Sunday, August 22, 2010

फिट्टंफाट

मला तो खूप वेळा भेटलाय. आताशा संपर्क कमी झालाय हे खरं पण तरीही संबंध काही संपला नाहीये. अजून कधीतरी एखाद्या निवांत रात्री रपरपत असतो. मीच टाळतो बाहेर जायचं. सखीची झोपमोड करून त्याला भेटायला जायचं म्हणजे नको वाटतं. पण असं म्हणून, झोप येते का शांत, त्याच्या हाका चालूच असतात की. आपण तोंडावर पांघरूण ओढून झोपेचं सोंग घेऊन रहायचं.
लहानपणी नेहेमीच भेटायचा तो, आणि आतासारखं वरवरचं, तोंडदेखलं नाही, पक्का सामील असायचा मलाच. घरच्यांनी सांगितलं म्हणून छत्री घेऊन बाहेर पडायचं, पण जरा पुढे गेलं की लगेच छत्री मिटून भिजायचं. कधी आधीच संगनमत करून अचानक यायचा, मग घराकडे येताना दिसेल त्या डबक्यात पचाक्कन उडी मारून पाणी उडवायचो. नंतर कधीतरी नवीन रेनकोटाचा वास आवडायला लागला, पण तेवढ्यापुरताच, नंतर आमचीच खरी गट्टी, रेनकोट हरवायचा चारच दिवसात. पुन्हा एकदा मी त्याला भिजवायचो, तो मला.
त्याही नंतरचा तो आठवतो, मोठा झाल्यावर जरा हूडच झाला होता, कुठेतरी दरयाडोंगरात हाका मारमारून बोलवायचा. चिंब भेटायचा, भजी खायला घालायचा. ओल्या रानात गाणी म्हणत, कविता ऐकवत सोबत चालायचा. लाल चिखलात बरबटलेल्या हातानी पाठीवर थाप मारायचा. कधी तडमताशा वाजवायचा पत्र्यावर, तर कधी अलगद पागोळ्यांवरून ओघळणाऱ्या मोत्यांचे सर घेऊन यायचा भेट म्हणून.
जरासा खट्याळच होत गेला तसा नंतरनंतर, पण परकेपणा नाही जाणवला कधीच, अगदी सखीशी ओळख करून देतानाही, खूप समंजसपणे एकदाच आला होता थोडासा. मग धुक्यात हरवून गेला गुपचूप. नंतर मात्र कित्येक वेळा खऱ्या जीवलगासारखा नेमका मी तिच्याबरोबर असतानाच छापा घालायचा, पाठीवर रपकन धपाटा घालून जायचा.
आज मात्र वेगळाच भेटला, मी हा असा, इतका दूर.. एकाकी.. पोरका.. माझ्या सवंगड्यांपासून. माझ्या सखीपासून, माझ्या स्वतःपासून खुप लांब.. सतत आतून आसुसलेला..
ह्या हिरव्यागार भल्यामोठ्या कँपस मध्ये, तो रपरपत होता पूर्वीसारखाच. तोच आवाज.. त्याच हाका, तेच आर्त बोलावणे. मला आधी ओळखच पटेना. अरेच्चा हा इथे कसा. चेहरा तर ओळखीचा वाटतोय. आवाजपण नेहेमीचाच. नाही.. नाही.. पण जरा जपून रहायला पाहिजे, ह्या परक्या देशात, कुणाचा भरवसा धरावा. कुणी तोतया पण असेल...छे छे नकोच ते.. असं म्हणून मी मान वळवून कामात लक्ष घातलं.. अरे अरे.. असा आत काय येतोस.. मी नाही तुला ओळखत.. थांब थांब.. महत्वाचे कागद आहेत ते..
पुन्हा तीच रपरप.. तोच तडमताशा.. तेच चेहरयावर उडालेले दोन थेंब.. अरे खरच तो ‘तू’ आहेस... आयला.. तू.. इथे
साल्या.. मी दोन महाखंड पार करून पोटासाठी इथे आलोय.. सतत तळमळतोय कुणीतरी ओळखीचं भेटावं म्हणून.. आणि तू माझ्यासाठी इथे आलास..
काय बोलू.. काय सांगू.. कसं सांगू तू कोण आहेस आत्ता माझ्यासाठी.. आत्ता, या क्षणी मला भिजवच गड्या.. चिंब होऊ दे मला.. तू मला भिजव.. मी तुला भिजवतो.. माझ्या अश्रुंनी..

2 comments:

  1. गोष्ट मनाला चटका लावून गेली.

    छान आहे ब्लॉग.

    ReplyDelete
  2. subscription enable करा, मालक

    ReplyDelete