Sunday, December 22, 2013

धिस टाईम फॉर आफ्रिका. - भाग ७

मी सफारीला जाण्याच्या आधीची गोष्ट आहे ही, ह्यावर वेगळा लेख लिहायचा विचार होता म्हणून थोडा उशीरा लिहितोय. इथे आल्यावर माझ्या राहाण्याची काय सोय झाली ते दुसर्‍या भागात सांगीतलंच आहे. नंतर थोडी खटपट करून युनिवर्सिटी पासुन काही अंतरावर माझा मीच शोध घेउन एक राहाण्याची जागा मिळवता झालो.
इथल्या मुख्य फाटकातून आत शिरल्यावर आपण कुठल्या देशात आहोत याचाच विसर पडतो. पन्नास टुमदार बैठ्या बंगल्यांची ही वसाहत. मुख्य मार्गाला आखुन दिलेले मोठे बांधीव रस्ते. प्रत्येक घराला स्वतंत्र हिरवळीनं माखलेलं मैदान. स्वच्छ. मोठं. चांगल निगा राखलेलं आवार, प्रशस्त खोल्या, सर्व अत्याधुनीक सोयीसुविधा, उंची फर्नीचर. स्वतंत्र पोहण्याचा तलाव आणि खेळाचं मैदान वसाहतीसाठी. अगदी वेगळ्या जनरेटरने केलेला विजपुरवठाही.. भारताच्या सर्वसामान्य घरांच्या रचनेच्या हिशोबाने अगदी 'लॅव्हीश' म्हणता येइल अशा प्रकारचा थाट आहे एकंदरीत.
उंच भितींनी आणि लोखंडी फाटकांनी आजुबाजुच्या गरीब जगापासुन जाणिवपुर्वक तोडलेली ही वसाहत, जणु एखाद्या उच्चभ्रू महागड्या सोसायटीचा युरोपातून अलगद उचलुन आणलेला तुकडाच. बाहेरच्या जगाशी फटकुन वागणार्‍या कॉलनीची सगळी वैशीष्ठ्य अगदी प्रथमदर्शनीच दिसुन येतात. बहुतेक सगळे रहिवासी युरोपियन किंवा अमेरिकन. स्थानीक अफ्रिकन माणुस, केवळ गेटवर, रखवालदार म्हणुन.
इथे रहायला येउन एकदोनच दिवस झाले होते. त्या मॅनेजरने सांगितलं होतच की सगळे बंगले काही भरलेले नाहियेत. तीसच भरलेत, त्यात पुन्हा वर्षातुन ठरावीकच दिवस रहायला येणार्‍यांचीच संख्या जास्त, त्यामुळे कायम लोकवस्ती असणारे बारा-पंधराच बंगले. मला तर आधी कुणिच दिसलं नाही आजुबाजुला.
मी रहायला आल्याच्या तिसर्‍याच दिवशीची गोष्ट. संध्याकाळी टॅक्सीतून उतरलो, आणि मुख्य फाटकातून आत शिरलो. सात-सव्वासात वाजले होते. माझ्याच विचारात एकटाच चालत होतो त्या आखीव रस्त्यांवरून माझ्या घरापर्यंत आलो, किल्ली शोधुन दार उघडलं. आत पाउल ठेवताना लक्षात आलं, काहितरी चुकल्याचुकल्यासारखं वाटतय. लाइटचं बटण दाबलं तेव्हा जाणवलं की कॉलनीमधे नेहेमीचे दिवे दिसत नाहियेत.. आणि घरातले पण लागत नाहियेत.
आता एवढ्या मोठ्या घरात एकट्यानं अंधारात बसायचं म्हणजे त्रासच की. शिवाय कॉलनीच्या तसल्या तुटक रचनेमुळे कसले आवाज नाहीत, की चाहुल नाही. नुसता भकास एकटेपणा आणि भयाण अंधार.. आता आली का पंचाइत, करायचं काय रात्रभर...
दुसरा काहीच पर्याय नव्हता, पोटाची सोय तर करायला हवी होती, इथं येउन एक-दोनच दिवस झाले होते. कुठली दुकानं वगैरे पण माहिती नव्हती. तरी शोध घेणं भागच होतं म्हणुन ऑफीसची बॅग घरात ठेवली. कपडे बदलले आणि बाहेर पडलो. नेहेमीचा कॉलनीबाहेर पडायचा रस्ता न पकडता, जरा घरामागुन कॉलनीबाहेर जाणार्‍या रस्त्याने चालत निघालो.
काही अंतर सोडुन एका घराच्या लॉन वर खुर्च्या मांडलेल्या दिसल्या. थोडा हसण्याखिदळण्याचा आवाज ऐकु आला. त्या गुडुप अंधारात काही अंदाज येत नव्हता. पण एकंदरीत चित्रावरून अमेरीकन लोकांच काहीतरी बार्बेक्यू वगैरे चाललं असणार हे ओळखलं. निदान लाइट कधी येणार हे तरी माहीत असेल तर विचारावं म्हणुन थोडा जवळ गेलो. आणि कानावर शब्द आले..
"मिष्टी खतम हो गयी क्या..." क्षणभर थबकलोच. जर त्या क्षणी माझा चेहरा कुणी पाहिला असता.. तर 'आनंदानं गहिवरून येणे' ह्या वापरून पापरुन गु़ळगुळीत झालेल्या उक्तीचा अर्थ कळला असता. मी अजुन अंधारातच होतो, त्या दिशेने पुढे सरकलो. एव्हाना त्याही मंडळींना माझी चाहुल लागली होती.
आटोपशीर टेबलखुर्च्या मांडलेल्या, मांडी घालुन बसलेला एक चाळीशीचा पण मस्त, मिश्कील गोरा माणुस. त्याच्या शेजारी बसलेली त्याची सुंदर बायको.. समोरच बसलेलं, आंधळ्यालाही ओळखु यावं असं टिपीकल गुज्जू कुटुंब.. (अगदी 'जिग्नेस' च). तो हाफ्चड्डीतला गुज्जूबाबा आणि त्याची दणकट बायको. आणि एकटाच बसलेला थेट दक्षिणेतल्या चित्रपटातुन उचलुन आणलेला केरळी 'कुमार'
माझा चेहेरा दिसायला लागल्याबरोबर, कुमार उठुन हसत हसत सामोरा आला. 'फ्रॉम इंडिया?' अशा प्रश्नानं सुरू झालेली ती मैफील पहाटेपर्यंत रंगतच गेली... बघता बघता चेहेरे फुलले, दुसरी खुर्ची आणली गेली, डिश समोर आली. ग्लास समोर आला.. ते पाचही जण इतका प्रेमळ आग्रह करत होती की बस्स.. शेवटी कुमारच्या बंगल्यातून जाउन त्यानं सोडा आणून माझ्या ग्लासात ओतला तेव्हाकुठे मंडळींचा आग्रह कमी झाला.. आयुष्यात दारु पीत नसल्याचा खेद अगदी मोजक्या वेळेला वाटलेला आहे आजपर्यंत, त्यापैकी हा एक प्रसंग...
हळु हळु अनेक विषय निघाले. घरच्या आठवणी निघाल्या. सगळी मंडळी इकडे गेली आठ दहा वर्षं राहात होती. वर्षातुन एकदोनदा भारतात खेप व्ह्यायची. सगळे इकडचेच होउन गेले होते. स्थानीक भाषा बोलत होते. रस्ते, पत्ते अस्खलीतपणे सांगत होते. पण कसल्यातरी शुल्लक वाटणार्‍या उल्लेखानं अगदी व्याकुळ होत होते. अगदी आतून जाणवणारी, हलवून सोडणारी वाक्य बोलत होते, आपल्या गावाचा, देशाचा उल्लेख आल्यावर.
त्यादिवशी त्या गांगुली दांपत्याच्या लग्नाचा चौदावा वाढदिवस होता. त्यानिमित्तच मैफल बसली होती. हसीमजाक होत होता. सुरुवातीला सगळे जरा सावधपणानं बोलत होते माझ्याशी बोलताना. पण थोड्यावेळातच, हा आपल्यासारखाच हसीमजाकवाला भिडु आहे हे समजल्यावर त्यांनी सहज सामील करुन घेतलं कळपात, आणि माहौल अजुन मोकळा झाला.
नवनवीन विषय चर्चेला येत होते आणि वेगात मागंही पडत होते. कधी मुल्यव्यवस्थेवर चर्चा चालली होती तर कधी दारूच्या ब्रँड्वर.. नवेनवे पदार्थही येत होते समोर. पण माझं मन त्या चर्चेमधे नव्ह्तंच मुळी. मी पहात होतो ते त्या सगळ्याच्या पलिकडचा मानवी स्वभाव. वयाच्या चाळिसाव्या-पंचेचाळिसाव्या वर्षीही थोडक्या उल्लेखानं कातर होणारी ती माणसं.. त्यांच निर्व्याज हसणं, बोलणं.. थोडा मद्याचा अंमलही असावा आणि कदाचित आपल्या मातीच्या आठवणींची नशाही असेल.. पण भावना अव्वल होत्या, हळव्या होत्या.
खुप सुंदर होती संध्याकाळ ती.. मिष्टीच्या, दुर्गापुजेच्या आठवणींनी उसळुन येणारा गांगुली, त्याची अप्रतीम सुंदर, मनमोकळी, बंगाली उच्चारातलं हिंदी बोलणारी बायको. लग्नाच्या चौदाव्या वाढदिवशीसुधा तिचं ते लाजणं. तो केरळी उच्चारात हिंदी बोलणारा कुमार, "मै ये सब चॉडक्ये वॅपस जाणे वाळा उं" म्हणत तावातावानं मुद्दा मांडण्याची त्याची पद्धत. सगळंच छान होतं, लोभसवाणं होतं...
रात्री उशीरा सगळ्यांचा निरोप घेउन अंधारातच घरी येउन पडलो... कितीतरी वेळ जागाच होतो... रात्रीच्या त्या निरव शांततेत कानावर येणारे हसण्याचे आवाज… डोळ्यासमोरुन हलत नव्हतं त्या गडद अंधाराच्या मखमली पडद्यावरचं सुंदरसं चित्रं......

No comments:

Post a Comment