Monday, June 21, 2010

माझा लहानपणाचा काळ मि ज्या घरात काढला तिथे पाठिमागे एक छानस अंगण होतं. उन्हाळ्याच्या वा दिवाळीच्या सुट्टीमधे माझा बराचसा वेळ ह्या अंगणात खेळण्यातच जायचा. एक आंब्याच झाड, एक पेरूचं, एक स्वस्तिकाचं अशी झाडे होती, आता ती फार मोठी वाटत नाहीत पण त्यावेळेला ती मोठीच झाडे होती माझ्याच उंचीच्या हिशेबात, थंडीत तिथे चुल मांडुन आंघोळीचं पाणीही तापवायचो आम्ही, पण त्या चुलीबद्दल फारस आठवत नाहिये आता. माझ्या मनात ह्या अंगणाला स्थान आहे ते एका निराळ्याच गोष्टी साठी. माझा स्वभाव लहानपणी जरा बुजरा, अबोल होता, मला कसलातरी न्युनगंड असावा बहुतेक त्याकाळी, कारण मला ९वी-१०वीत जाइपर्यंत फार जवळच्या मित्र-मैत्रिणी नव्हत्या. आमच्या गल्लीत मुले दुपारी एकत्र जमुन क्रिकेट वगैरे खेळायची पण मला फारसं यायचच नाही, म्हणुन मी जायचो नाही तिकडे.
काय असेल ते असो मला अश्या कित्येक दुपारी एकट्यानेच, स्वतःशीच रमवलेल्या आठवतात ते ह्या अंगणात. आमच्या अंगणात वेगवेगळ्या दिवसात असंख्य प्रकारचे किडे असायचे. मी इतक्या एकाग्रतेनं त्यांचं निरीक्षण करण्यात रमुन जायचा, की मला घरातुन हाक मारलेलही कळायच नाही कित्येकदा, त्यात दुपारी ११ ते ४-४:३० हा वेळ म्हणजे खुप मस्त असायचा, जेवण, झाकपाक होउन शक्यतो सगळी मंडळी निवांत असायची, कुण्णाकुण्णाला माझी आठवण यायची नाही, उलट यावेळेत दंगा न केल्याबद्दल कृतज्ञताच वाटत असेल कदाचीत. आणि मग मी त्या माझ्या बालमती गुंग करणार्‍या छोट्या जगात हरवुन जायचो.
सर्वात जास्त आठवतात ती 'सुरवंट'. हिवाळ्यात पेरुच्या झाडावर सुरवंट फार, कधी कधी आंब्यावर पण असतात. बोट- अर्ध बोट आकाराची काळी, करड्या, भुर्‍या रंगाची सुरवंट हा एक मजेशीर प्रकार असतो. त्यांची चाल लयदार, एखाद्या अळीसारखी, पण त्याच्या अंगावरच्या दाट केसांमुळे ती गतीमान लय बघत रहावीशी वाटते. चौथी पाचवीत असताना ही सुरवंट आम्ही पाळायचो पण, म्हणजे पुर्वी जुन्या त्या 'होम' की काहीतरी नावाच्या मोठ्या काडेपेट्या यायच्या, त्याच्यामधे पेरुची, आघाड्याची वा झेंडुची पानं भरुन त्यात सुरवंट पकडुन ठेवायचो, सतत पाने घालत रहायला लागायचं, काही दिवसानी सुरवंट स्वत:भोवती कोष तयार करुन घेतं, मग ती काडेपेटी त्या कोषासकट बाहेर ठेवायची एखाद्या दगडावर, आणि त्यातुन फुलपाखरु बाहेर यायची वाट बघायची. कधीच दिसलं नाही माझ्या डोळ्यासमोर फुलपाखरू बाहेर येताना, मग खुप हिरमुसला व्हायचो मी, पण नेहेमी मोकळे कोष मात्र दिसायचे. सुरवंट घरात आणलं की खुप शिव्या खाव्या लागायच्या पण कसतरी लपवुन मी ती काडेपेटी आणायचोच घरात. ह्यात कष्ट काहीच पडायचे नाहीत अस नाहीये बरका. सुरवंट जराजरी लागले हाताला वा कुठेही त्वचेला कि प्रचंड खाजायचं, जरा बारकाइनं पाहिलं तर कोवळ्या त्वचेत रुतून बसलेले केसही दिसतात, खुप आग होते. ह्यावर उपाय असायचाच, जिथे सुरवंट लागलय त्या त्वचेवर जाड घोंगड्याने घासल्यावर ते केस निघुन जायचे आणि आग कमी व्हायची, आणखी एक हमखास उपाय म्हणजे झेंडुची पाने कुस्करुन लावणे, थंड वाटायचे एकदम.
तिथल्या तुतूच्या झाडावर गोल रंगीबेरंगी चकचकीत किडे दिसायचे, त्यावेळेला आम्हाला बीट्ल नाव माहीती नव्हतं आम्ही टॅक्सीकिडे म्हणायचो त्याला.
गवळण कीडा कधीमधीच दिसायचा, मात्र पानगळीच्या दिवसात काडीकीडा मात्र नेहेमी बघितलाय. वाळलेल्या पानात तो कीडा पायाखाली येउ नयी म्हणुन वाकुन चालायचो, शोधत शोधत.
पावसाच्या दिवसात तर ते सगळे नवं जग बघताना भानच रहायचं नाही, असंख्य प्रकारचे बेडुक ओरडायचे. एखादा बेडुक उडी मारुन कुठे जातोय त्याचा नजरेने पाठलाग करायचा, मग एखादा दुसराच बेडुक दिसायचा क्षणभर, आणि पहिला हरवुन जायचा. पावसाळ्यात आमच्या घराच्या मागच्या दाराला आम्ही एक लाकडी फळी बसवायचो आडवी, बेडुक येउ नयेत म्हणुन, पण तरी एखादा घरात शिरलाच तर त्याला झाडु घेउन बाहेर हाकलायची मोठ्ठी जबाबदारी माझ्यावरच. आत्तासुधा हे लीहीत असताना त्यांचा तो खर्जातला गलका माझ्या कानात तस्साच आहे. ते डराव डराव चं समुहगीत ऐकून आता किती वर्ष झाली कुणास ठाउक.
ह्याच दिवसात यायच्या त्या गोगलगायी. चालताना पायाखाली एखादीजरी गोगलगाय आली तरी प्रचंड किळस यायची, त्यात दोन प्रकार आठवतात, एक शंखाची गोगलगाय आणि एक बिनशंखाची. शंखाची गोगलगाय खुप शांत, कागदावर घेउन आम्ही बाहेर सोडुन यायचो, कध्धीच त्रास नाही द्यायचो, पण बिनशंखाची गोगलगाय खुप किळसवाणी, बोटभर लांब, दोन्ही टोकाला निमुळती, आपल्याच स्त्रावाची बारीक रेघ बनवत त्यावरुन सरकत येणारी ती वस्तु बघितली कि आम्ही डोळे मिटुन, एका जाड पुठ्ठ्यावर घेउन ती लांब बाहेर फेकायचो.
पहिल्या पावसाच्या आधी आठवडाभर अचानक एका संध्याकाळी 'चाचड' दिसायला लागायचे, म्हणजे इकडे पंखाच्या मुंग्या म्हणतात ते. अचानक यायचे कुठुनतरी खुप संख्येने, हे दिसायला लागले की आम्ही ओळखायचो की आठवड्याभरात पहिला पाउस नक्की. संध्याकाळी सगळे दिवे बंद करुन बसावं लागायचं. बरोबर प्रकाशाकडे आकर्षीत होतात हे कीडे. कधीकधी एक कागद तेलात बुडवुन ट्युबला दोर्‍याने बांधुन ठेवायचो चाचड येउ नयेत म्ह्यणुन. कमी यायचे त्यामुळे, पण यायचेच. रस्त्यावरच्या दिव्यांभोवती तर हजारोंच्या संख्येने असायचे.
आमचं घर कडीपाटाचं, त्यामुळे पाली पण असायच्या भरपुर, सारख्या चुकचुकायच्या संध्याकाळच्या वेळेला, रात्री अंधुक प्रकाशाची डोळ्याला सवय झाल्यावर एखाद्या पालीची किडे पकडण्यासाठीची शांत तपश्चर्या बघताबघताच झोप लागायची.
मुंगळे जमात खुप मजेशीर, सारखे आपले गडबडीत, तुरुतुरु कुठल्यातरी मोहीमेवर, चावल्यावर खुप झणझणायचं. पण ह्याचे निरिक्षण घरापेक्षा अंगणात करायला मजा यायची. समोर आलेल्या काट्याकुट्यातुन, दगडातुन मार्ग काढुन स्वारी धावतेय पुढे. यांच दिशेच भान खुप आश्चर्यकारक असतं, तुम्ही बोटाने कीतीही लांब उडवा, दोनतीन मीनिटात पुन्हा आहे त्या ठिकाणी येउन प्रवास चालु.
मुंग्यांमधे लाल मुंग्यांची फार भीती वाटायची, कधी चुकुन पाय पडला तर मी खुप जोरात थयथयाट करायचो जागच्याजागी. पण काळ्या मुंग्यांच्या वाटेला मात्र कधीच गेलो नाही, का कुणास ठाउक, खुप आदर वाटायचा ह्या काळ्या मुंग्यांच्याविषयी, ह्यांना धावर्‍या मुंग्या का म्हणतात ते बघितल्याशिवाय लक्षात नाही यायचे तुमच्या.
माती उकरताना कधीतरी गांडुळ दीसायचं पण लगेच वळवळत मातीच्या ढिगात नाहिसं व्हायचं.
आमच्या गावाला खिंडीतल्या गणपतीला जाताना, पावसाळ्यात 'पैसा' दिसायचा, शेकडो पाय असलेला, तपकीरी लाल रंगाचा हा किडा, काडिने थोडा स्पर्ष केला तर लगेच ते शेकडो पाय पोटाशी आवळुन घेउन, अंगाचा अगदी बंद्या रूपायासारखा गोल करुन, घरंगळत जायचा. ह्याच गणपतीच्या बाहेत प्राजक्ताचा थोरला पार होता, रातराणी, चाफाही होता. ह्या पारावर रात्री आठच्या सुमाराला, खुप काजवे जमा व्हायचे, सतत हवेत उडत असायचे. त्या काळ्या कातळावरुन शांतपणे चालत जाणारा, एका लयीत लुकलुकणारा काजवा परत कधी तसा दिसला नाही.
खुप काही मिळवुन दिलय ह्या सगळ्यांनी मला, शब्दांत नाही सांगता येणार सगळं. अगदी एकटं एकटं वाटायचं तेव्हा हि सगळी मंडळी माझ्या आयुष्यात आली, आणि नकळत माझ्या बालपणाचा भागच बनुन गेली. अजुन भरुन येतय ते सगळे हरवलेले क्षण आठवुन.
आपण मोठे होतो म्हणजे नक्की काय होतो? निबरपणा म्हणजे मोठेपणा का हो?
आत्ता ह्याक्षणी मी परत त्याच ठिकाणी गेलो तर दिसतील का हे सगळे मला, का माझीच नजर बदललीये.

No comments:

Post a Comment