Sunday, December 22, 2013

हवेतल्या गोष्टी - २ : ती

फ्लाईट लेट किंवा रद्द होणं हां नेहेमीचा कार्यक्रम, यात मला तसं नवीन काहीच नाही. पूर्वी असं काही झालं की मी एअरलाईन स्टाफवर आरडाओरडा करून माझा राग, फ्रस्ट्रेशन काढत असे, आता तसं करावसं वाटत नाही.
पण यावेळची गोष्ट खरंच निराळी होती.
मी गेले सतत २८ दिवस घराबाहेर होतो. घरून निघालो तेव्हा अवघ्या सहा दिवसाचा प्लान होता, पण पुढे प्रवास वाढतच गेला. गेल्या अठ्ठावीस दिवसात चार शहरं आणि आठ फ्लाईट झाल्या होत्या. त्यातही गेले १० दिवस तर घराची ओढ खुपच अस्वस्थ करत होती. मला अगदी डेस्परेटली घरी जायचं होतं. एक क्षणभरही आपल्या माणसांपासून दूर रहायला नको वाटत होतं, जीव कासावीस झाला होता घरट्यात जाण्यासाठी.
खरं तर मी एवढा होमसिक वगैरे नाही, पण यावेळेला मात्र परिस्थिती वेगळी होती, मनस्थिती वेगळी होती. कधी एकदा घराची बेल वाजवतोय आणि बायकोचा हसरा चेहेरा डोळे भरून पाहतोय, असं झालं होतं. शुक्रवारी काम आटोक्यात आलं. मी रात्रीची फ्लाईट बुक करायला सांगितली. ऐनवेळेला ती फ्लाईट मिळाली नाहीच. शनिवारी पहाटे सहा वाजताच्या फ्लाईटचं तिकीट मिळालं.
रात्रभर जागाच होतो. पहाटे तीन वाजताच हॉटेलातून उठून बेंगलोर विमानतळावर पोचलो. चेकइन करून किंगफिशर लाउंजमधेही न बसता अधीरपणे बोर्डिंगगेटजवळच जाऊन बसलो. बरोब्बर साडेपाच वाजता फ्लाईट स्टेटस चेंज झालं, “scheduled” वरून नुसतंच “delayed”. हरामखोर साले. नेमकं आजच..
बोर्डिंगगेटच्या टेबलापाशी एकदम गलका झाला, लोक आपला संताप त्या चारपाच पोरापोरींवर काढू लागले. ते बिचारे सगळ्यांना समजावून सांगत होते, “तांत्रिक बिघाड आहे”, “फ्लाईट इंजिनिअरने विमान सुरक्षित घोषित केल्याशिवाय फ्लाईट सोडता येत नाही”, “तुमच्याच जीवाला धोका आहे” वगैरे वगैरे. माझ्या बुद्धीला ही सगळी तांत्रिक कारण पटत होती, पण मनाचं काय...
अनुभवानं हेही माहीत होतं की या प्रकारच्या बिघाडामुळे फ्लाईट रद्द होण्याची शक्यताच जास्त होती. काही समजत नव्हतं काय करावं ते. हताश होऊन लाउंजच्या दिशेने पाय ओढत चालू लागलो. लाउंजच्या रिसेप्शन काउंटरला बसलेल्या सगळ्या पोरी एकजात उर्मट आणि इतक्या आखडू का असतात कुणास ठाऊक. आपल्याच तोऱ्यात असतात. आपल्याला एअरलाईननं नोकरीला ठेवलंय म्हणजे, सगळ्या प्रवाशांसमोर मान ताठ करून, उर्मटपणानं हनुवट्या उडवून, नाक फेंदारून दाखवलंच पाहिजे असा दंडकच आहे जणू.
एका फटाकड्या पोरीनं मला तोऱ्यात मेंबरशीप कार्ड मागितलं, मी जरा नाखुशीनेच कार्ड आणि बोर्डिंग पास काढून दिला. तिनं अत्यंत उर्मट हसून सांगितलं, की “सर, तुम्ही आता लाउंज मधे वेळ घालवलात तर तुम्हाला बोर्डिंगला उशीर होईल”.
झालं, इतका वेळ आवरून ठेवलेला संताप बाहेर पडला, त्या दोन फटाकड्या पोरींना मी झाड झाड झाडलं. एकतर त्यांच्या सारखं खोटंखोटं तोंडदेखल हसण्याचा प्रचंड रागराग होत होता आणि त्यात त्या मला नियम समजावून सांगत होत्या. माझा आरडाओरडा ऐकून बिचाऱ्या तोंड पाडून बसल्या. एव्हाना फ्लाईट डीले झाल्याचं त्याना बहुतेक कळालं होतं.
मला प्रचंड राग आला होता. खूप असहाय्य वाटंत होतं. मला कुठल्याही परिस्थितीत पुण्याला पोहोचायचं होतं. मी माझं फ्रीक्वेंट फ्लायर कार्ड वापरून, माझ्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करायला सांगणार होतो. ते अधिकार ड्युटी मॅनेजरला असतात. मी ओरडूनंच ड्युटी मॅनेजरला घेऊन यायला सांगितलं. कारण मला परत “आमाला पावर नाय” हे ऐकायचं नव्हतं (आठवा: म्हैस). त्यातली एक सुंदरा बिळात उंदीर पळावा तशी पळाली.
दोनच मिनिटात ड्युटी म्यानेजर माझ्या समोर उभी राहिली. माझं बोलणंच खुंटलं. सुंदर, नाजूक, २६-२७ वर्षाची एक युवती लाल-काळ्या रंगाच्या पायघोळ ड्रेसमधे माझ्यासमोर उभी होती.
हसरा, उजळ चेहेरा. मोठे, काळेभोर, बोलके डोळे. केस मागे बांधलेले. हातावर हात ठेऊन उभं राहायची पद्धत, आत्मविश्वास, सगळंच त्या कचकड्याच्या दुनियेत नवखं होतं. ती हसतमुखानं आणि नम्रतेनं मला “येस सर, हाऊ मे आय हेल्प यू” विचारत होती. त्या हसण्यामधे आत्मविश्वास तर होताच, पण खिळवून ठेवणारा निरागसपणाही होता. मला अगदी ठरवूनही चिडता आलं नसतं तिची अवघडलेली अवस्था बघून...
मी तिलाच बसायला सांगितलं. ती समजून मंद हसली. मग तिला बयाजवार सांगितलं, काय झालंय ते. मला इतक्या डेस्परेटली घरी का जायचंय याचं खरं कारण मला तिला सांगावसं वाटलं, मी ते सांगितलंही. ती पुन्हा एकदा खूप मोहक, आश्वासक हसली. “येस सर, आय कॅन अंडरस्टँड, आय विल ट्राय माय बेस्ट”
तिनं संगणकावर पटापट काही काम करायला सुरुवात केली. काही क्षणातच मला सांगितलं, की पुण्याला जाणारी पुढची किंगफिशर फ्लाईट संध्याकाळी सात वाजता आहे. हे सांगताना तिचा स्वर नकळत हलका झाला होता. आवाजातली निराशा, सहानुभूती लपत नव्हती. एव्हाना माझाही राग निवळला होता. ती मला वेगवेगळे पर्याय सुचवू लागली.
वास्तविक फ्लाईट लेट झाल्यावर, तिची जबाबदारी फक्त पुढची फ्लाईट कधीची आहे हे सांगायची होती, निर्णय मलाच घ्यायचा होता. उर्मटपणानं सॉरी म्हणली असती आपल्या कामाला लागली असती तरी फार काही बिघडलं नसतं... पण ही खरंच निराळी होती... शेवटी खूप उस्तवारी करून तिनं माझ्यासाठी एक बेंगलोर-मुंबई फ्लाईट शोधून काढली. मुंबईहून त्यांची गाडी पुण्यापर्यंत अरेंज केली.
मी तिची ठामपणे होणारी हालचाल, फोनवरून सगळ्या एअरलाईन कडे चौकशी करण्याची लगबग, प्रत्येक नकारानंतरची चेहेऱ्यावरची न लपणारी निराशेची छटा, निर्णय घेण्यातली तत्परता. हे सगळं मी मोठ्या कौतुकानं पाहात होतो. माझ्या नजरेतलं कौतुक, कृतज्ञता तिनं कदाचित ओळखली असावी. पुन्हा एकदा ते मंतरलेलं हास्य फेकत ती म्हणाली “इट्स माय ड्युटी सर”.
तिनं जाताना मला हात हलवून ‘बाय’ केलं. मी शेवटी वेळेवर घरी पोचणार होतो, पण याचा आनंद मला तिच्याच बोलक्या डोळ्यांमध्ये जास्त दिसत होता.. आता खोटंखोटं हसायची पाळी माझ्यावर होती. थँक्यू म्हणायलाही माझा आवाज फुटत नव्हता. डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या.
आणि मनात मर्ढेकरांची कविता नव्याने उलगडत होती.

पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो
होता पायातही वारा
कालपरवापावेतो
आज टपोरले पोट
जैसी मोगरीची कळी
पडे कुशीतून पायी
छोटय़ा जिवाची साखळी
पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो
थांब उद्याचे माउली
तीर्थ पायांचे घेईतो

ता. क. -
सर्व प्रतिसादकांचे आणी वाचकांचे आभार..
ती मुलगी खरंच "अवघडलेली" होती.
काही प्रतिसादांवरून असं वाटतंय की हे कदाचीत सर्वांच्या लक्षात आला नाहिये.. मी केवळ ओझरता उल्लेख न करता स्पष्ट उल्लेख करायला हवा होता.

No comments:

Post a Comment