कुणी पळाले हरल्या पायी
रिमोट मग कुणी टाकून देई
कुणि भीतीनें अवाक होई
वरून तो सडका श्रीशांत.
गंभीरा पण नक्की ठावे
सवे कोहली हळूच धावे
कप्ताना कर्तव्य आठवे
अचानक आला कल्पांत
या सीमेहून, त्या सीमेवर
कंदुक पळतो, नुरे भुईवर
गंभीराचा स्ट्रोक भयंकर
चालला धावा जमवीत
उडे मलिंगा, फुटे थीसारा,
मुरली पोकळ, कुणा न थारा
रडे, ओरडे तों रणदिव
कुमारा पडला चिंतेत
सहज फोर ते असे मारती
विजेपरी तें सिक्स मागुतीं
आग वर्षवी नगरीवरती
गर्जना करती फलंदाज
आकांक्षा मग पुन्हा उसळल्या
युवराजांच्या बाहू स्फुरल्या
पवित्र मंगल घटिका भरल्या
मातृभू बुडे उत्सवात
धोनी, भज्जी, संघच सारा
“देव” मस्तकी मिरवी प्यारा
देवाच्या अन् भारतभूच्या
नशीबीचा संपे वनवास
......पेटवी लंका हनुमंत ..... पेटवी लंका हनुमंत