शेवटचे २ दिवस सगळ्यांच्याकडुन जेवणाची आमंत्रणे येत होती, पण मी कुठेच जाउ नाही शकलो. काही स्थानीक पक्वान्नं मात्र खायला मिळाली
आतापर्यंत माझ्या हॉटेलवाल्याकडुन हवा तो पदार्थ करुन घ्यायची युक्ती माहीत झाली होती, त्याला 'वीजाय' अशी हाक मारली कि तो काय वाट्टेल ते करुन द्यायचा. (अमिताभचे नाव कुठल्यातरी चित्रपटात विजय होतं म्हणे
पर्शियन संगीत ह्याविषयी बरेच काही लिहिले जाऊ शकते, पण दुर्दैवाने मी तितका जाणकार नाही, हे संगीत क्षणार्धात आपल्याला वेगळ्याच जगात घेउन जाते, ते संथ पण कमालीचे स्फुर्तीप्रद सुर ऐकुन मला क्षणभर कुमारजींची निर्गुणी भजने आठवली. एका रेस्त्राँमधे बसलो असताना, वाढदिवसाला वाजवायची पारंपारीक ईराणी धुन ऐकली, पियानोवर बसलेला पांढरर्या केसाचा बाबा असे काही सुर आळवत तल्लीन झाला होता की मी कितीतरी वेळ चक्कचक्क पुढ्यातले ताट विसरुन डोळे मिटुन बसलो होतो. (मला समोरचे जेवण विसरायला लावणारे संगीत स्वर्गीयच असले पाहिजे) या 'तावलोदेत मोबारक' गाण्याचे अगदी यथार्थ वर्णन पर्शियन लोक करतात "मोस्ट ब्युटीफुल बर्थडे साँग ऑन धिस अर्थ" ईकडे ऐका हवेतर आणी स्व्रतःच ठरवा.
आताशा त्या पारंपारीक संगीतामधे काही नवीन प्रवाह येउन मिसळतायत, पण मूळ लहेजा आणि डौल कायम आहे. त्यांच्या जुन्या संगीतकारापैकी एक "अनोशिर्वान रोहानी" ह्यांच्या काही रचना अप्रतीमच आहेत (त्यांचेही 'तावलोदेत मोबारक' ऐकुन बघा याडच लागेल). गेल्या निवडणुकीनंतर झालेल्या आंदोलनात काही लोकप्रिय संगीतकार, गायकांनी खास गाणी रचून, गाउन ते आंदोलन आपल्यापरीने पेटते ठेवले होते. मला सतत सकाळसंध्याकाळ गाडीमधे नवनव्या पर्शियन रचना ऐकण्याची मेजवानी मिळत होती.
पर्शियातला मुक्काम संपत आला होता, मी ह्या सुंदर देशातली प्रत्येक गोष्ट मनात साठऊन घेत होतो, पाय खरच निघत नव्हता, आपला मुक्कम अजुन काही दिवस असायला हवा होता असं सारखे वाटत होते, जाउद्या.. कुणाच उष्ट, कुठे, आणि किती दिवस सांडावे ह्याची काहीतरी नियतीयोजनाच असावी. (अशावेळी गदिमांच्या कडे उधारउसनवार नाही करणार तर कुणाकडे.. दोन ओंडक्यांची होते अकस्मात भेट.. एक लाट तोडी दोघा.. पुन्हा नाही गाठ) शेवटी सामान व मन आवरुन विमानतळावर येउन थांबलो.
परतीच्या प्रवासात ईराण एअरचे विमान होते. बसल्यानंतर काही वेळातच त्या विमानाने मला जमिनीवर आणले.
त्या प्रवासात काही भैय्ये (राजसाहेबांच्या ठसक्यात म्हणुन पहा बरं)पण होते, त्यांच्या बायका नखशिखांत ईराणी पोशाखात होत्या (अर्थात विमान मुंबईत उतरेपर्यंतच, हे लेकाचे बाकी सगळ्या देशात जाउन तिकडचे निर्बंध गपचुप पाळतात, ईकडे आले की दात येतात साल्याना.)
असो.. तर असा हा माझा पर्शियन अनुभव, तोडक्यामोडक्या शब्दात जसा जमेल तसा लिहीला आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे. (उम्मीद पे दुनिया कायम है )
आवडला तर नक्की कळवा. (म्हणजे त्या बालवॉशींग्टनच्या कुर्हाडीसारखी दिसेल त्या विषयावर लेखणी चालवायला हुरुप येइल.)
No comments:
Post a Comment