Sunday, December 22, 2013

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ९ - अंतीम.

काल सुट्टी होती. स्थानीक साथीदारांच्या मदतीनं भोजनशोध मोहिमेवर बाहेर पडलो. थोडी जुजबी माहिती जमा झाल्यावर टेंपल स्ट्रीट या रस्त्यावर येउन पोचलो. इथं पोहोचेपर्यंत काही ह्या नावातली खोच लक्षात आली नाही. शहराचं नाव दारेसलाम. बहुतांश लोकवस्ती मुस्लीम, उरलेली ख्रिश्चन अशा शहरात अगदी मध्यावर, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी हा टेंपल स्ट्रीट आहे. रस्त्याच्या दुतर्फा अत्यंत सुंदर हिंदु देवदेवतांची मंदिरे. अगदी सुंदर प्रशस्त देवळं. कृष्ण, राम, शंकर, कालिमाता, हनुमान अगदी सगळ्या देवांनी अगदी ऐसपैस बस्तान बसवलंय. एकेक मंदेर म्हणजे एखाद्या तिर्थक्षेत्री असतं तेवढं सुबक नी प्रशस्त. प्रत्येक देवळात एक मोठा हॉल, प्रवचनासाठी. कृष्णाच्या देवळात चाललेलं एक गुजराती भाषेतलं लडिवाळ प्रवचनही ऐकल अर्धातास बसुन. कुठे पिंपळाचा मोठा पार, चिवचिवणार्‍या चिमण्या तर कुठे पांढर्‍या धाग्यांनी गुंडाळुन अदृष्य केलेला वडाचा बुंधा.
त्या रस्त्यावरुन जाणार्‍या तीनपैकी एक चेहेरा भारतीय. भारतीय लोक इथं इतकं वजन राखुन असतील याची कलपनाच नव्हती. देवळात बसल्यावर वाटुच नये आपण आपल्या देशापासुन हजारो मैल दूर येउन बसलोय. बजुलाच एक चक्क शुद्ध शाकाहारी हॉटेल आणि शेजारी अर्थातच एक मिठाइचं ऐसपैस दुकान. काचेच्या काउंटरमागे ढोकळा, फरसाण, फापडा,रसगुल्ला, जिलबी, गुलाबजाम वगैरे थाट आणि काउंटरला त्या दुग्धजन्य मिठाइचाच एक अविभाज्य भाग वाटणारा एक गोड गुज्जुभाय.
आजचं जेवण तर जोरकस झालं.. मस्त गरमगरम फुलके, बटाट्याची भाजी, वालाची उसळ, रसगुल्ला, दाल, भजी हे सगळं पचवायला दोन मोठे ग्लास मसाला ताक. आणि नंतर मुखशुद्धी म्हणुन चवीपुरता उगाच दोन-तीन प्लेट ढोकळा.. आहाहा क्या केहेने..
गुज्जु समाजाचं वर्चस्व इथे खुपच आहे, त्या बाजारपेठेतल्या काही प्रकारच्या व्यापाराचे अनभिषीक्त सम्राटच जणु. त्या रस्त्यावर इलेक्ट्रॉनीक वस्तंपासुन कापड दुकानापर्यंत सगळी दुकानं होती सगळ्याचे मालक गुज्जु. (मला बँकॉकच्या नाना स्ट्रीट ची आठवण झाली, त्या रस्त्यावर दुतर्फा शेकडो दुकानं टेलरची आणि सगळ्याचे मालक सरदारजी.) ह्या सगळ्या दुकानात कामगार स्थानीक आहेत आणि आमचे गुज्जुभाय आपल्या अस्खलीत स्वाहीली भाषेतुन सगळा कारभार चालवतात.
भाषा ऐकायला मस्त वाटते. अगदी आपल्या बंगालीसारखी मधुर नसली तरी प्रत्येक शब्दाचा शेवट स्वरानं होत असल्यामुळे प्र्त्येक शब्द हेल काढुनच उच्चारावा लागतो. ह्या स्वाहीली भाशेत व्यंजनानं शेवट होणारा शब्द ऐकु आला तर तो इंग्रजी किंवा इतर कुठल्यातरी परक्या भाषेतला आहे असं बेलाशक समजा. इतके दिवस ती भाषा कानावर पडुन सुधा माझं स्वाहीली भाषेचं ज्ञान काही मोजक्या शब्दांपलिकडे गेलं नाही म्हणा.
दुका म्हणजे दुकान. दवा म्हणजे औषध्. असांते म्हणजे धन्यवाद. खरीबू म्हणजे स्वागत. सींबा म्हणजे सींह, थिंबा म्हणजे हत्ती. साफ म्हणजे स्वच्छ. माझी म्हणजे पाणी. माझिवा म्हणजे दुध. 'चाय माझिवा' मागवायचा नाहितर काळा काढा प्यावा लागतो. मी आमच्या कॅटीनमधे एकदा त्या पोरीला कॉफी मागितली. माझ्याकडे बघुन ती हसतंच सुटली. मी बावरलो. माझी यथेच्छ कीव करुन आणि हसून झाल्यावर तिनं सांगितलं की कहाव्हॉ म्हणजे कॉफी.. आणि काफी म्हणजे कानफाटात.. मी चक्क तीला एक कानफाटात मागितली होती.. माझं स्वाहीलीचं ज्ञान एवढ्यावरच आटोपतं.
इथं एके ठिकाणी स्थानीक नृत्य बघायला मिळालं जास्त वर्णन करत बसत नाही पण पन्नास एक स्त्रीपुरुष हातात हात घालुन रिंगण करून पाय आपटंत आपापला पार्श्वभाग एका ठेक्यात हादरवण्याची ती कसरत करताना पाहिले की काहीतरी वेगळीच शंका येते ब्वॉ. साधरणतः आपल्याकडे अडीअडचणीच्या वेळी शौचालय रिकामे नसल्यास पोट आत घेउन स्वतःचं वजन उजव्या डाव्या टाचेवर करत पाच मिनीटाचा 'ग्रेस टाइम' मिळवण्यासाठी जे पदलालित्य केलं जातं त्याच्या बराचसा जवळपास जाणारा हा नाचाचा प्रकार आहे.
हाच नृत्यप्रकार सगळ्या स्थानीक कार्यक्रामांतुन केला जातो. अगदी आबालवृद्ध आनंदाने तो नाच करतात. बाकी तो नाच कसाही असुदेत पण असा सगळा समुदाय हसत गात हातात हात घालुन त्या तालावर धुंद होउन नाचताना पाहिला की त्या उत्स्फुर्त प्रसन्नतेची लागण आपल्यालाही झाल्याशिवाय रहात नाही.
हेच नृत्य निवडणुकीच्या प्रचारातही केलं जात असावं बहुतेक. आत्ताच्या सत्ताधारी राष्ट्राध्यक्षाचा गर्द हिरवा फोटो घेउन एक माणुस असाच नाचताना एका चौकात बघितल्याचं आठवतंय. जिकडेतिकडे त्याचे त्या एकाच हिरव्यागर्द शर्टातले फोटो बघुन हा हिरवा पोपट रस्तोरस्ती अजुन किती दिवस बघणं यांच्या नशिबी आहे असा एक विचार उगाचंच मनात येउन गेला. हा राष्ट्राध्यक्ष गेली दहा वर्षे सत्तेवर आहे. त्याचे हिरव्याकंच रंगाचे फोटो मोठमोठ्या बॅनर वर लावलेले दिसतात. संसदेत सगळे आपापल्या पक्षाच्या रंगाचा शर्ट घालुन येतात. आपले सगळे थोर्थोर नेते असे रंगीबेरंगी शर्ट घालुन लोकसभेत दंगा करतानाचं चित्र मनःचक्षुंपुढे उभं राहिलं आणि हसायलाच आलं एकदम.
देशाच्या बाकी परीस्थितीविषयी बोलायचं तर गरिबी भरपूर. देशात कुठंही नविन गाडी विकत मिळंत नाही, सगळ्या जपानी गाड्या सेकंडहँड आयात होतात इथे. सार्वजनीक वाहतुकीसाठी रिक्षांचा वापर सर्रास होतो, आपल्या बजाजच्या रिक्षांचा. वेगवेगळे रोग आहेत, महागाई आहे. गेला महिनाभर ह्या युनिवर्सीटीमधे एड्सविरोधी जनजागरण मोहीम चालू होती. गुन्हेगारी आहे. बेकारी आहे. पाण्याचा प्रश्न आहे. शहरीकरणाचा प्रश्न आहे. रस्ते रोज तीनचार तास तरी ट्रॅफीक जॅम मुळे बंद असतात. पण तरी लोक मजेत आहेत. हसताना दिसतात. मोठं मजेशीर समाजमन आहे हे. इथल्या कुठल्याही समस्येविषयी तुम्ही लोकांशी बोलायला गेलात तर इकंदरीत प्रतिक्रिया ऐकुन तुमच्या लक्षात येइल की आपण आफ्रिकन स्थितप्रज्ञ संतांच्या मेळाव्यात येउन पोहोचलेलो आहोत.
चला इथले दिवस संपत आलेत, गेले २५-३० दिवस इथलं जग पहात होतो. नविन माणसांना भेटत होतो. पण खरंच हे जग वेगळ होतं का?..का मला ते भासलं वेगळं?.. नविन ठिकाणे नक्की काय बदलतं तेच कळत नाहिये... केवळ जागा बदलते म्हणजे मी बदलतो का? राग, आनंद दु:ख घरी असताना जितक्या वेळेला वाटतं तितक्याच वेळेला इथंही वाटलंच की... एकटेपणाचे चार क्षण जास्त आले असतील कदाचित पण तसा तो एकटेपणा माझ्या बरोबरच चालतोय की लहानपणापासुन.
या देशात जे काही पाहिलं ते 'माझ्या' नजरेतुन ना.. माझ्याच चष्म्यातुन... मग हे प्रवासवर्णन नाहीच की.. हे तर माझ्या त्यावेळच्या दृष्टीकोनाचं वर्णन.. अथवा माझ्या त्या क्षणांच्या अंतरंगाचं प्रतिबिंब म्हणा ना... म्हणजे खरी अफ्रिका आपल्याला दिसलीच नाही की काय... की 'खरी अफ्रिका', 'खरा भारत' असं नसतंच मुळी काही... आपलं अंतरंग जेवढं सजग, समृद्ध, तेवढंच बाहेरचं जगही रंगीबेरंगी..
असो.. इथला मुक्काम संपताना जितका आनंद साचलाय मनाच्या गाभार्‍यात.. घरी जायचं, आप्तांना भेटायचं, मातृभूला भेटायचं म्हणुन.. तसा एक हळवा कोपराही आहेच की इथल्या आठवणींसाठी... आयुष्यातले २५-३० दिवस इथं काढले, थोडासा तरी उरणारंच की मी इथं...
आणि २५-३० दिवस म्हणजे काही कॅलेंडरवरचे ३० चौकोन नव्हेत, मोजता येणारे.. रोजची नवी पहाट, संपुर्ण जगलेला दिवस आणि स्मरणात रमलेली रात्र म्हणजे तो एक चौकोन... त्या कॅलेंडरवर जरी सुट्टीचे चौकोन लाल आणि बाकिचे काळे रंगवले तरी वास्तवात कोणता लाल आणि कोणता काळा हे आधी थोडंच सांगता येतं.. कधि उत्तुंग निळा.. कधी धुक्यातला पांढरा.. कधी अश्रुंचा काळा.. कधी लाजलेला गुलाबी.. असं सुंदर कॅलेंडर प्रत्येक क्षणी जगतच असतो आपण...
.
.
.
नमस्कार मंडळी,
जरा जास्तच लांबलेल्या लेखमालिकेतील हा शेवटचा लेख.
आपण माझं अर्धकच्चं लेखन वाचलंत. आणि वर मोठ्या मनानं प्रतिक्रियाही दिल्यात याबद्दल धन्यवाद.
अर्थात तुम्हाला लेखन आवडलं याचं खरं श्रेय त्या वर्ण्यविषयाला, त्या वास्तवाला, तिथल्या माणसांना. ते वास्तव इतकं मोहक होतं, इतकं सच्चं होतं की माझ्यासारख्याच्या लेखनाचीही तुम्ही प्रशंसाच केलीत. माझा सहभाग एवढाच की मी ते सगळं माझ्या तोकड्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवलं.
धन्यवाद.

No comments:

Post a Comment