एक झुंज वार्याशी हे पुलंच एक तुलनेन कमी लोकप्रिय नाटक, मी हे माझ्या महाविद्यालयीन आयुष्यातच वाचले, खरं सांगायचे तर तेव्हा झेपले नाही पण आपण काहीतरी अलौकीक वाचतोय याचा पुसटसा अंदाज नक्कीच आला. त्यानंतर अनेकवेळा हे नाटक वाचत गेलो आणि प्रत्येक वेळेला नविन, वेगळं उलगडत गेल.
हे खरंतर एक रुपांतरीत नाटक आहे, इथे रुपांतरीत हाच शब्द योग्य आहे कारण पुलं कधीही भाषांतर करीत नाहीत, केवळ भाषा वा लिपी न बदलता नाटकाची घटना, संघर्ष, पात्रे ईतकी बेमालुम उतरवतात की अगदी मुळ नाटक माहीत असेल तरी कुणाला शंकाही येउ नये कि ह्या कलाकृतीचा आत्मा अस्सल देशी नाहिये अशी, (अगदी हेच 'पिग्मॅलियन' संदर्भातही खरे आहे). 'झुंज'चा मुळ आधार म्हणजे "डोझोर्त्सेव' यांची 'द लास्ट अपॉइंट्मेंट' ही रशियन कलाकृती.
ह्या नाटकाला वरवर पाहता तसा काही खास विषयच नाहीये, पण ह्यातल्या संघर्षाची जातकुळीच वेगळी आहे. इथे पात्रे चारच, रंगमंचावर त्यांचे येणेजाणेही फारसे नाहीच, त्यामुळे पारंपारीक नाट्यगुणांचा तसा अभावच, पण दिलिप प्रभावळकर, सयाजी, सारखे कलाकार आणि वामन केंद्रेंसारखे दिग्दर्शकामुळेच हे नाटक पेलले गेले
एक सामान्य माणुस एका आरोग्यमंत्र्याच्या खोलीत शिरुन राजिनामा मागतो, स्वत:वर झालेल्या अन्यायासाठी नाही तर दुसर्या कुणावर तरी झालेल्या अन्यायासाठी आणि तोही सगळ्या पुराव्यांनीशी, या घटनेतच इतके नाट्य आहे की इतर कुणाच्या लेखणीतुन उतरताना ते मुळचे नाट्य कदाचीत झाकोळुन गेल असते पण, भाईंच्या लेखणीतुन तर ते पानोपानी फुलतच जाताना दिसते
हा अफाट लाव्हासंघर्ष ईतक्या संयतपणे पानापानातुन वाहताना पाहुन मी कित्येकवेळेला शहारुन गेलो आहे, अजुनही जातो.
'झुंज' चा घटनाकाळही २ तास आणि ह्या नाटकाचा कालावधीही २ तास पण दोन तास आपण इतक्या वेगवेगळ्या भुमीकांतुन फिरुन येतो, की मला वैयक्तिकरीत्या तरी हे नाटक वाचल्यानंतर खुप वैचारीक थकवा येतो.
एका प्रवेशात एक पात्र बोलत असताना आपल्याला त्याचे म्हणणे अगदी पुर्ण पटते, आपण अगदी नकळत मान डोलावतो, पण पुढच्याच क्षणी, दुसरे पात्र विचातशृंखला ऐकवतं आणि आपल्या काळजात चर्रर्र होते कि क्षणभरापुर्वी आपण किती राक्षसी विचार करत होतो हे जाणवुन, आणि हा विचारलंबक चालुच राहातो सतत, पडदा पडेपर्यंत.
वाचकालाच त्या नाटकातली चार पात्रे नकळतपणे करुन सोडणे, त्या व्यक्तीरेखेचा विचार जगायला लावणे, हेच मला वाटते ह्या नाटकाचं सर्वात मोठे बलस्थान,
हे नाटक मला झेपेल तेवढे उलगडुन दाखवायचा एक क्षीण प्रयत्न करणार आहे, वर्ण्यविषय एवढा अफाट आहे की क्रमश: ची मदत घावी लागणारच.
क्रमशः
No comments:
Post a Comment